रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

आईसाठी पान

 


आईसाठी पान 

©Dr Hemant Junnarkar, All rights reserved
(टीप: या पोस्टमधील कवितांवर  आमचा कोणताही हक्क नाही. या कवितांचा पूर्णतः हक्क त्यांचे मूळ लेखक/कवी/ प्रकाशक यांचा आहे. ही पोस्ट फक्त मनोरंजन/वाचना  साठी केलेली असून या पोस्ट द्वारे आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांच्या या लिखाणावर हक्क दाखवत नाही आहोत.)




आई 

स्व. ज्योत्स्ना पंढरीनाथ जुन्नरकर (माहेरचे नाव- सुमती शंकर राजे)
                                                        (२६/५/१९२८-१७/१२/२००८)

जन्म आणि बालपण:


आई सातव्या महिन्यात जन्मली.सहावा पूर्ण होऊन एकच दिवस झाला आणि आईचा जन्म झाला. त्यावेळेस सहाव्या महिन्यात जन्मलेली मुलं जगत नसत. आईच्या आधी आजीला जुळे मुलगे झाले पण अपुऱ्या दिवसांचे झाले आणि गेले. त्यानंतर एक मुलगा झाला तोही तसाच अपुऱ्या दिवसांचा होता आणि गेला. मग आई झाली. आई खूप नाजूक होती. आमच्या पणजीने      (आजोबांच्या आईने) आईची वर्षभर  जिवापाड काळजी घेतली. तिला अंगाला तेल  मालिश करून कापसात आणि सुती नऊवारी साडीत ऊब मिळावी म्हणून गुंडाळून ठेवी. तिने बाळसं धरेपर्यंत साधारण सात ते आठ महिने तिला अंघोळ घालत नसे. आईला भरभर चालता येत नसे. आजोबा तिला स्वयंपाकाव्यतिरिक्त कष्टाची कामं - भांडी घासणे, विहीरीचं पाणी काढणे, पाणी भरणे, कपडे  धुणे  वगैरे  करू  देत नसत.

आईकडे  पणजीच्या खूप आठवणी होत्या.  कुसुममावशी किंवा शालीमावशी झाली तेव्हा बहुतेक पणजी वारली. 

आईला घरकामाची खूप आवड होती. आजोबांच्या शर्ट, पॅन्ट, कोटाची निघालेली बटणं आई लावत असे, उसवलेले आजोबांचे कपडे आई रिपेअर करून देई. स्वैपाक नासधूस न करता निगुतीने आणि चविष्ट बनवी त्यामुळे आजोबा म्हणत, "ताई,  संसार छान करील".  आईला टापटीप आणि स्वच्छतेची आवड होती. बाकी सारी भावंडे  वेळ वाया  घालवीत  तेव्हा आई  ही  कामं करून नवीन गोष्टी  शिकायची. ती झाशीला स्वेटर विणायला खराट्याच्या काड्यांवर शिकली होती. क्रोशिया वर्क, भरतकाम पण ती असंच शिकली होती. घरातही ती कोणाच्या अध्यात-मध्यात नसायची.

आई सांगे, आजोबांचं इंग्लिश चांगल होतं. आजीच्या हातचं जेवायला आजोबांचे साहेब त्याच्या बायकोला घेऊन येत असे (बहुतेक नागपूर). आजी साहेबाच्या बायकोला संक्रांत आणि चैत्रगौरीच्या हळदकुंकवाला बोलवत असे. आजोबा त्याचं महत्त्व त्या लोकांना इंग्लिश मध्ये सांगत. आईचं शिवणकाम, विणकाम अतिशय छान होत. ती बदलीच्या ठिकाणी वेगवेगळ्या शेजार्यांकडून शिकली होती. मुंबईत आल्यावर तिने दादरला झारापकरचा शिवण क्लास लावून पूर्ण डिप्लोमा चांगल्या मार्कांनी पास केला होता.

