जीवन त्यांना कळले हो
मीपण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे,
गेले तेथे मिळले हो
चराचरांचे होउनि जीवन
स्नेहासम पाजळले हो
जीवन त्यांना कळले हो
सिंधूसम हृदयांत जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन् दीनांवर
घन होउनि जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो
दूरित जयांच्या दर्शनमात्रे
मोहित होऊन जळले हो
पुण्य जयांच्या उजवाडाने
फुलले अन् परिमळले हो
जीवन त्यांना कळले हो
आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव
ज्यांनी तुळिले हो
सायासाविण ब्रह्म सनातन
उरींच ज्यां आढळले हो
जीवन त्यांना कळले हो
बा. भ. बोरकर
बालपण ते विवाह
जुन्नरकर घराणे
'जुन्नरकर' नाव सांगितले की शाळेमध्ये ( खडकी येथील आलेगावकर ही आमची शाळा) आम्हाला नेहमी एक प्रश्न विचारला जाई, ' तुम्ही जुन्नरचे का ?' या प्रश्नाचं उत्तर आम्हाला कधीच देता आलं नाही. कारण अण्णांनाच या गोष्टीची काही माहिती नव्हती. जुन्नरकर आडनाव तसं दुर्मिळच. आमच्या शाळेत जुन्नरकर नावाचे फक्त आम्हीच होतो.
रघुनाथ शंकर जुन्नरकर हे जुन्या काळातील चित्रपट पटकथालेखक आणि दिग्दर्शक यांच्याविषयी https://www.cinemaazi.com/public/people/r-s-junnarkar या URL वर बरीच माहिती उपलब्ध आहे. या माहितीवरून असे दिसून येते की रघुनाथ जुन्नरकरांचे नाव बऱ्याच गाजलेल्या हिंदी आणि मराठी चित्रपटांशी निगडित आहे. यांमध्ये बहुरानी (१९४०), संगम (१९४१), तुझाच (१९४२), पहिली मंगळागौर (१९४२), पुंडलीक (१९४४), संत बहिणाबाई (१९५३), शाशे (१९५४), बेबी (१९५४) या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून त्यांचा उल्लेख आहे. हे रघुनाथ जुन्नरकर आमच्या नात्यातील होते असे अण्णांनी आम्हाला सांगितले.
दत्तात्रेय
आजोबांच्या वडिलांचे ,
म्हणजे आमच्या पणजोबांचे नाव बळवंत होते. आमचे गोत्र सांख्यायन आहे.(२००८ मध्ये आई गेल्यावर अण्णा माझ्याकडे वर्षभर राहिले होते, तेव्हा अण्णांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या होत्या. हे संदर्भ आईने अण्णा, पुण्याची आत्या आणि अंबरनाथची आत्या यांकडून ऐकले होते ते सांगितले होते. अण्णांनीपण बरेचसे त्यांच्या बहिणीकडून ऐकले होते.)
त्या आधारे ही माहिती सांगितली आहे)
चांगली आर्थिक परिस्थिती
कै . दत्तात्रेय जुन्नरकर, ऊर्फ दत्तात्रेय आजोबा, अण्णांचे वडील, आर्मीत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असावी. कारण दत्तात्रेय आजोबांच्या उजव्या हाताच्या बोटात चार आणि डाव्या हाताच्या एका बोटात भरीव सोन्याची, अशा पाच अंगठ्या होत्या. त्यांच्याकडे सलकडी नावाचा दागिना होता.
पहिल्या पत्नीपासून कन्येची प्राप्ती आणि पहिल्या पत्नीचा मृत्यू
दत्तात्रेय आजोबांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगी होती. (ही आपली अंबरनाथला राहणारी आत्या. ही आपल्या खडकीच्या घरी तिच्या यजमानांबरोबर भेटायला येत असे.) ही मुलगी, म्हणजे अण्णांची सावत्र बहीण, बारा की तेरा वर्षांनी अण्णांपेक्षा मोठी होती. या पहिल्या पत्नीचा नंतर मृत्यू झाला. कारण ठाऊक नाही.
दुसरे लग्न आणि कन्याप्राप्ती
पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दत्तात्रेय आजोबांचे आनंदी बरोबर (अण्णांच्या आई बरोबर) त्यांच्या घरातल्यांनी, बहुतेक काकांनी (अण्णा त्यांचा उल्लेख चुलते असा करायचे). लग्न लावले. आनंदी आजी वडोदऱ्याची राहणारी होती आणि सुखवस्तू घरची होती . आनंदी आजी तब्येतीने नाजूक आणि गोरीपान होती.आनंदी आजीपासून दत्तात्रेय आजोबांना कन्येची प्राप्ती झाली. हिचं नाव माहीत नाही. पण अण्णा हिचा उल्लेख अंबू असा करीत . ही कसबा पेठ, पुणे येथे राहणारी अण्णांची बहीण. (ही अण्णांपेक्षा आठ - नऊ वर्षांनी मोठी होती.)
ऑक्ट्रॉय नाक्यावर नोकरी
लवकरच पहिलं महायुद्ध सुरू होणार होते.[1] दत्तात्रेय आजोबांना घरच्यांनी आग्रह केला ‘आता नोकरी सोडून आमच्याबरोबरच रहा.’ त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती होती. दत्तात्रेय आजोबांनी त्यामुळे आतील नोकरी सोडली. सरकारने त्यांना शेत जमीन दिली होती. नंतर ते ठाण्याच्या ऑक्ट्रॉय नाक्यावर म्हणून नोकरी करू लागले.
मुलगा व्हावा म्हणून नवस
मुलगा व्हावा म्हणून दत्तात्रेय आजोबांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला नवस केला, मुलगा झाला तर त्याचं नाव तुझ्या नावावरून ठेवीन, नवसाची आठवण म्हणून मुलाचे नाक टोचेन आणि वर्षभरात तुझ्या दर्शनाला पंढरपूरला घेऊन येईन, तोपर्यंत त्याला जुने कपडे घालीन. पंढरपूरचा पांडुरंग नवसाला पावला. दत्तात्रेय आजोबा आणि आनंदी आजीला मुलगा झाला (१७ ऑक्टो बर १९२२, तिथीप्रमाणे धनत्रयोदशी). नवसाप्रमाणे मुलाचे नाव ठेवले – पंढरीनाथ. हेच आमचे अण्णा.
दत्तात्रेय आजोबांचा आकस्मिक मृत्यू
अण्णांच्या जन्मानंतर एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. घंटाळी, ठाणे येथील एका विहिरीत दत्तात्रेय आजोबांचा मृतदेह आढळला. या विहिरीत ते विमनस्क स्थितीत असताना अपघाताने पडले की ती आत्महत्त्या होती, हे कळले नाही.
आनंदी आजीचे सासरीच राहणे
दत्तात्रेय आजोबांचा आकस्मिक अकाली मृत्यू आनंदी आजीसाठी फार मोठा आघात होता. आनंदी आजीच्या घरचे (यांमध्ये तिच्या भावांचाही समावेश होता) तिला परत नेण्यासाठी आले. पण आनंदी आजीने आपल्या सासरीच राहणे तिथेच रहाणे पसंत केले.
आनंदी आजीचे आजारपण
त्या काळी बाळंतपणानंतर स्त्रियांची विशेष काळजी घेत नसत. त्यामुळे दोन मुलांच्या बाळंतपणामुळे आणि कदाचित पतीच्या आकस्मिक निधनामुळे आनंदी आजीची तब्येत बिघडली. तिला बाळंत रोग झाला - म्हणजे सतत मासिक पाळी येत असे. मासिक धर्म येणाऱ्या स्त्रीला आजही अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्यावेळी कशी परिस्थिती असेल विचारायलाच नको.
आनंदी आजीला मोठ्या घरातील एका अंधाऱ्या खोलीत ठेवण्यात आले. या खोलीला अतिशय ओल होती. निजण्यास एक गोधडी आणि पांघरण्यास एक गोधडी. खाण्यास शिळ्या भाकऱ्या. या भाकऱ्या सुक्या असल्याने तिला गिळवत नसत. त्यामुळे या भाकऱ्या बऱ्याचदा तिथेच पडून असत. दोन्ही लहान मुले, अण्णा आणि बहीण अंबू, सतत आईला बिलगून असत.
