श्रीमद्भग्वदगीता - एक चिंतन

 

श्रीमद्भग्वदगीता - एक चिंतन 



 १. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये सांगितलेले योग

श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायास एकेका योगाचे नाव दिले आहे. श्रीमद्भगवद्गीतेचे असे अठरा अध्याय आहेत. त्यामुळे श्रीमद्भगवद्गीतेत अठरा योग सांगितले आहेत का? शिवाय अध्यायास नाव नसलेल्या बुद्धियोग आणि ज्ञानयोग यांचाही उल्लेख श्रीमद्भगवद्गीतेमध्ये आहे.

श्रीमद्भगवद्गीतेत खरोखर किती योग सांगितले आहेत, ते पाहू या.

१. अर्जुनविषादयोग: सर्व सगेसोयरे युद्धासाठी उभे ठाकलेले पाहून अर्जुनाला आता कुळाचा नाश होणार, म्हणून विषाद झाला आहे.

२. सांख्ययोग: या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण आत्म्याचे स्वरूप, स्वधर्मानुसार युद्धाची आवश्यकता यांचा ऊहापोह  ३८ व्या श्लोकापर्यंत केल्यानंतर ३९ व्या श्लोकात म्हणतात की हे तुला सांख्यातील ज्ञान सांगितले, आता योगातील ज्ञान ऐक, जे जाणून तू कर्मबंधनातून मुक्त होशील. अशा प्रकारे ३९व्या श्लोकापासून भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोग सांगण्यास सुरुवात केली आहे.श्लोक ५० मध्ये योगाची व्याख्याही केली आहे 'योग: कर्मसु कौशलम्'. याचा अर्थ 'योग म्हणजे कर्मातील कौशल्य'. कौशल्य कसले ते पुढे स्पष्ट केले आहे की 'स्वत:स बंधनकारक न होऊ देता कर्म करणे.'

यानंतर भगवान श्रीकृष्ण १. वेदांचे त्रिगुणांनी युक्त स्वरूप २. फलाची आसक्ती सोडून कर्म करण्याची आवश्यकता ३. कर्मापेक्षा बुद्धियोगाची श्रेष्ठता, यांचा ऊहापोह करतात.

३. कर्मयोग:-या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने होते. अर्जुन प्रश्न विचारतो की, 'बुद्धी जर कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगतोस तर मग या घोर कर्मात माझे नियोजन तू कशासाठी करीत आहेस?'

या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण कर्माचे महत्त्व सांगतात. यामध्ये ते स्पष्ट करतात की १. नेमून दिलेले कर्म करणे चांगले आहे २. कर्म यज्ञासाठी करावे ३. कर्म अनासक्तपणे करावे.

४. कर्मसंन्यासयोग:- या अध्यायात भगवान श्रीकृष्ण कर्म त्यागणे योग्य नसून कर्मफलाचा त्याग केला पाहिजे असे प्रतिपादन करतात. या अध्यायात - १. कर्म, विकर्म आणि अकर्म या संज्ञा स्पष्ट करून त्यांमध्ये काय फरक आहे ते सांगितले आहे. २. यज्ञाची कल्पना स्पष्ट करून त्याचे प्रकार आणि महत्त्व सांगितले आहे. ३. ज्ञानाचे महत्त्व विशद केले आहे. 

५. संन्यासयोग:- या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने होते. अर्जुन प्रश्न विचारतो की,'एकदा तू मला कर्मापासून संन्यास सांगतोस, पुन्हा योगाची प्रशंसा करतोस, तर दोन्हींपैकी एक काय हितकारक ते मला सांग.

वास्तविक भगवान श्रीकृष्णांनी कर्मापासून संन्यास कुठेच सांगितला नाही. तरीसुद्धा अर्जुनाने असा प्रश्न विचारला आहे. यावर स्पष्टीकरण देताना भगवान श्रीकृष्ण कर्मयोग आणि संन्यास दोन्ही हितास कारक असले तरी कर्मयोगास विशेष महत्त्व असल्याचे सांगतात.