शिक्षण:

आई  आठवीपर्यंत शिकली होती.  घरी आजीची (आईच्या आईची) बाळंतपणं असत. आई घरातली मोठी मुलगी त्यामुळे तिची आजी (आजोबांची आई) सतत आईला हाताशी घ्यायची,  आपल्या आजीच्या (आईची आई) बाळंतपणात. आपल्या आजीची अकरा बाळंतपण झाली. आईची आजी गेल्यावर आईच तिच्या आईचा घरकामात आधार झाली. वर्षाची वाळवणं मसाले आणि स्वैपाक. त्यामुळेच तिचं शिक्षणावरून लक्ष कमी झाले. त्यात आजोबांच्या बदल्या. आजी खूप नातेवाईक सांभाळत असे, तिच त्यांच्याकडे जाणयेणं असे. (मुली अधिक असल्याने लग्नास स्थळं मिळवण्यात अडचण येऊ नये हा आजीचा उद्देश असे.) आई अशावेळेस आजोबांना आणि बाकी भावंडांना वेळेत स्वैपाक करून जेऊ घाली. 

ज्यांना कुसुमावती देशपांडेंनी शिकवलं ते सर आईला मराठी शिकवायला होते, अस आई कौतुकाने सांगत असे.  आईचा गळा गोड आणि पाठांतर चांगलं असल्याने ते तिला वर्गात कविता म्हणायला सांगत पण लाजेस्तव ती म्हणत नसे. आईचं अंकगणित चांगल होतं, मराठी चांगलं होतं. आईला इतिहास फार आवडत नसे, त्यावेळेस ब्रिटिश इतिहास असे आणि भूगोल तिचा  नावडता  विषय होता. 

आईने नववीची परीक्षा देऊ शकली नाही . कारण त्याच वेळेस आजोबांची बदली झाली. पुढे मुंबईत आल्यावर  दीदीमावशीने अकरावीचा फाॅर्म भरला पण आईचा शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने ती  फॉर्म  भरू शकली नाही. आईला रेशनिंग ऑफिसात क्लर्कची नोकरीमावशी मिळत होती पण आजोबांनी नोकरी करायला नकार दिला.

आईचे शालेय जीवन आणि कवितांची आवड 

शालेय जीवनाबद्दल, शाळेतील शिक्षकांबद्दल आई खूप सांगत असे. आजोबा रेल्वेमध्ये नोकरी करत. त्यांची सतत बदली होत असे. बहुतेक लोक आपलं कुटुंब एका ठिकाणी स्थिर ठेवून बदलीच्या ठिकाणी एकटे जातात. परंतु आजोबा प्रत्येक ठिकाणी आपलं कुटुंब घेऊन जात. त्यामुळे आई सांगते की त्यांच्या शिक्षणाचे फार हाल झाले.

आईकडे प्रत्येक प्रसंगासाठी गाणं किंवा कविता लगेच तयार असे. कुणी आजारी पडलं की,

'पडु आजारी 

मौज हीच वाटे भारी'

आठवणीतल्या कविता संग्रहावरून कळते की ही कवितेचे कवी भानुदास हे आहेत. ही कविता खाली दिली आहे:

पडु आजारी

मौज हीच वाटे भारी


नकोच जाणे मग शाळेला

काम कुणी सांगेल न मजला

मऊ मऊ गादी निजावयाला

चैनच सारी... मौज हीच वाटे भारी


मिळेल सांजा, साबुदाणा,

खडिसाखर, मनुका, बेदाणा,

संत्री, साखर लिंबू आता

जा बाजारी... मौज हीच वाटे भारी


भवती भावंडांचा मेळा

दंगा थोडा जरि कुणि केला

मी कावुनि सांगेन तयाला

जा बाहेरी... मौज हीच वाटे भारी


कामे करतील सारे माझी

झटतिल ठेवायचा मज राजी

बसेल गोष्टी सांगत आजी

मज शेजारी... मौज हीच वाटे भारी

असले आजारीपण गोड

असूनि कण्हती का जन मूढ

म्हणून विचारी... मौज हीच वाटे भारी

शाळेत जावयास निघाले की,

'शाळेत रोज जाताना

मज विघ्ने येती नाना'

कधी कधी तर आम्ही वैतागून म्हणत असू, 'आईचं झालं गाणं सुरू.' 

यांतील बहुतेक कविता 'आठवणीतल्या कविता' या चार भागांच्या संग्रहात आहेत.