शिळ्या भाकरीचा लाडू
इथे मला अण्णांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. त्यांना लहानपणी शिळ्या भाकरीचा लाडू आवडत असे. परंतु एकदा घरात गूळ नव्हता . त्यामुळे आईने त्यांना गूळ न घालताच लाडू बनवून दिला. त्यानंतर त्यांनी भाकरीचा लाडू खाणं बंद केलं.
आनंदी आजीचा मृत्यू
एका सकाळी अण्णांना त्यांच्या आईपासून दूर केलं. त्यांना आणि त्यांच्या बहिणींना लांबच्या शेजारी पाठवलं, रात्री केव्हातरी अण्णांची आई गेली होती (अण्णा तीन वर्षांचे असताना त्यांची आई गेली असेल तर हे साल १९२५ असावे). आईच्या मृत्यूसमयी अण्णा आईला बिलगून झोपले होते.
दत्तात्रेय आजोबा आणि आनंदी आजी यांनी पांडुरंगास केलेला नवस पूर्ण न करताच जगाचा निरोप घेतला.
चुलत्यांकडील हाल अपेष्टा
आई वडिलांच्या मृत्यूनंतर अण्णांच्या चुलत्यांनी अण्णांना सांभाळण्यास नेले. (यावेळी अंबूआत्या कुठे होती याची आम्हाला माहिती नाही). अण्णांच्या चुलतीने अण्णांना फार त्रास दिला.
अण्णा सांगत, की चुलती म्हणत असे की, हा पांढऱ्या पायाचा आहे. याच्यामुळे याचे आई-वडील गेले. ते अभ्यासाला बसले की चुलती त्यांना मुलं सांभाळण्यास आणून देई. त्यांना अंधाराची फार भीती वाटे. काळोख पडला की मुद्दाम दळण आणण्यास सांगत असे. वालाचं पुष्कळ बिरडं निवडण्यास देत असे. हे बिरडं निवडून झालं नाही, तर जेवायला देत नसे.
टायफॉईडचे दुखणे आणि साईबाबांचा दृष्टांत
याच काळात अण्णांना टायफॉइड झाला. या काळी टाय फॉईडवर उपाय अस्तित्वात नव्हता. टेरामायसिन या टायफॉइडवरील लशीचा नंतर शोध लागला. टायफॉइड मध्ये ताप खूप वाढत जाई आणि नंतर कमी होत जाई. डोक्यावर ओल्या कपड्याच्या घड्या ठेवून ताप वाढू न देणे हा एकच घरगुती उपाय उपलब्ध होता.
अण्णांसारख्या आईवडिलांपासून पोरक्या झालेल्या मुलाकडे लक्ष देण्यात कुणालाच रस नसावा. अशा वेळी चुलत्यांना साईबाबांचा दृष्टांत झाला. साईबाबांनी, ' तुला मुलाची काळजी आहे की नाही' अशा शब्दांत चुलत्यांची कानउघाडणी केली आणि मुलाला जवळ घेण्यास सांगितले. चुलत्यांनी त्यामुळे इतरांचा रोष पत्करून अण्णांना मांडीवर घेतले. अण्णांचा ताप उतरला आणि लवकरच टायफॉइड सुद्धा बरा झाला. धन्य ते साईबाबा !
नाना महाराजांकडे निवास
पुढे अण्णा नाना महाराजांकडे शिकण्यास होते. चुलत्यांकडील कष्टमय कालखंडानंतर नाना महाराजांकडील निवास अण्णांना अतिशय सुखकारक वाटला असावा. कारण ते सदैव नाना महाराजांकडील वास्तव्याच्या आठवणी सांगत असत. नाना महाराजांकडे ते कसे राहावयास आले, किती काळ तिथे होते आणि तेथून कसे बाहेर पडले याविषयी आम्हाला माहिती नाही.
कसबा पेठ, पुणे येथे बहिणीकडे वास्तव्य
लहानपणापासून ते छोटी मोठी कामं करून पैसे कमविण्यास शिकले. अण्णांचे शिक्षण कुठल्या शाळेत झाले याविषयी आम्हाला माहिती नाही. त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले असावे. कारण १९५५ साली लग्न झाले असावे तेव्हा अण्णा मॅट्रिकला बसले होते असे आईने सांगितले. म्हणजे त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले होते आणि ते नोकरी करून शिकले असावे.
अण्णा नंतर त्यांच्या सख्ख्या बहिणीकडे राहावयास होते. अण्णा जसे आई वडिलांच्या मृत्यू नंतर चुलत्यांकडे राहत होते तशी अंबूआत्या कुणाकडे राहत होती, तिचे कसबा पेठेत अण्णांच्या मेहुण्याशी कसे आणि कधी लग्न झाले याविषयी आम्हाला काही माहिती नाही. अण्णा बहिणीकडे सव्वीस वर्षे राहिले असे आईने सांगितले. अण्णांचे लग्न १९५५ मध्ये वयाच्या तेहतीसाव्या वर्षे झाले. म्हणजे अण्णा वयाच्या सातव्या वर्षांपासून अंबू आत्याकडे राहत होते असा निष्कर्ष निघतो.
सुरुवातीला आर्मी मध्ये नोकरी
सुरुवातीला अण्णा मिलिटरी मध्ये नोकरीला होते. मिलिटरीमध्ये असताना ते श्रीलंकेला (त्या वेळचा सिलोन) जाऊन आले होते. नंतर मिलिटरीमधील दिनक्रम त्यांना खूप त्रासदायक वाटायला लागला. म्हणून त्यांनी मिलिटरीची नोकरी सोडली आणि ते खडकी येथील ५१२, आर्मी बेस सिव्हिल वर्क शॉप मध्ये कामाला लागले.
अंबू आत्याच्या संसारास मदत
अंबू आत्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. कारण मेहुणा कसबा पेठेतील एका कापडाच्या दुकानात सेल्समन म्हणून कामाला होता. त्यामुळे अण्णांच्या पगारात बहिणीचे घर चालत होते. पगार झाला की अण्णा तो बहिणीकडे देत असत. दिवाळीचा सण आला की सर्वांबरोबर अण्णांना कपडे घेतले जात. अण्णा सांगत की हे लोक अतिशय भयंकर होते. अण्णांवर त्यांची पाळत असे. ते कुठे पैसे बचत करीत आहेत का यावर त्यांचे लक्ष असे.
विवाह ते निवृत्ती
(१९५५ ते १९८२)
' पंढरीनाथा झडकरी आता ' (विवाह)
आमचे आजोबा कै. शंकर यशवंत राजे तेव्हा कल्याणला राहत. त्यांचे शेजारी आणि मित्र श्री. वढावकर यांनी आजोबांना त्यांची मुलगी सुमती हिच्यासाठी अण्णांचे
स्थळ सुचविले. मुलगा सर्वांस पसंत पडला आणि ७ मे
१९५५ ला अण्णांचा सुमतीबरोबर,
म्हणजे आमच्या आईबरोबर विवाह झाला.
आईचा आवाज चांगला होता. ती एक सारखी जुनी भावगीते व जुन्या कविता म्हणत असे. यांमध्ये पी. सावळाराम यांचे आशा भोसले यांनी गायिलेले ' पंढरीनाथा झडकरी आता ' ती नेहमी गुणगुणत असे. लग्न ठरले तेव्हा कुणीतरी तिला गमतीने म्हणाले. तुम्ही हे गाणे नेहमी म्हणायचा , म्हणून तुम्हाला पंढरीनाथ मिळाले.
राजे घराण्याशी अनुबंध
कै. शंकर यशवंत राजे आजोबा (आईचे वडील) कै. लक्ष्मीबाई शंकर राजेआजी (आईची आई) |
|
लग्नामुळे अण्णांचा राजे घराण्याशी अनुबंध जुळला. ही त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना होती. आजोबा कै. शंकर यशवंत राजे आणि आजी कै. लक्ष्मीबाई शंकर राजे हे अत्यंत सुसंस्कृत आणि प्रेमळ दांपत्य होते.
माझी आई सुमती सर्वांत मोठी. तिला कमल, कुसुम, शाली, लता या बहिणी व दत्तात्रेय (याला नाना म्हणत. त्यामुळे आम्ही त्याला नाना मामा म्हणत असू) आणि रमेश हे भाऊ.
त्यांच्या कुटुंबात त्यांनी एक अद्वितीय स्नेहसंबंध जोपासला होता, त्याने अण्णांचे जीवन उजळून निघाले. लहानपणापासून ते ज्या प्रेमाला, आदराला पारखे झाले होते, ते प्रेम आणि आदर त्यांना राजे कुटुंबाकडून मिळाला.