या अध्यायात भगवान श्रीकृष्ण १. संन्यास म्हणजे काय आणि संन्यासी कोणास म्हणावे २. ब्रह्म, ब्रह्मज्ञानी आणि ब्रह्मनिर्वाण, यांविषयी स्पष्टीकरण देतात.

६. ध्यानयोग:-पाचव्या अध्यायातील विषय चालू ठेवताना भगवान श्रीकृष्ण योगी कोणास म्हणावे आणि योग्याची लक्षणे काय ते स्पष्ट करतात.

श्लोक १० ते ३२ मध्ये योगाभ्यासाची प्रक्रिया विस्ताराने सांगितली आहे. त्यामुळेच या अध्यायाला ध्यानयोग असे नाव देण्यात आले असावे. 

योगापासून जो विचलित होतो, तो कुठल्या गतीस जातो, या अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण असा साधक चांगल्या गतीला जातो याची ग्वाही देतात.

७. ज्ञानविज्ञानयोग:-या अध्यायात भगवान श्रीकृष्णांची अपर आणि पर प्रकृती, त्रिगुणांचे स्वरूप, भक्तांचे प्रकार कुठले याविषयी माहिती दिली आहे.

८. अक्षरब्रह्मयोग:-या अध्यायात ब्रह्म आणि अध्यात्म, अधिभूत, अधिदैवत आणि अधियज्ञ या संज्ञा स्पष्ट केल्या आहेत. अक्षयपदाची प्राप्ती कशी होते, देहत्यागानंतर योगी केव्हा ब्रह्मपदास जातात आणि केव्हा पुनर्जन्म घेतात, यांविषयी माहिती दिली आहे.

९. राजविद्याराजगुह्ययोग:-या अध्यायामध्ये भूते आणि भगवान श्रीकृष्ण यांचा संबंध स्पष्ट केला आहे.

१०. विभूतियोग:-या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या निरनिराळ्या विभूती सांगितल्या आहेत.

११. विश्वरूपदर्शनयोग:-या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दाखवलेल्या विश्वरूपाचे वर्णन आहे.

१२. भक्तियोग:-या अध्यायात भगवान श्रीकृष्ण १ ते ५ या श्लोकांमध्ये अव्यक्ताची उपासना म्हणजे काय ते स्पष्ट करतात. श्लोक ६ ते १२ मध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांची उपासना कशी करावी ते स्पष्ट करतात. श्लोक १३ ते २० मध्ये भगवान श्रीकृष्णांना प्रिय असणाऱ्या भक्ताची लक्षणे सांगितली आहेत.

१३. क्षेत्रक्षेत्रज्ञयोग:-या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, ज्ञान, ज्ञेय, पुरुष आणि प्रकृती या संज्ञा स्पष्ट केल्या आहेत.

१४. गुणत्रयविभागयोग :- या अध्यायात त्रिगुणांचे स्वरूप आणि त्रिगुणातीताची लक्षणे स्पष्ट केली आहेत.

१५. पुरुषोत्तमयोग:- या अध्यायात भगवान श्रीकृष्णांचे परम पद, जीवभूत आणि त्याचे स्वरूप सांगितले आहे. केवळ श्लोक १२ ते २० मध्ये भगवान श्रीकृष्णांचे पुरुषोत्तम स्वरूप म्हणजे काय ते स्पष्ट केले आहे.

१६. दैवासुरसम्पद्विभागयोग:-या अध्यायात दैवी संपत्ती आणि आसुर संपत्ती म्हणजे काय ते स्पष्ट केले आहे. संपत्ती म्हणजे गुण होत.

१७. श्रद्धात्रयविभागयोग:-या अध्यायात सात्त्विक, राजस आणि तामस या गुणांनुसार श्रद्धा, आहार, यज्ञ, तप आणि दान यांचे स्पष्टीकरण दिले आहे. याशिवाय 'ॐ तत्सत्' मंत्राचे महत्त्व सांगितले आहे.