आई आणखी एक कविता म्हणत असे. आठवणीतल्या कविता संग्रहावरून मला कळलं की ती कविता कवी गिरीश यांची होती. कवितेमध्ये एक लहान मुलगा आजारी असतो. त्यांचे आईवडील दूर गावी असतात. डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असतात. पण या प्रयत्नांना यश येत नाही. अखेर मुलगा सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करून सर्वांचा निरोप घेतो. आई ही कविता म्हणायला लागली की मी सांगत असे,'आई, ही कविता म्हणू नकोस.'

आईवरून 'प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधु आई' ही एक कविता आई म्हणत असे. ही कविता माधव ज्युलियन यांची आहे.

याशिवाय,

'शिकणे शिकणे किती आयुष्याची माती'

'पाच पानी विडा, लवंग वेलदोडा

झाली धोतराची उपरणी'

ही गाणी आई गुणगुणत असे.

'बेलाग दुर्ग जंजिरा वसईचा किल्लेवाला' ही एक कविता आई म्हणत असे. ही कविता कै. दु.आ.तिवारी यांची असून खालीलप्रमाणे आहे-

बेलाग दुर्ग जंजिरा वसईचा किल्ला असला
दुश्मन फिरंगी तिथला आटोपेना कोणाला
त्या सिंहाला पकडाया भारतीय चिमणा सजला
गोव्याचा टोपीवाला कोंकणचा पगडीवाला
लागली झुंज उभयाला बुद्धीचा डाव उडाला
मोहरा इरेला पडला ||१||

बोलावूनी सरदारांना तो समरधुरंधर बोले
शूरांनो वेढा द्याया चारमास होऊनी गेले
बेहीम्मत जे असतील परतोनी ते जातील
जा कळवा की दादाला 
मोहरा इरेला पडला ||२||

तोफेच्या तोंडी माथे बांधोनी उडवा हाथे
शीर तुटुनी त्या आघाते किल्ल्यात पडूद्या त्याते
ती निर्वाणीची वाणी डोळ्यास आणि पाणी
प्रत्येक वदे गहीवरुनी इर्षेस वीर हा चढला
मोहरा इरेला पडला ||३||

गोळ्यांच्या मार्याखाली चर खोदोनी रेतीत
उडविले सुरंगी बार तट लोळविला मातीत
गर्जना एकदम झाली पडलेल्या खिंडारात
जो बांध तटाचा फुटला तो सेनासागर सुटला
धैर्याचा किल्लेवाला बंदुकीस भाला भिडला
मोहरा इरेला पडला ||४||

मर्दच्या मराठी फौजा रणकीर्ती जणांच्या गाव्या
जणू घोंगावत मधमाश्या मोहोळाला बिलगाव्या
कडकडात वरुनी व्हावा सारखा अग्निवर्षावा
परी तो सिंहाचा छावा परतेना हिम्मतवाला
मोहरा इरेला पडला ||५||

वारावर करतची वार अनुसरले शूर पवार
शिंद्यांचा खांदा घोडा चालला जणू की तीर
बावटा धरुनी तोंडात भोसले चढे जोमात
आगीच्या वर्षावात सामना भयंकर झाला
मोहरा इरेला पडला ||६||

गरनाळी तोफा मोठ्या धुंकार कराया सजल्या
घायाळ धडाधड खाली तनु कितक्यांच्या धड्पडल्या
धातीचे निधडे वीर चिंध्यापरी त्यांच्या झाल्या
पगडीची फौज हटेना क्षत्रुची पकड सुटेना
तो विजयश्रीचा चिमणा बेहोष होऊनी लढला
शौर्याची शर्थ जहाली बावटा तटावर चढला
जयनादाने वसईचा दिग्प्रांत पहा दुमदुमला
तो समय आणि ती मूर्ती ठाके कवीनयनापुढती
मोहरा इरेला पडला ||७||

आणखी एक गोष्ट म्हणजे, आई सांगते की त्या वेळेला त्यांना प्रश्नांची उत्तरे श्लोकांचा स्वरूपात असत. एक उदाहरण मला आठवतं. 

१. बंगालच्या फाळणीची कारणे सांगा.
त्यावर श्लोकात उत्तर असे:
बंगालची फाळणी कर्झनाने
केली पहा खालिल कारणाने'
म्हणजे श्लोक पाठ केला की प्रश्नाचं उत्तर आलं. किती छान कल्पना आहे. 