लौकिक अर्थाने हे श्रीमंत लोक नव्हते. पण त्यांच्या मनाची श्रीमंती फार मोठी होती.या साऱ्यांनी आम्हाला आजारपण, आर्थिक अडचणी अशा सर्व प्रसंगांमध्ये मदत केली.
अजब
लोक -
कसबा पेठ, पुणे
कसबा पेठेतील घरात अंबूआत्या, तिचे यजमान आणि त्यांची मुले (किती ते माहीत नाही) अण्णांना पंढरीमामा म्हणत असत. अंबूआत्या स्वयंपाक करण्यात सुगरण होती. पुरणपोळ्या ही तिची स्पेशालिटी होती. आई-अण्णांच्या लग्नानंतर आजी-आजोबा कसबा पेठेतील घरी राहण्यास आले होते. त्यावेळी अंबूआत्याने त्यांची चांगली बडदास्त ठेवली होती.
संध्याकाळ झाली की घरात भांडणं सुरू होत. आई सांगत असे की हे लोक करण्या करीत. कदाचित त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा भरून राहिली होती. एक प्रसंग तर आईने आम्हाला अजब सांगितला. एकदा संध्याकाळी देव्हाऱ्यातील एक नारळ आपोआप उडाला आणि त्या लोकांच्या डोक्यांवर आळीपाळीने आपटत होता. नंतर तो उंबऱ्यात पडला आणि त्याचे मधोमध दोन भाग झाले. त्यात स्वच्छ पांढरं खोबरं होतं. आम्ही आईला म्हणत असू की, तू काहीतरी सांगते. पण आई म्हणत असे, हे खरं आहे.
अण्णा सांगत असत की ते शक्यतो घराबाहेर राहणं पसंत करीत.
पगार झाला की अण्णा अंबूआत्याच्या हातात देत . अण्णांच्या पगारात घर चालत असे. खर्चासाठी अण्णा अंबूआत्याकडून पैसे मागून घेत. दिवाळी आली की मेहुणा अण्णांना विचारीत असे,'पंढरी, तुला काय घ्यायचं?' बहुतेक शर्ट-पॅंट शिवण्यात येई.
अंबूआत्या सतत अण्णांकडे आईबद्दल तक्रारी सांगत असे.
दादा आणि शामा सांगतात, की एकदा दिवाळीसाठी आईला माहेरी नेण्यासाठी नानामामा आला होता. अण्णांच्या घरचे लोक आईला पाठवण्यास तयार नव्हते. त्यावेळी नेमकं काय झालं मला माहीत नाही. माझ्या आठवणीप्रमाणे आईने मला सांगितलं होतं की अण्णांनी आईला ढकलून दिलं. आई पडली आणि आईच्या डोक्याला खोक पडली. नानामामाला त्यामुळे फार राग आला. नानामामा आईला घरी घेऊन आला.
पुढे अण्णा आईला नेण्यास आले. आजोबांनी वेगळं होण्याच्या अटीवर मुलीला पाठवण्याची तयारी दाखवली.
आता वेगळं होण्याचा निर्णय घेण्यात आला. मेहुणा म्हणाला, 'एवढे दिवस राहिला, खाल्लं, प्यालं, आता काय द्यायचं?' आई सांगते, 'अंगावरच्या कपड्यांनिशी आम्ही घराबाहेर पडलो. सव्वीस वर्षं बहिणीचा संसार करून अखेर डबड्या-गाडग्यांनिशी संसार सुरू केला.' पहिल्या भाड्याच्या घरासाठी आजोबांनी डिपॉझिट भरलं.
सव्वीस वर्षं ज्यांच्याबरोबर राहिलो, त्यांना सोडल्यामुळे अण्णा अस्वस्थ होते. त्याबरोबरच हे लोक आपल्या मागावर येतील अशी अण्णांना भीती होती. अण्णा सांगत असत की हे लोक भयंकर होते. अण्णांवर ते सतत पाळत ठेवून असत. अण्णा कुठे पैसे सेव्हिंग करून ठेवत आहेत का यावर त्यांचे लक्ष असे. अण्णा झोपेत दचकून जागे होत. त्यांना झोपेत सुरा घेऊन मारायला येणारा मनुष्य दिसे. आई त्यांना धीर देत असे.
आई सिंह राशीची असल्यामुळे का होईना, आईचा स्वभाव करारी होता. आईने आयुष्यात पुन्हा कधी त्या लोकांशी संबंध जोडला नाही. आई नंतर हॉस्पिटलमध्ये असताना अंबूआत्या म्हणे आईला पाहायला आली होती. नंतर मी नानामामाकडे मुंबईला कॉलेजच्या शिक्षणासाठी असताना (१९७५-१९७९) आजीने मला बातमी दिली की आत्या गेली म्हणून.
आजीचं तिच्याबद्दल वाईट मत नव्हतं. आजी म्हणाली की, ' ती मला म्हणाली होती की , पंढरीला चांगली माणसं मिळाली. तिला कोणीतरी खायला घातलं. भाग्यवान होती, सवाष्ण गेली.'
अंबूआत्याच्या जाण्यामुळे अण्णांच्या आयुष्यातील एक अध्याय संपला. आई सांगत असे की, तिने घर सोडताना एकदाच निर्णय घेतला, सासरची माणसं की आपली माणसं. मी ठरवलं की आपली माणसं आपण सोडायची नाहीत.
आईचा निर्णय बरोबर होता हे पुढील घटनांवरून सिद्ध झालं. त्या घरात राहून आमचं आयुष्यही अंध:कारमय झालं असतं.
पण त्याचबरोबर मला अण्णांविषयी एक निरीक्षणही नोंदवलं पाहिजे. आई अण्णांच्या कसबा पेठेतील वास्तव्याबद्दल अण्णांना बरेच टोमणे मारत असे. त्यापाठी तिला मारल्याचा राग साहजिक होता. पण अण्णांनी कधी मागे वळून पाहिलं नाही की 'मी तिथेच राहिलो असतो तर बरं झालं असतं' अशी भूमिका घेतली नाही. आपली बायको, मुलं आणि संसार यांत त्यांनी सर्वस्व झोकून दिलं.
सोमवार पेठ, पुणे येथील जागा
सोमवार पेठेतील जागेबद्दल मला फारसं आठवत नाही. पण ही जागा फार अंधारी होती आणि जागेला ओल होती. त्यामुळे एक सारखं आजारपण येत असे असं अण्णा सांगत. सोमवार पेठेतील जागेत दादाचा (१५/९/१९५६) आणि माझा (१६/१२/१९५९) जन्म झाला.
तळेगावची जागा
सोमवार पेठेतील जागा सोडून आम्ही तळेगावला आलो. तळेगावला येऊन तब्येत सुधारली, असं अण्णा म्हणत. तेव्हाचे, म्हणजे १९६१-६२ चे तळेगाव, म्हणजे अगदी खेडेगाव होते. आमचं तळेगावातील घर दोन खोल्यांचं होतं. दिवाणखान्याच्या खोलीचा निळा रंग मला आठवतो. घरासमोर पडवी होती. आमची कोपऱ्याची खोली होती. त्यामुळे लागूनच बसण्यासाठी दगडी कट्टा होता. घरातून बाहेर पडलं की मोठा रस्ता होता आणि या रस्त्यावर सतत रहदारी असे. रस्त्यापलीकडे गिरणी होती.
तळेगावला पाण्याचा त्रास होता. कावडवाला पाणी आणून द्यायचा. संडास खूप लांब होतं आणि संडासला जाण्यासाठी शेताडी तुडवीत जायला लागायचं. त्यामुळे रात्री संडासला जाणं त्रासदायक होतं. आम्हा लहान मुलांची सोय रस्त्याच्या कडेला होत असल्याने मी संडासपर्यंत गेलो नाही. अण्णांचं ऑफीसला जाणं खूप त्रासदायक होतं. तेव्हा गाड्याही खूप कमी होत्या. एकदा तर ते रात्री दोन वाजताच स्टेशनवर गेले आणि गाडीची चौकशी करू लागले. स्टेशनमास्तर म्हणाला, 'अजून रात्र आहे. आता झोपा स्टेशनवरच.' एकदा आमचे आजोबा (आईचे वडील) राहायला आले. अण्णांचे हाल बघून ते म्हणाले, ' तुम्ही सगळे महालात राहता. ते तिकडे हाल काढतात. ऑफीस जवळ जागा पहा.'