१८. मोक्षसंन्यासयोग:-हा अध्याय श्रीमद्भगवद्गीतेचा शेवटचा आणि सर्वांत मोठा अध्याय आहे. या अध्यायामध्ये संन्यास आणि त्यागामधील फरक सांगितला आहे. सात्त्विक, राजस आणि तामस या गुणांनुसार त्याग, ज्ञान, कर्म, बुद्धी, धृती आणि सुख यांचे स्पष्टीकरण दिले आहे. यांशिवाय चार वर्णांचे स्वभाव कर्म, स्वकर्माचे महत्त्व आणि ब्रह्मावस्थेची प्राप्ती कशी होते, ते सांगितले आहे. श्रीमद्भगवद्गीतेची फलश्रुती सांगून उपसंहार केला आहे.

सारांश, श्रीमद्भगवद्गीतेमध्ये दोनच योग सांगितले आहेत :- १. कर्मयोग आणि २. भक्तियोग. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये या योगांसाठी दोन स्वतंत्र अध्याय असले तरी संपूर्ण श्रीमद्भगवद्गीतेमध्ये फलाची आशा सोडून कर्म करीत राहणे आणि भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणे यांवर भर दिला आहे.

श्रीमद्भगवद्गीतेमधील निर्गुण विचार

सामान्य धारणा अशी आहे की श्रीमद्भगवद्गीता सगुण तत्त्वज्ञान सांगणारी आणि सगुण भक्तिपर आहे. बऱ्याच पुस्तकांमध्ये श्रीमद्भगवद्गीतेच्या 'भक्तियोग' या बाराव्या अध्यायाचे नाव 'सगुणभक्तियोग' असे दिलेले आहे.

श्रीमद्भगवद्गीतेतील निर्गुण कल्पना येथे सांगितल्या आहेत.

देही:-
.२, श्लो.१३-देही या देहात जरी बालपण, तारुण्य, जरा या स्थितींत असतो, तरी त्यास नव्या देहाची प्राप्ती होते. त्यामुळे ज्ञानी तेथे मोह पावत नाही.
सत् आणि असत्, भाव आणि अभाव:
अ.२, श्लो.१६-असत् चा भाव होत नाही, तर सत् चा अभाव होता नाही. ज्ञानी तत्त्वदर्शी लोकांनी या दोन्हींचा असा अंत पाहिला आहे.
अव्यय:
अ.२, श्लो.१७-ज्याने या सर्वांस व्यापिले आहे, त्या अविनाशी अव्ययास जाण. त्याच्या विनाशास कोणीही समर्थ नाही.
शरीरी:
अ.२, श्लो.१८-नित्य, अविनाशी, अप्रमेय शरीरीने धारण केलेल्या या काया अंती विलयास जातात. त्याकरिता युद्ध कर.
अ.२, श्लो.१९-जो यास मारणारा किंवा जो त्यास मेलेला मानतो, त्या दोघांस कळत नाही, हा न मारतो न मारला जातो
अ.२, श्लो.२०-हा जन्मत नाही, मरत नाही, तो झाला नाही, होत नाही. तो पुरातन, नित्य, शाश्वत, जन्मरहित असून शरीर नष्ट करिता मारला जात नाही.
अ.२, श्लो.२१-हा नित्य, अव्यय, जन्मरहित आहे, हे ज्या पुरुषास माहीत आहे, तो कुणाचा कसा घात करवील, किंवा कुणाला कसा मारील?
अ.२, श्लो.२२-जसा नर जुनी वस्त्रे टाकून नवी वस्त्रे परिधान करतो, तसा देही जुनी शरीरे सोडून नव्या शरीरांत जातो.
अ.२, श्लो.२३-हा शस्त्राने तुटत नाही की अग्नीने जळत नाही. हा पाण्याने भिजत नाही की वारा यास सुकवीत नाही.
अ.२, श्लो.२४-हा तोडला वा जाळला जात नाही, हा भिजवला किंवा सुकवला जात नाही. हा नित्य, स्थिर व सर्वत्र राहत असून हा अचल आणि सनातन आहे.
अ.२, श्लो.२५-हा अचिंत्य, अव्यक्त असून यास अविकार्य म्हणतात.
अ.२, श्लो.२९-कुणी याला आश्चर्यकारक म्हणून पाहतात, कुणी आश्चर्यकारक म्हणून बोलतात


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संजलवहिनींचा आगळा छंद

आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण

आईसाठी पान