आणखी एक मला असं जाणवतं की आजकाल लोक येता जाता मेकॉलेचा उद्धार करीत असतात. पण ही पाठ्यपुस्तके आजच्या पाठ्यपुस्तकांपेक्षाही उजवी वाटतात. 

माझ्या मावश्या, मामा, वडील याच अभ्यासक्रमात शिकले होते. पण त्यांच्याकडे असा ठेवा नव्हता. आम्ही मोठे झालो, अभ्यासाला लागलो, मग आईबरोबर संभाषण कमी झाले. आईचा  ठेवा किती अनमोल होता, ते आता कळते.

आईच्या आवडीची गाणी 

मी एकदा आमच्या ऑफीसच्या मित्रांबरोबर पिकनिकला गेलो होतो. साहजिक गाणी म्हणण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मी काही मराठी गाणी म्हटली आणि सारे थक्क झाले. एकजण म्हणाला, 'साहेब, काय स्टॉक आहे हो तुमच्याकडे. ही कुठली गाणी? ' मी सांगितलं ,' ही गाणी माझी आई म्हणत असे.'

माझ्या आईचा आवाज चांगला होता. ती सतत गाणी गुणगुणत असे. मला आठवणारी गाणी खाली दिली आहेत. ही सर्व गाणी आठवणं शक्य नाही. जेवढी आठवतील तेवढी इथे देतो. पूर्ण गाणं दिल्याशिवाय त्याचे सौंदर्य कळणार नाही, म्हणून पूर्ण गाणी दिली आहेत.

मालती पांडे:

कुणीही पाय नका वाजवू

कुणीही पाय नका वाजवू,  
पाय नका वाजवू  
चाहुल देऊन नका कुणी ग चिमण्याला जागवू

नकोस चंद्रा येऊ पुढती, 
थांब जरासा क्षितिजावरती
चमचमणारे ते चंदेरी चाळ नको नादवू, 

पुष्करिणीतून गडे हळुहळु, 
जललहरी तू नको झुळुझुळु
नकोस वाऱ्या फुलवेलींना फुंकरिने  डोलवू

नकोस  मैने तोल सावरू,
नकोस कपिले अशी हंबरू 
यक्षपऱ्यांनो स्वप्नी नाचुन नीज नका चाळवू

जगावेगळा छंद ग याचा, 
पाळण्यातही खेळायाचा 
राजी नसता अखेर थकुनी पंख मिटे सावरू    

वळणावरुनी वळली गाडी

वळणावरुनी वळली गाडी आज सोडलं गाव 
तुझ्याच आई अश्रूसंगे पुसले पहिले नांव 
नवनावाचं लेवुनी कुंकू जाते माझ्या घरा 
वेडी माया झरते नयनीं भिजवित सारी धरा 
"सांभाळुन जा, सुखी रहा तू जातीस भरल्या घरा" 
बोलांतुन या भिजल्या आला धीर तुझ्या पांखरा 
पाखर आई तव मायेची उदंड लाभो मला 
जायाच्या ग अशाच लेकी तोडूनि ममता-लळा 
तूंच पाहुनी ठेव सुखाची दिलीस माझ्या करीं
तेज मुखावर बघशिल येता, भेटायाला घरी   

कशी रे तुला भेटू मला वाटे लाज

कशी रे तुला भेटू मला वाटे लाज
लौकिक तुझा मोठा आणिक घरंदाज 
करिती कुटाळकी तुझे ते टाळकरी
साथीला साथ देई घरची एकतारी
भोवती निंदकांचे वाजती पखवाज
ओळखते राया माझी मी पायरी
बोलतील तुझी सोयरी धायरी
जहरी बोलाचे हे जुळले तिरंदाज
होईल तेलवात स्नेहात आपोआप
जळेल जन्मोजन्मी प्रीतीचा नंदादीप
वयात यौवनाचा विखुरला साज   

लता मंगेशकर:

डोळे पाण्याने भरले 
तुझे डोळे पाण्याने भरले 
माझे डोळे पाण्याने भरले 

काळजातल्या रेशीमगाठी 
तोडित असता  दोघे मिळुनी 
गळ्यास मारुन आपुल्या मिठी 
प्रीत विचारी कळवळूनी 
'कसे कुणाचे सांगा चुकले 
सांगा चुकले'

अबोल आम्ही दोघे बघुनी 
प्रीत म्हणाली,'जात्ये सोडुनी 
अबोल आम्ही दोघे बघुनी 
प्रीत म्हणाली,'जात्ये सोडुनी 
तिला वंदण्या कर हे जुळले 
कर हे जुळले'

मने भंगली एक होऊनी 
धावु लागली तिच्या मागुनी
नकोस जाऊ म्हणता थबकुनी
गहिवरुनी ती म्हणता चुंबुनी
'झाले गेले, विसरा सगळे 
विसरा सगळे'

गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का ?

गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का ?
जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा

कडकडुनी तू मिठी मारता बाळे
बालपण आले आले घुमवित घुंगुरवाळे
आठवले सारे सारे गहिवरले डोळे 
कढ मायेचे तुला सांगती जा

दारात उभी राहिली खिलारी जोडी
बघ दीर धाकले बसले खोळंबुन गाडी
पूस ग डोळे या पदराने सावर ही साडी
रूपदर्पणी मला ठेवुनी जा

मोठ्यांची तू सून पाटलिण मानाची
हसले तुझे ग बिलवर लगीनचुडे
बघु नकोस मागे मागे लाडके बघ पुढे
नकोस विसरू परि आईला जा


घरात हसरे तारे असता 

घरात हसरे तारे असता 
मी पाहु कशाला नभाकडे

छकुल्यांची ग प्रशांत वदने
गोड गुलाबी गाली हसणे
अमृत त्यांच्या ओठी असता 
कशास मधुघट हवा गडे

गोजिरवाणी जशी वासरे
प्रेमळ माझी गुणी लेकरे
स्वर्ग अवतरे घरात माझ्या 
आनंदाचे पडती सडे

गोकुळ येथे गोविंदाचे 
झरे वाहती शांति सुखाचे
वैभव पाहून मम सदनीचे 
ढगाआड ग चंद्र दडे 

आशा भोसले 

पंढरीनाथा झडकरी आता 

 (या गाण्याची आई एक गंमत सांगत असे. अण्णांचं नाव 'पंढरीनाथ ' होतं. आईचं लग्न ठरलं तेव्हा कुणीतरी (मला नाव आठवत नाही ) आईला म्हणाले होते की ,' तुम्ही एक सारखे हे गाणे म्हणत असायचा, म्हणून तुम्हाला पंढरीनाथ मिळाले )

पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला विनविते रखुमाई विठ्ठला 

ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरी तुकयाचा

याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्तजनांचा 

भक्त थोर ते गेले निघुनी, गेला महिमा तव नामाचा
विक्रय चाले देवपणाचा, रहायचे मग इथे कशाला

धरणे धरुनी भेटीसाठी पायरीला हरिजन मेळा
भाविक भोंदू पूजक म्हणती केवळ अमुचा देव उरला 

कलंक अपुल्या महानतेला बघवेना हो रखुमाईला
यायचे तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला


गजानन वाटवे 

फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोले

फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोले
पंचमीचा सण आला, डोळे माझे ओले
श्रावणाच्या शिरव्यांनी आनंदली धराराणी
माझे पण प्राणनाथ घरी नाही आले
जळ भरे पानोपानी संतोषली वनराणी
खळाखळा वाहतात धुंद नदीनाले
पागोळ्या गळतात, बुडबुडे पळतात
भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले
आरशात माझी मला पाहू बाई किती वेळा
वळचणीची पाल काही भलेबुरे बोले

बाबुराव गोखले 

का नाही हसला नुसते, मी नाही म्हटले नसते
का नाही हसला नुसते, मी नाही म्हटले नसते
जडलेहि कदाचित असते आपुलेच अवचित नाते
सज्जात उभी मी होते, रस्त्यात पाहिले तूते
डोळ्यांनी सांगत होते, का नाही ओळखले ते
मश्गूल तुझे मन होते कीर्तीला जिंकायाते
परि तुजला जिंकायाते अंतरी झुरत मी होते 
मी होउन पुसले असते, तू नाही म्हटले असते
त्या पराभवाचे पाते काळजात घुसले असते
तू वरिले दुसऱ्या स्त्रीते, मज दिले दुज्या पुरुषाते
दु:खात सुख परि इतुके, हे कुणास कळले नव्हते 