पुढे १९६२ मध्ये भारत चीन युद्ध सुरू झालं. अण्णांना ओव्हरटाइम सुरू झाला. त्यामुळे खडकीला जायचं ठरलं. अण्णांचा नायडू नावाचा एक मित्र होता, त्याच्या गोपीचाळीतील जागेत पोट भाडेकरू म्हणून. निघताना दणाईत अण्णांना सांगत होते,' जागा सोडून पस्तावाल.' पुढे गोपीचाळीतील पाण्यावरून भांडणं, शेजाऱ्यांचा त्रास बघून अण्णा वारंवार म्हणत 'तळेगाव सोडून पस्तावलो.'
तळेगावला शामाचा जन्म झाला (३/९/१९६१). शिवाय दीदीमावशी बाळंतपणाला आमच्याकडे आली होती. त्यामुळे सुधीर-सुशील, या आमच्या जुळ्या मावसभावांचा जन्म तळेगावचा (३०/४/१९६१).
पाण्यासाठी दाही दिशा
तळेगावच्या जागेत पाण्याची समस्या होती, परंतु कावडवाला पाणी आणून देत असे. गोपीचाळीत आम्ही राहायला आलो तेव्हा पाण्याची कुठलीच सोय नव्हती. एक पोर्टर चाळ म्हणून होती, तिथून पाणी आणावे लागे.
पुढे आमच्या चाळीत घरमालकाने पाण्याचे कनेक्शन घेतले आणि नळ आला. हा नळ आमच्या चाळीतच पण आमच्या घरापासून दूर होता. इतक्या घरांमध्ये पाण्याचा एक नळ पुरेसा नव्हता. पाणी सकाळ संध्याकाळ ठराविक वेळी येई. बऱ्याच वेळा पाण्याची धार अगदी बारीक असे. उन्हाळ्यात तर फार वाईट परिस्थिती असे.
मग पाण्याचे रेशनिंग सुरू झाले. नळासमोर आपला नंबर म्हणून पाण्याचं एक भांडं ठेवावं लागे. पाणी किती न्यायचं ते ठरवून दिलं जाई. इथपर्यंतही ठीक होतं. पण खरा भयंकर प्रकार पुढे सुरू झाला. सर्वांनी संगनमताने आम्हाला पाणी मिळू द्यायचे नाही, असा जणू अलिखित कट केला.
खडकी येथील गोपीचाळीतील जागा
आमच्या चाळीत कुलकर्णी म्हणून एक कानडी गृहस्थ राहत होते. आम्ही त्यांना कुलकर्णीमामा किंवा नुसते मामा म्हणत असू. त्यांची आई होती. पूर्वीच्या काळात पतिनिधनानंतर स्त्रीचे वपन केले जाई. कुलकर्णींच्या आईचे वपन केले होते आणि ती डोक्यावर पदर घेई. चाळीत बरेच कानडी लोक होते. या बायका आपसात कानडीत आमच्याविरुद्ध बोलत. ही कुलकर्ण्यांची आई लावालाव्या करीत असे , असं आई-अण्णांचं म्हणणं होतं. एकदा तर तिने आपसातच पाण्याचा नंबर फिरता ठेवून आठवडाभर आम्हाला पाणी मिळू दिलं नव्हतं.
मी चार-पाच वर्षांचा होतो. शामा माझ्याहून दोन वर्षांनी लहान. घरात वीज नव्हती. कंदिलाचा उजेड भयाण वाटायचा. अण्णांना बहुतेक ओव्हरटाइम होता. त्यामुळे त्यांना यायला उशीर व्हायचा. आईला पाण्याच्या विवंचनेत नळावर चकरा टाकायला लागायच्या. दादा तेव्हा शिकायला नानामामाकडे मुंबईला होता. मी आणि शामा आईची पाठ सोडत नसू.
आमच्या शेजारी एक उडुपी कुटुंब राहायला आलं होतं. हे गृहस्थ मला आठवतात, पण त्यांचं नाव मला आठवत नाही. त्यांच्या बायकोचं नाव इंदिरा का इंद्रा होतं. आम्ही तिला इंद्रामावशी म्हणत असू. ही बाई चांगली खमकी होती आणि चाळीत सर्वांना पुरून उरली होती.
एकदा अशीच दिवेलागणीची वेळ झाली होती. अण्णा घरी आले नव्हते. आई हताशपणे नळावर कमरेवर हात ठेवून उभी होती. समोर चाळकरी पाणी भरत होते. पण आईला पाणीच मिळू देत नव्हते. अचानक तिथे इंद्रामावशी तरातरा आली आणि आईला म्हणाली, 'असं कमरेवर हात ठेवून कुणी पाणी मिळू देणार आहे का?' नळाला ज्या कुणाचं भांडं होतं ते तिने सरळ काढून टाकलं आणि आईचा हंडा नळाला लावला. तिला काही बोलण्याची कुणाची हिंमत झाली नाही.
इंद्रामावशीचे कुटुंब जागा सोडून गेले आणि आईचा एक आधार गेला. पुढे घडलेला एक प्रसंग तर एवढा भयंकर आहे की त्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही आणि कुणाला सांगण्याची हिंमतही होणार नाही.
शनिवारचा दिवस होता. संध्याकाळची वेळ होती. अण्णा नळावर गेले होते. आम्ही जेवण्याच्या तयारीत होतो. तोंडात घास घालणार इतक्यात कळलं की नळावर अण्णांशी कुणीतरी भांडतं आहे. कोपऱ्यात एक मुसलमान बाई राहत होती. तिचे नाव फातिमा होते. तिच्या मुलीचे नाव बिस्मिल्ला होते. म्हणून आम्ही मुलं तिला बिसमिल्लाची आई म्हणत असू. ही बाई तशी वाईट नव्हती. ती त्या दिवशी तशा प्रकारे का भांडली माहीत नाही.
फातिमा अण्णांना पाणी भरू देईना. तिने सरळ अण्णांच्या डोक्यात हंडा मारला. अण्णांनी नळ घट्ट धरून ठेवला. नळ वाकडा झाला. मग फातिमाने सरळ घरी जाऊन कपडे फाडले, अण्णांवर अब्रू लुटण्याचा आळ घेता यावा म्हणून. तिचा नवरा का कुणीतरी गेलं दोन चार गुंड अण्णांना मारण्यासाठी घेऊन आले.
चाळीतील आणखी लोक गोळा झाले. आमचे एक खान म्हणून शेजारी होते. ते मध्ये पडल्याचं म्हणतात, ते मला आठवत नाही. मी नळावर गेलो तेव्हा कुलकर्णीमामा मला आठवतात. ते त्या गुंडांना परत पाठवत होते,'आमच्यातील प्रश्न आम्ही सोडवू. बाहेरच्यांनी येण्याची गरज नाही,' असं ते म्हटल्याचं मला आठवतं. त्या दिवशी अण्णांनी नळ लढवला आणि पाणी मिळवलं.
त्यामुळे आई-अण्णांनासुद्धा कळलं, की जशास तसे राहिल्याशिवाय येथे आपला निभाव लागणार नाही. पण काही झालं तरी आम्ही पांढरपेशे , अब्रूला भिणारे लोक होतो. या लोकांशी भांडणं आमच्या आवाक्यातील गोष्ट नव्हती. त्यामुळे दुसऱ्या जागेचा शोध चालू ठेवला. आणखी कुठून पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न चालू केला.
आमच्या घरासमोर मुंबई-पुणे रस्ता ओलांडला की 'विकास इंजिनिअरिंग ' म्हणून एक वर्कशॉप होता. त्याच्याकडे पाण्याचा नळ होता. अण्णांनी त्याला विचारलं. त्याने महिना पाच रुपये घेऊन पाणी द्यायचं कबूल केलं. मग अण्णा रोज तेथून पंधरा लिटरच्या दोन बादल्या हातात घेऊन रस्ता ओलांडून पाणी आणायला लागले. आम्ही घागरी वगैरे घेऊन त्यांना मदत करीत असू.
मग कुलकर्णीमामांनी पुढाकार घेतला, खाजगी नळ घेण्यासाठी. ज्यांना इच्छा होती त्यांनी त्या वेळी चाळीस रुपये वर्गणी काढली आणि वेगळे नळाचे कनेक्शन घेतले. त्यामुळे पाण्याचा त्रास कमी झाला इतकेच. कुलकर्णी आजींचे एव्हाना देहावसान झाले होते. पण आमच्याशी भांडण्यासाठी नवे भिडू तयार होत होते.
एकदा तर आमच्या घरी काही कारणाने आईने पार्टी दिली. चाळीतील सगळे लोक आमच्या घरी खाऊन पिऊन गेले. त्या दिवशी मध्यरात्री पाणी आलं. सर्वांनी पाणी भरून घेतलं. आम्हाला कुणीच उठवलं नाही. दुसऱ्या दिवशी पाणी आलं नाही.
मुंबईहून पाहुणे आले की त्यांनाही नळावरून पाणी आणावे लागे. दिवाळी आली की पाण्याची तजवीज बघावी लागे. घरात पाणी नसेल तर कसली आली दिवाळी ? कुठे बाहेर जायचं असेल तर आधी घरात पाणी भरून ठेवावे लागे. रमेशमामाने पाण्यासाठी मोठा ड्रम पाठवला.
मी १९७५ नंतर कॉलेजच्या शिक्षणासाठी नाना मामाकडे गेलो. घरात नळ घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि अखेर घरी नळ आला.
आज वाटते की कसे हे गोपीचाळीतील लोक होते ! पाण्यासारखी क्षुल्लक गोष्ट. बरं एकदा घरात पाणी भरलं की त्याचं काय अप्रुप? पण सहा बादल्या ठरल्या की कौशल्याने सातवी बादली न्यायची. त्यातही गोपीचाळीचे डिटेक्टिव्ह तयार होते. ते ही पाण्याची चोरी पकडायचे. पाण्यावरून लोक हाणामाऱ्यांवर यायचे. श्रीव्यंकटेश स्तोत्रामध्ये एक श्लोक आहे,' अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरवीसी जगदीशा.' आम्ही मात्र 'पाण्यासाठी दाही दिशा, आम्हा फिरवीसी जगदीशा' असा दाहक अनुभव घेतला.
५१२ वर्कशॉप मधील नोकरी
५१२ वर्कशॉप मध्ये युद्धात निकामी झालेले रणगाडे दुरुस्तीला आणत. आमच्या घरापासून ५१२ वर्कशॉप खूप दूर होता. त्यामुळे अण्णांना दूर चालत जावे लागत असे. ऑफीसला पोहचण्याचा सर्वांत शॉर्ट कट म्हणजे आमच्या घरामागून जाणारी रेल्वे लाईन. या रेल्वे लाइनच्या खडीतून चालणे सोपे काम नव्हते आणि बाजूला झोपडपट्टी असल्याने चालायला जागा कमी होती. आमच्या शाळेस जाण्याचा शॉर्ट कट ही हाच होता. फक्त आम्ही लक्ष्मणराव किर्लोस्कर पथ (तेव्हाचा एल्फिन्स्टन रोड) ला उजवीकडे शाळेकडे टर्न घेत असू. अण्णा पुढे जात असत. ही रेल्वे लाइन अण्णांच्या ऑफीसपर्यंत जात असे. आठच्या ऑफीसला जाण्यासाठी अण्णा पावणे आठला रेल्वे लाइनमधून धावण्यास सुरुवात करीत. डबा कधी असे, कधी नसे. कधी केवळ चहाबरोबर चपाती खात असत. अण्णा गुरुवारचा उपासही करीत.
संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अण्णा घरी येत. शनिवारी अर्धा दिवस असे. त्यामुळे दुपारी दोनपर्यंत घरी येत. अण्णांच्या ऑफीसमध्ये कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार केला जात असे. त्यावेळी आम्ही अण्णांच्या ऑफीसमध्ये जात असू. दसऱ्याला यंत्रांची पूजा होत असे. दसऱ्याच्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या परिवाराला आणण्याची परवानगी असे. त्यामुळे दसऱ्याला सुद्धा आम्ही सर्वजण अण्णांच्या ऑफीसमध्ये जात असू.
ही नोकरी अण्णांच्या स्वभावाला साजेशी नव्हती. पण अण्णांनी आपल्यावरील संसाराची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ही नोकरी पूर्ण केली. सरकारी नोकरीचा तोटा हा होता की पगार अतिशय कमी होता, ग्रोथ काही नव्हती, ॲम्युनिशन फॅक्टरीत ओव्हरटाइम मिळत असे, ५१२ मध्ये ओव्हरटाइमसुद्धा नव्हता. आम्ही एकत्र बसलो की अण्णांना बोलत असू त्या वेळी तुम्ही या कंपनीत नोकरीला लागला असता तर आता किती मोठ्या पोझिशनला असता. अण्णांनी या आर्ग्युमेंटला कधीच उत्तर दिलं नाही. सरकारी नोकरीचं बेनिफिट होतं - सुरक्षितता. आमच्या आजूबाजूस कितीतरी बातम्या यायच्या की कंपनीने माणसं कमी केली आणि अमुक अमुक घरी बसला. घरातील आजारपणं आणि इतर त्रास बघता खाजगी कंपनीतील नोकरी टिकणं कठीण होतं. पगार कमी होता, दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची नामुष्की येत होती , परंतु नोकरी जाण्याची लाचारी कधी आली नाही. अण्णांनी याच कारणामुळे आपल्या नोकरीला कधी नावं ठेवली नाहीत. याबद्दल आम्हाला ५१२ चे ऋणी राहिले पाहिजे. एक आश्चर्यकारक योगायोग म्हणजे मला एस एस सी ला पडलेले मार्क्स ७०० पैकी ५१२ होते.
अण्णांना अगदी शेवटी प्रमोशन मिळालं. काय प्रमोशन होतं, माहीत नाही. पगार नाममात्र वाढला. पण काम बघता ते प्रमोशन मिळालं नसतं तर बरं झालं असतं असं आम्हाला वाटलं. कारण या कामामध्ये टायर उचलणं वगैरे कामांचा समावेश होता. अण्णांसारख्या माणसाला दुसऱ्याकडून काम करवून घेणं कठीण होतं. त्यामुळे ही कामं ते स्वतः करीत असावेत. त्यातून त्यांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला.
१९८२ मध्ये अण्णा वयाच्या साठाव्या वर्षी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीच्या वेळी कर्नलने अण्णांना विचारलं, 'आर यू रिअली सिक्स्टी?' ५१२ मधील कामाचं प्रतीक म्हणून एक रणगाड्याची छोटी प्रतिकृती आणि एक टाइम पीस (बहुतेक सहकाऱ्यांतर्फे ) भेट देण्यात आले.
गोपीचाळीतील हातभट्टीचा व्यवसाय
गोपी चाळीतील वस्ती आणि तेथील पाण्याचा त्रास यांचा वर उल्लेख आला आहे. गोपी चाळी दोन होत्या-एक आम्ही जीत राहत होतो आणि दुसरी बाजूला आणखी एक होती ती. या चाळीत शामराव गायकवाड म्हणून एक मनुष्य राहत होते. त्याचं टेलरिंगचं दुकान होतं. पण ते नावालाच होतं. त्यांचा आणि त्यांच्या बायकोचा, तुळसाचा, खरा व्यवसाय होता हातभट्टीची दारू गाळण्याचा. जोपर्यंत तो त्याच्या घरी हा व्यवसाय करीत होता, तोपर्यंत आमचा काही संबंध नव्हता. पण त्याचं घर मुंबई-पुणे रस्त्याजवळ होतं. त्यामुळे पोलीसांना वॉच ठेवण्यास सोपं होतं. आमचं घर कोपऱ्यात आणि रस्त्यापासून दूर होतं. त्यामुळे तसं सेफ होतं. त्यामुळे त्याने विक्री आमच्या घरासमोर मूव्ह केली. घरात त्यामुळे दारूची असह्य दुर्गंधी येऊ लागली. एरवी चांगले वाटणारे लोक जेव्हा दारू घेण्यास येऊ लागले, तेव्हा त्यांच्या सभ्यतेची कल्पना येऊ लागली. एक तर आमच्या चाळीतील एक गृहस्थ (नाव लिहीत नाही), आमच्याशी ही विक्री तेथून हलवण्याबद्दल आमच्याबरोबर सहानुभूतीपूर्वक बोलून गेले, तेच दारू घेण्यास आलेले दिसले, तेव्हा ते ओशाळले.