 बबनराव नावडीकर 

कुणी आलं कुणी आलं, जीवाला वेड लावून गेलं 
कुणी आलं कुणी आलं, जीवाला वेड लावून गेलं 

नाही ठाऊक नांव नाही माहीत गाव
मला पाहून उगीच हंसलं, उगीच हसलं, उगीच हसलं

होते आंबेवनात गीत मजेत गात 
तोच पाल्यांत पाऊल वाजलं, पाऊल वाजलं, पाऊल वाजलं

गोड सकाळचा पार वारं झुळुझुळु गार
फूल उंबराचं अवचित फुललं, अवचित फुललं, अवचित फुललं

गाणं राहिलं गळ्यांत दृष्टी फिरली मळ्यांत 
टोंक फेट्याचं पिकात लपलं, पिकात लपलं, पिकात लपलं

त्याच्या नजरेची धार भेदी जीवास पार 
त्यानं चोरून काळीज नेलं, काळीज नेलं, काळीज नेलं 

आर. एन. पराडकर 


गुरुदत्त पाहिले कृष्णातिरी 

गुरुदत्त पाहिले कृष्णातिरी

शतदीप उजळले माझ्या उरी


चरण क्षाळिते कृष्णामाई
छत्र तरूची शीतल राई
गोड आरती खगगण गाती
भुलली स्वर्गपुरी !

यतिवेषे गुरुमूर्ती शोभली
अपार करुणा हृदयी भरली 
सूर्य चंद्रमा नयनी, वदनी 
शांतिसुमे साजिरी !!

प्रभूरायाची शुभद पाऊले
सेवाया सुर भूवर आले
माझ्या नयनांमधुनी झरती
प्रेमाश्रूंच्या सरी !!! 











आईचे भक्तिजीवन


नित्यपाठ आणि उपासना :


सकाळी स्नान झाले की आई  मनोबोधाच्या आरतीमधील खालील ओळी म्हणत असे:-


वेदांचे जे गुह्य शास्त्रांचे जे सार

प्राकृत शब्दांमाजी केला हा विस्तार


यापुढील ओळी मी कधी ऐकल्या नाहीत.


नंतर हा श्लोक म्हणत असे:


शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, 

वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, 

कवी वाल्मीकासारिखा मान्य ऐसा, 

नमस्कार माझा सद्गुरू रामदासा


शिवाय खालील श्लोक आई म्हणत असे:


मना तुला हे ब्रीद सांगतो समर्थ ग्रंथीचे 

ग्रंथराज भावार्थहि असा वदती गुरु वाचे

अनंत भावे स्मरण करोनी श्रीगुरुचरणांचे

तरीच जन्मा येउन केले सार्थक देहाचे

गुरुचरणाची गोडी तुजला किती सांगु वाचे

सेवक किंकर स्वच्छंदाने गुरुपुढती नाचे


हे सारे श्लोक समर्थ रामदासांशी संबंधित आहेत. हे श्लोक आई का म्हणत असे, कुणास ठाऊक.


कधीकधी घरात खूप अडचण, अर्थात पैशाची, आई खालील भजन म्हणत असे-

हा नको नको संसार, शिरावर भार

जाउनिया पंढरपुरी, रहावे सोडुनीया घरदार


खालील श्लोक मी आईच्या तोंडून ऐकले आहेत-


१. रामा तुझे कोमल नाम घेता

संतोष वाटे बहु फार चित्ता

बापा दयाळा मज भेट द्यावी

दारिद्र्यचिंता अवघी हरावी


२. श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा

ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा

नेत्री न ये रे तुजवीण निद्रा

कै भेटसी बा मजला समुद्रा


आईला इतर कुठली उपासना, व्रत वैकल्ये करताना मी पाहिले नाही. आम्हाला जी काही स्तोत्रे शिकवली, ती अण्णांनी शिकवली. माझी बहीण शामा सांगते की आई तिला रामनाम घेण्यास सांगत असे. 


आईला कर्मकांड आवडत नसे आणि बुवाबाजीची तिला फार चीड होती. अण्णांचा धार्मिकतेकडे ओढा होता. त्यावर ती अंकुश ठेवून होती. धार्मिकतेच्या आहारी जाऊन अण्णा संसाराकडे दुर्लक्ष करतील अशी भीती तिला होती.


घरी काही सणवार असला आणि देवाला नैवेद्य दाखवायला सांगताना ती नेहमी म्हणत असे,' माझ्या मुलांच्या मुखाला लागलं की ते देवाला आपोआप मिळालं.'


साईबाबांवर श्रद्धा:


आईची साईबाबांवर खूप श्रद्धा होती. आमच्या घरी शिरडीहूनच आणलेला साईबाबांच्या मूळ मूर्तीचा एक फोटो होता. आई आम्हाला नेहमी सांगत असे, शिर्डीला बाबांचं मोठं मंदिर आहे. आपण एकदा शिर्डीला जाऊ. (पुढे आम्हाला शिर्डीला प्रथम नेलं ते रमेश मामाने.)


खडकी बाजारातील साईबाबांच्या देवळात जायला तिला आवडे. पण कुठलाही नियम किंवा पूजापाठ असा तिने कधी केला नाही.


आई तिच्या लहानपणीचा एक अनुभव नेहमी सांगत असे. 


एकदा तिच्या हाताला खूप सूज आली होती. रात्री तिला एक स्वप्न पडलं. स्वप्नात बाबांचे एक देऊळ होते आणि देवळात बाबा स्वत: होते. बाबांनी आईला समोरच्या झाडाचे फळ खाण्यास सांगितले.


आई म्हणाली, 'इतक्या वर फांदीपर्यंत माझा हात कसा जाईल? ' परंतु खरोखरच फांदीजवळ जाताच फांदी आपोआप खाली आली आणि आईने फांदीचे फळ तोडून खाल्ले. 


बाबांनी नंतर आरती करण्यास सांगितले.आई आरतीसाठी निरांजन शोधू लागली. परंतु बाबा म्हणाले,'माझ्या आरतीसाठी निरांजन लागत नाही. तेथील पणती घे.'


आईने पणती घेऊन बाबांची आरती केली आणि स्वप्न मोडले. त्यानंतर हाताची सूज उतरली.


माझ्या लहानपणीचा एक किस्सा आईने सांगितला. मला खूप ताप आला होता. रात्रीची वेळ होती. आई जागी होती. तिला झोप येऊ लागली. अचानक तिला बाबांचा दृष्टांत झाला,'झोपू नकोस, जागी रहा.' आई त्याप्रमाणे जागत राहिली. पहाटेपर्यंत माझा ताप उतरला.


मी मोठा झाल्यानंतर  एकदा अडचणीत असताना आईने बाबांना सांगण्यास सांगितले.  मी आईला म्हणालो ,' आपली कामं आपण करायची सवय ठेवली पाहिजे. प्रत्येक बाबतीत देवाला वेठीला धरणं बरोबर नाही ‌' 


यावर आईने  उत्तर दिलं,' आपलं काम आपल्यालाच करायचं आहे, पण थोडा भार बाबांवर टाकावा.'


मला वाटतं, साईभक्तीचं मर्म आईला कळलं होतं.