एकदा मी घरात एकटाच होतो. मी तेव्हा कॉलेज शिक्षणासाठी नानामाकडे होतो (१९७५-७९) आणि सुट्टीत घरी आलो होतो. पोलीसांची धाड आली आणि दारूचे हंडे घेऊन ते लोक आमच्या घरात घुसले. मी त्यांना आमच्या घरात येऊ नका म्हणून सांगत होतो, पण ते जबरदस्तीने घरात घुसले. नंतर आमचे खान (पूर्ण नाव, करीम खान नन्हे खान)म्हणून शेजारी घरी आले ( हे सुद्धा तुळसा बाईंच्या गुत्त्यात लावीत असतच) आणि माझ्यावर तोंडसुख घेऊ लागले, की त्यांना घरात का येऊ दिलं. मुद्दा बरोबर होता. पण ते लोक जबरदस्तीने घुसले होते. खान म्हणाले , पोलीस जर घरात आले असते तर त्यांना सोडून आधी तुम्हाला उचलून नेलं असतं. कारण पोलीसांना खरे गुन्हेगार शोधण्यापेक्षा बळीचे बकरे हवे असतात. प्रसंग खरोखरच बाका होता अगदी हिंदी चित्रपटासारखी कथा झाली.
हा व्यवसाय आम्ही गोपीचाळीतील जागा १९८४ साली सोडतानाही आमच्या घरासमोरच चालू होता. मला वाटतं तेव्हा ते फक्त आमच्या इथे बलून्स लपवायचे . विक्रीची जागा बदलली होती. कारण मी अंगणातच सी ए च्या अभ्यासाला बसत असे. त्या वेळी समोरच बलून्स मधून भांड्यात दारू ओतणं पाहत असे. सी ए च्या अभ्यासात हाही एक स्ट्रेस रिलीव्हर ! सी ए झाल्यावर त्यांना काही टॅक्सचं वगैरे काही काम आहे का , विचारायला हवं होतं . कारण माझा एक मित्र ज्याच्याकडे आर्टिकलशिप करीत असे, त्याचे देशी दारूचे (अशा बेकायदा दारूचे नाही) दोन तीन क्लायंट्स होते. त्या सी ए ने लवकरच मारुती कार घेतली
गोपीचाळीतील आव्हानात्मक जीवन आणि मुख्य घटना
गोपीचाळीत वस्ती चांगली नव्हती. परंतु अशा वस्तीत सुद्धा आई-अण्णांनी आमच्यावर चांगले संस्कार केले. आम्हा मुलांना गणपति अथर्वशीर्ष, रामरक्षा, हरिपाठ शिकवले.
घरी कायम आईचं आजारपण असे. त्यामुळे अण्णा घरातील काम पाहणं, आईची देखभाल करणं, मुलांच्या शाळा अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत असत. याच वेळी अण्णा स्वयंपाक शिकले. अण्णा स्वयंपाक चांगला करीत.
मुख्य घटना:
शालीमावशीचे देहावसान: आमचे आजी आजोबा, मामा-मावश्या मुंबईमध्ये राहावयास राहत होते. पुण्यामध्ये दिलेली एकच मावशी होती - शालीमावशी. या शालीमावशीचा सासरी खूप छळ होत असे. बाळंतपणा मध्ये के. ई. एम हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं होतं. तब्येत क्रिटिकल होती. पण सासरचे औषधपाण्यावर खर्च करायला नव्हते. अशा प्रकारे बाळंतपणा त तिची अखेर झाली. या वेळी आई-अण्णांना बरीच धावपळ करावी लागली होती. शालीमावशी गेली तो १९६५ चा हिवाळा असावा. कारण अण्णा तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी असलेल्या कडाक्याच्या थंडीचे वर्णन करीत असत. माझ्या दुर्दैवी मावशीस माझी भावपूर्ण श्रद्धांजली !
सचिनचा जन्म:- २५/७/१९६९ ला डॉ. कानिटकरांच्या चिंचवड हॉस्पिटलमध्ये सचिनचा जन्म झाला.
शिक्षण :- खडकीला आलेगावकर शाळेमध्ये दादाचे, माझे आणि शामाचे शिक्षण पूर्ण झाले. (मुलींच्या शाळेचे नाव गुलुबाई मुलु क इराणी कन्याशाळा असे होते.) आम्ही १९८४ मध्ये चिंचवडला राहायला गेल्यामुळे सचिन १० वी पर्यंत आलेगावकर शाळेमध्ये शिकला तर एस एस सी चे वर्ष त्याने चिंचवडच्या फत्तेचंद जैन शाळेमध्ये केले.
ऑपरेशन्स:- अण्णांना आमच्या ऑपरेशनचा खर्च ऑफीसकडून मिळत असे. पण ऑपरेशनसाठी पुण्याला के ई एम हॉस्पिटलमध्ये जावे लागत असे. खडकीला असताना सर्वांत पहिले ऑपरेशन सचिनचे झाले. हे ऑपरेशन हर्नियाचे होते. ऑपरेशन झाले तेव्हा तो अगदी लहान होता. नंतर दादाचे, माझे टॉन्सिल्सचे आणि माझे पाइल्सचे (१९८०) ऑपरेशन झाले.
आईचं ऑपरेशन बहुतेक डिसेंबर १९७१ मध्ये झालं असावं. कारण त्या वेळी बांगला देश युद्ध चालू होतं हे मला आठवतं. कारण आई सतत आजारी असे. तिच्या दुखण्याचे निदान होत नव्हते. यामुळे आजी-आजोबांना गिल्टी वाटत असे. एकदा आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईला गेलो असताना आजोबांनी आईला तेथील चांगल्या डॉक्टरला दाखवून बरीच औषधे आणली. पण त्यामुळेही काही फरक पडला नाही. मग एकदा के ई एम हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्यांनी ऑपरेशन केलं आणि त्यानंतर आईला कुठलंच आजारपण झालं नाही. आई आम्हाला सांगत असे की, ' तुमच्यासाठी मी मृत्यूच्या दारातून परत आले.'
निवृत्तीनंतर
(१९८२ ते २०१४)
वास्तव्य;- खडकीच्या जागेतून आम्ही सर्व चिंचवड गावात तानाजीनगर येथे जागा घेतली. नंतर लग्नानंतर मी सुदर्शन नगर चिंचवड येथे जागा घेतली. दादाने औंध येथे जागा घेतली. मीही नंतर चिंचवडची जागा सोडून औंधला जागा घेतली. आई-अण्णा दापोडीला राहत होते. ते नंतर मिरा रोडला शामाच्या जागेत राहायला आले आणि मग अखेरपर्यंत मिरा रोडमध्येच होते. मीही मुंबईला नोकरी पाहून १९९५ मध्ये मिरा रोडला राहावयास आलो. दादा त्याच्या कंपनीचे रॅपिकटचे ऑफीस शिफ्ट झाल्यामुळे काही वर्षे अहमदाबाद आणि भरुच येथे होता. नंतर तो पुण्यास परत आला. त्याने नंतर औंधलाच मोठी जागा घेतली.
मुलांची लग्नें, नातवंडे:- दादा - नूतनचं ---मध्ये लग्न झालं. १९८७ मध्ये जाई झाली. जाईच्या जन्माच्या वेळी पुन्हा आमचा के ई एम हॉस्पिटलशी संबंध आला. २००६ मध्ये एका आजारपणात नूतनवहिनीचं देहावसान झालं. माझं - वर्षाचं १९८९ मध्ये लग्न झालं. १९९२ मध्ये अद्वैत झाला. शामा-जोसेफचं -- मध्ये लग्न झालं. -- मध्ये नील झाला. सचिन सुनंदाचं २००५ मध्ये लग्न झालं. २००८ मध्ये प्रांजळ झाली.
माझं ऑस्ट्रेलियात स्थलांतर:- माझ्या नोकरीमध्ये खूप सॅच्युरेशन आलं होतं. ना नोकरीत काही प्रगती होत होती, ना दुसरा जॉब कुठे मिळत होता. माझा मावसभाऊ सुशील ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाला होता. त्यामुळे मीसुद्धा ऑस्ट्रेलियात नोकरीसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. २००५ मध्ये वर्षा आणि अद्वैत ऑस्ट्रेलियात गेले ते तेथेच राहिले. मी २०११ मध्ये पर्मनन्टलि ऑस्ट्रेलियाला मूव्ह झालो.
अण्णांचे निवृत्तीनंतरचे जीवन:- निवृत्तीनंतर अण्णांचे गॉल ब्लॅडर चे ऑपरेशन के ई एम हॉस्पिटलमध्ये झाले. १९९५ मध्ये मिरा रोडला असताना त्यांना स्ट्रोक आल्यामुळे मिरा रोडला डॉ. पवारांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. प्रोस्ट्रेटचा वयोमानाप्रमाणे त्रास होत होता. ब्लड प्रेशरचा त्रास होता. त्यांची औषधे ते नियमित घेत आणि शक्यतो आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये याची ते काळजी घेत.
निवृत्तीनंतर अण्णांचा वेळ धार्मिक वाचन, घरकामात मदत करणे यांत जाऊ लागला.
अण्णा सर्व नातवंडांचे लाडके होते. कारण अण्णांकडे गोष्टींचा मोठा खजिना होता.
२००८ मध्ये आई गेली. हा अण्णांना फार मोठा धक्का होता. त्रेपन्न वर्षांची सोबत संपली होती.
अण्णांच्या आठवणी
आकाशाचे ओझे त्यांना नाही कधीच पेलले
पण आपल्या पाखरांवर कुठले ओझे त्यांनी नाही कधीच टाकले
स्वतःसाठी कुणाकडे नाही काही मागितले
पण पाखरांच्या चोचीत घास भरविण्यास कितीदा हात पसरले
फसले कितीदा पण नाही फसवले कुणा
संकटांच्या वादळात नाही सोडला प्रामाणिकपणा
उघडले ज्ञानाचे भांडार, दाखवला मार्ग भक्तीचा
सुगंध दरवळे जीवनात वडिलांच्या स्मृतींचा
७ तारीख
'आज ७ तारीख. अण्णांचा पगार.' आम्हा भावंडांचे चेहरे अतिशय खुललेले असत. कारण ७ तारखेस अण्णांचा, पगार होत असे. पगारास अण्णा भरपूर मिठाई घेऊन येत. शाळेत गेल्यावरसुद्धा आम्ही संध्याकाळच्या मिठाईची स्वप्नं रंगवत असू. शाळेतून घरी येताना दप्तराचं ओझंसुद्धा हलकं वाटत असे.आता मागे वळून पाहताना वाटते की या मिठाई आणण्यामागे काही विचार नव्हता का? दोनशे रुपये पगारात महिना कसा जाईल याचा विचार न करता एवढी मिठाई घेऊन येण्याचे कारण काय? केवळ मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान. आज कुठेही, कुणाच्या घरी गेलं तरी चांगल्या खाद्यपदार्थांबद्दल आसक्ती वाटत नाही. इतके या सात तारखेच्या मिठाईने आमचे मन अण्णांनी तृप्त करून टाकले आहे.
आई अण्णांनी लहानपणी आपल्याला सगळं खायला घातलं त्यामुळे आपल्याला काही इच्छा राहिली नाही पण त्यासाठी त्यांनी काय काय केलं ते आता आपल्याला जाणवतं. अण्णा कामावरनं आले की मी अगोदरच दुडक्या चालीने धावत घरी वर्दी देत असे "अण्णा आssssले, अण्णा आssssले" ते घरी आले की त्या़ंच्याभोवती थोडे घुटमळून मग मी परत बाहेर खेळायला जायचो. त्यांचा प्रश्न ठरलेला असायचा काय झालं शाळेत आज .... सात तारखेला पगार झाला की ते थोडी थोडी सगळी मिठाई आणायचे मग दुसर्या दिवशी डब्यात बालूशाही, माहिम हलवा वगैरे डब्यात न्यायला गंमत वाटायची.
पाडव्याचे श्रीखंड
आमच्याकडील गुढीपाडवा चितळे किंवा काका हलवाई कडून श्रीखंड आणल्याशिवाय साजरा होत नसे. सकाळी पी एम टी बसने पुण्याला जाऊन हे श्रीखंड मी आणलेले मला आठवते. श्रीखंडासाठी रांग असे. बरोबर डबा घेऊन जावा लागे. पूर्वी रॉकेलचे चौकोनी पत्र्याचे मोठे डबे असत. अशा डब्यात चितळे किंवा काका हलवाई पिवळे धमक घट्ट श्रीखंड घेऊन बसलेला असे. डब्यात श्रीखंड भरले की वर तो चारोळ्या पेरत असे. हे मधुर श्रीखंड चपातीबरोबर खाल्ले की पाडवा साजरा झाल्यासारखे वाटे. परंतु त्या पाडव्याला परिस्थिती फारच बिकट होती. श्रीखंड काय, चपाती बनवण्यासाठी घरात कणिक सुद्धा नव्हती. परंतु मुलांसाठी श्रीखंड चपाती करायचीच हे आईअण्णांनी ठरवले होते. अण्णांनी कुठूनतरी पैसे उभे केले, बहुधा उसने आणले असावेत. सकाळी अण्णा गेले आणि येताना श्रीखंड व कणिक घेऊन आले. त्याकाळी दुकानात तयार कणिक मिळत नसे. अण्णांनी सांगितलेली हकीकत अशी.- त्यांनी वाण्याकडून गहू विकत घेतले व गिरणीत गेले. गिरणीवाल्याकडून चाळणी घेऊन गहू चाळले. त्यांना चाळणी मारताना पाहून गिरणीवालाही मदतीला आला. गहू दळून अण्णा कणिक घेऊन आले. आणि आम्ही श्रीखंड चपाती खाल्ली. आता सर्व प्रकाच्या श्रीखंडाचे तयार पॅक वर्षाचे ३६५ दिवस दुकानात मिळतात. त्यामुळे श्रीखंडाची फारशी किंमत वाटत नाही. परंतु पाडवा आला की, मुलांना श्रीखंड चपाती खावयास मिळावी म्हणून दुकानात गव्हास चाळणी मारणारे अण्णा डोळ्यांपुढे राहतात .
सुरकुत्या पडलेले आंबे
एका वर्षी काही कारणांनी आम्ही मुंबईला गेलो नाही..मग मी अण्णांच्या मागे लागलो की आपण आंबे का आणत नाही..अण्णांनी बरीच टाळाटाळ केली पण अगदी खनपटीस बसलो मग अण्णा व आईचे काय बोलणे झाले कुणास ठाऊक..पण एका रविवारी अण्णा आईला म्हणाले मी आंबे बघायला जातो..मला अत्यानंद झाला आणि मी अण्णाच्या मागे लागलो की मी येतो म्हणून..अण्णा ठीक म्हणाले..मी आनंदाने निघालो..आम्ही बसने कॉर्पोरेशन आणि मग चालत चालत मंडईत आलो...अण्णा आंब्यांची चौकशी करून भाव बघून पुढे पुढे जात होतो...मी मधून मधून अण्णांना सांगायचो..अण्णा इथे बघा हे आंबे छान दिसत आहेत..पण अण्णा लक्ष देत नसत..मग मी विचारले की आपल्याला कसे आंबे घ्यायचे आहेत..अण्णा म्हणाले अरे सुरकुत्या पडलेले आंबे गोड असतात...मग मी तसे आंबे दिसतात का बघू लागलो शेवटी आम्ही मंडई तून निघून पुन्हा कॉर्पोरेशन कडे जाऊ लागलो..मी खूप खट्टू आणि निराश झालो होतो..आता आंबे मिळणार नाही ही खात्री पटली होती...चालता चालता आम्ही corporation च्या पुलावर आलो तेथे एक म्हातारा आंबे टोपलीत घेऊन बसला होता..अण्णा त्याच्या कडे गेले व भाव करू लागले जेव्हा भाव ठरला तेव्हा अण्णांनी पिशवी काढली व पिशवी भरून आंबे घेतले..मला वाटते जवळ जवळ सगळेच...आम्ही मुंबईत खात असू त्या पेक्षा फळ खूप लहान होते व आंब्या वर सुरकुत्या पडलेल्या होत्या...मला आंबे मिळाले ह्याचा इतका आनंद झाला होता की घरी कधी पोचतो असे झाले होते..मी मधून मधून पिशवीला हात लावत होतो...घरी पोचल्यानंतर आईने एका मोठ्या पातेल्यात आंबे धुतले व आम्हाला आंबा कापून दिला...मी खूप आंबे नंतर खाल्ले पण ह्या आंब्याची चव कधीच विसरणार नाही...