आईने सांगितलेल्या आठवणी आणि गोष्टी 

श्रद्धेचे फळ


आमचे आजोबा - कै. शंकर यशवंत राजे 

हा किस्सा आमच्या आईने सांगितलेला आहे. आईच्या वडलांचा म्हणजे माझ्या आजोबांचा देवावर विश्वास नव्हता. परंतु ते देवपूजा नियमित करीत. ते देवपूजा करीत असताना शेजारील एक  मुसलमान बाई  तेथे नियमित येऊन बसे. तिला ही   पूजा फार आवडे. तिच्या मुलीला एकदा खाकमांजरी झाली, म्हणजे काखेत गाठ आली. तिने आजोबांना सांगितले की ' तुम्ही पूजा करता तेव्हा तुमच्या पूजेतील थोडे कुंकू मला द्या. त्या कुंकवाने माझ्या मुलीची खाकमांजरी बरी होईल.' आजोबांचा या गोष्टीवर विश्वास नव्हता. ते म्हणाले  की 'अशी काय खाकमांजरी बरी होईल का? मुलीला चांगल्या दवाखान्यात घेऊन जा आणि इलाज कर.' परंतु ती गरीब असल्याने बहुधा तिला इलाजाचा खर्च परवडणारा नसावा. तिने फारच आग्रह केला तेव्हा आजोबांनी चिमूटभर कुंकू उचलून 'हे घे' म्हणून तिच्या हातावर आपटले. तिने ते श्रद्धेने हातावरून काळजीपूर्वक पुसून कागदाच्या पुडीत भरून घरी नेले. हे कुंकू तिने नियमित खाकमांजरीला लावले आणि तिच्या मुलीची खाकमांजरी बरी झाली. नंतर तिने येऊन आजोबांना ही चांगली बातमी सांगितली.


 भुजंगाच्या गंडमाळा



हा प्रसंग आमच्या आईने आम्हाला सांगितला आहे आणि तिला तिच्या आईने म्हणजे आमच्या आजीने सांगितला आहे.

ही आजीच्या आजोबा-पंजोबा कुणाची तरी गोष्ट आहे. ते व्यवसायाने वैद्य होते की त्यांना औषधांची माहिती होती, माहीत नाही.

एक दिवस देवपूजा करीत असताना देवाच्या चौरंगाखाली का बाजूला त्यांना एक भुजंग वेटोळे घालून बसलेला दिसला. प्रथम त्यांना भीती वाटली, परंतु तो अगदी निपचित पडून आहे, हे पाहिल्यावर त्यांची भीड चेपली.

नीट पाहिल्यावर त्यांना असे दिसले की त्याला गंडमाळा झाल्या होत्या. आजोबांना त्याची दया आली गंडमाळेवर उपाय असणारी औषधी मुळी सहाणेवर उगाळून त्यांनी त्या भुजंगाच्या गंडमाळांवर औषधी लेप लावला. तो भुजंग तेथून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी आजोबांना तो पुन्हा त्याच दिवशी दिसला. आजोबांनी पुन्हा त्याच्या गंडमाळांना औषधी लेप लावला.

अशा प्रकारे तीन-चार दिवस नियमित तो भुजंग येत होता आणि आजोबा त्याच्या गंडमाळांना औषधी लेप लावत होते.

एक दिवस आजोबांना दिसून आले की भुजंगाच्या  गंडमाळा बऱ्या झाल्या आहेत आणि भुजंग आजोबांकडे कृतज्ञतेने पाहतो आहे.

आजोबांनी त्याला प्रार्थना केली की 'तुझ्या वंशातील कुणीही माझ्या वंशातील कुणाला दंश करून नये.' भुजंगाने जणू काही आजोबांची प्रार्थना ऐकली आणि तो तेथून निघून गेला.

त्यानंतर तो भुजंग आजोबांना कधी दिसला नाही.

दादा :
आजीचे वडील म्हणजे आपले पणजोबाची गोष्ट आहे...ते वैद्य होते..आजीचे माहेरचे आडनाव वैद्य...पणजोबाना एक भुजंग स्वप्नात दिसला, त्याला गंडमाळा झाल्या होत्या व तो त्यावर उपचार कर असे सांगू लागला..त्यावर पणजोबा नी त्याला प्रत्यक्ष यायला सांगितले...दुसऱ्या दिवशी पणजोबा पूजा करताना त्यांना फुस्स असा आवाज आला..तो भुजंग प्रत्यक्ष आला होता..त्याच फणा सुपा एवढा होता व अंगावर बोट बोट केस होते..पणजोबा नी बघून उपचार चालू केले सहाने वर उगाळून पणजोबा लेप करायचे व त्याच्या मानेला लावायचे..काही दिवसात तो भुजंग बरा झाला व सांगितल्या प्रमाणे वरदान दिले

 


३ टिप्पण्या:

आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण

 आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर  (१७/१०/१९२२-१/२/२०१४) माझे वडील कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर एक अत्यंत...