आमचे गुगल -आमचे अण्णा
घर्षणजन्य वीजेबद्दल शालेय अभ्यासक्रमात मी शिकलो होतो. पण या वीजेपासून अपाय होऊ शकेल, हे मला खरे वाटेना. झाले. आपणा सर्वांप्रमाणे मी लगेच गुगलवर शोध घेतला आणि या सहका-याचे म्हणणे खरे असल्याचे मला कळले. अचानक मला माझ्या वडिलांची, अण्णांची आठवण झाली.
त्या काळी इंटरनेट नव्हता. आमची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुस्तक खरेदी शक्य नव्हती. अशा परिस्थितीत, मला आठवत नाही की आम्हा मुलांनी विचारलेल्या शंकांना अण्णांनी कधी 'मला माहीत नाही' म्हटले की 'एक सारखे प्रश्न विचारून मला भंडावू नका', म्हणून उडवून लावले.
रात्री आकाशनिरीक्षण करताना, 'अण्णा, हा तारा कुठला?' रेल्वे स्टेशनवर गेलो की, 'अण्णा, हे इंजिन कुठलं?' कुठलाही प्रश्न विचारा, अण्णांनी 'मला माहीत नाही,' सांगितल्याचं आठवत नाही. आमच्या घरी आम्ही सकाळ पेपर घेत असू. 'मी पूर्ण पेपर वाचत नाही, ठराविक भाग वाचतो,' असे ते आईला सांगत. कारण कामाच्या वेळी अण्णा पेपर वाचताना दिसले की आई वैतागत असे. 'कामं उरकून घ्या आणि मग काय करायचं ते करत बसा,' हा तिचा रास्त आग्रह असे.
अमृत हे त्यांचे आवडते मासिक होते. हे मासिक रीडर्स डायजेस्टच्या धरतीवर होते. इतर वाचन म्हणजे, मिळेल ते, अगदी आमची पाठ्यपुस्तके सुद्धा ते वाचत.
त्यांचे शिक्षण तेव्हाचे मँट्रिक, म्हणजे आजची अकरावी. इंग्रजी व्याकरणशुद्ध. तर्खडकर भाषांतरपाठमालेची फार तारीफ करत. त्यांच्या संग्रहात प्रा. मा.का.देशपांडे यांचे मॅट्रिक एसेजचे पुस्तक मला आठवते. Life after death हे एक C W Leadbeaterचे पुस्तक होते. (पुढे अण्णांनी वीरकर इंग्रजी-मराठी शब्दकोष आणल्यानंतर मीसुद्धा ते पुस्तक वाचून मरणोत्तर जीवनाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता 😊
अण्णांना संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान होते. त्यांची कित्येक सुभाषिते, भगवद्गीतेतील श्लोक तोंडपाठ होते. प्रसंगानुसार ते संस्कृत सुभाषित उद्धृत करीत. 'शैले शैले न माणिक्यं मौक्तिकं न गजे गजे' हे सुभाषित मला चांगलंच आठवतं.
त्यांच्या अखेरच्या दिवसातही एका जुन्या डायरीमध्ये ते टिपणे काढतच होते. अशा प्रकारे अखेरपर्यंत त्यांची ज्ञानसाधना चालूच होती.
धार्मिक, पौराणिक राजकीय, ऐतिहासिक, कुठल्याही विषयावर ते चर्चा करण्यास तयार असत. अत्यंत सोप्या शब्दांत ते आपला दृष्टिकोन मांडत. महाभारतामध्ये श्रीकृष्ण ब-याचदा कपटनीतीने वागला आहे, त्याचं त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण मला आठवतं की,'मुख्य ध्येय साध्य करण्यासाठी कधी कधी प्रासंगिक ध्येयांमध्ये तडजोड करावी लागते, असा संदेश श्रीकृष्णाने दिला आहे.'
अत्यंत सोप्या शब्दांत ते आपला दृष्टिकोन मांडत. त्यांचे विवेचन समतोल असे आणि आणि 'माझंच मत बरोबर आहे,' असा त्यात आग्रह नसे.
आजच्या माहितीविस्फोटाच्या युगात अण्णांसारख्या नि:पक्षपाती, समतोल, अभ्यासू विवेचनाची उणीव भासते.
अण्णांना वाचनाची खूप आवड होती...तसेच त्यांना गप्पा मारायला ही आवडत असे...पण गप्पांचे विषय आवडीचे पाहिजेत...साधारण गप्पा किंवा गॉसिपिंग करणे..इतर कोणा विषयी प्रतिकूल मत प्रदर्शित करणे..हे मी कधीच ऐकले नाही...उथळ गप्पा, चर्चा असेल तर ते गप्प बसत..त्यांचे वाचन पण चौफेर पण प्रगल्भ होते...अनेक मासिकं प्रसिद्ध होत त्यातील सह्याद्री, अमृत, केसरी, प्रसाद मासिके त्यांना विशेष आवडत...त्यातील वैचारिक वा आध्यात्मिक लेख ते वाचीत...आजी आली की ती अण्णासाहेब काही तरी वाचा असा आग्रह करे..आणि ते ही चांगला लेख वाचीत...जे ते वाचीत त्याचे चिंतन करून ते त्याचे खूप छान analysis करत...जे सांगत ते त्यांना प्रामाणिक पणे वाटत असे पण त्यावर ते आग्रही नसत..माझा त्यांचा खूप वाद होई..पण मी म्हणतो ते बरोबर किंवा तुला पुढे पटेल असे ते कधीच म्हणत नसतं...उलट मी असे वाचले आहे असे सांगत. सकाळ पेपर त्यांना फार आवडे...मला ते वारंवार अग्रलेख वाचायला सांगत.ते चित्रही छान काढायचे अगदी कोरीव, रेखीव आणि रंग भरताना खूप छान रंगसंगती करायचे. नीलच्या मेकॅनो सेट्सवरून त्यांनी विविध प्रकारच्या मोटर बाईक्सच्या माॅडेल्स बनवल्या होत्या. किमान माझ्याकडे आले की तो त्यांचा छंदच होता.
साईबाबांचे हास्य
अण्णा, आई, आजी-आजोबा असे सर्वजण एकदा शिर्डीला गेले होते. शिर्डीला त्या दिवशी खूप गर्दी होती. राहण्याची कुठेच सोय झाली नाही. त्यामुळे सर्वांनी मंदिराच्या आवारातच पथाऱ्या टाकून झोपायचे ठरले.पथारीवर पडल्या पडल्या अण्णा विचार करीत होते, केवढे हे मंदिराचे वैभव . लोक भल्याबुऱ्या मार्गाने धन कमावून बाबांना अर्पण करतात आणि बाबासुद्धा त्याचा स्वीकार करतात. असा विचार करता करता त्यांना झोप लागली.
तेव्हा कुणाच्या तरी सात मजली हास्याचा आवाज ऐकू आला. अण्णांनी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला. परंतु पुन्हा कुणीतरी फडक्याने मारत होते आणि पुन्हा तसाच हसण्याचा आवाज.
मग अण्णांच्या लक्षात आले की आपण झोपताना बाबांविषयी जो विचार केला, त्यामुळे बाबा रुष्ट झालेले दिसतात. अण्णा म्हणाले, मी ओळखलं तुम्हाला. आता हवं तितकं मारा. मग फडक्याने मारणं आणि हसणं, दोन्ही बंद झालं.
मध्यरात्रीचे रडणे
अण्णांनी खूप प्रकारचे अनुभव घेतले होते. त्यांमध्ये एक अनुभव पिशाच्चयोनीचाही आहे.आम्ही तळेगावला राहत होतो, तेव्हाची गोष्ट आहे. तळेगाव तेव्हा खेडेगाव होतं. आम्ही राहत होतो, त्या भागाजवळ शेतं होती.
अण्णा सांगत होते की रात्री त्यांना झोप लागत नव्हती. त्यामुळे ते उठून वाचत बसले. दोनचा सुमार होता. खिडकीजवळून कुणातरी मुलीच्या रडत जाण्याचा आवाज ऐकू आला. खिडकी बंद होती.
असं सांगतात की तेथे घरमालकाने मुलाचं लग्न मुलांच्या मनाविरुद्ध एका मुलीबरोबर लावून दिलं होतं. या मुलाने बायकोला विहिरीत ढकलून देऊन ती विहिरीत पडल्याचा बनाव रचला होता. या मुलीचा आत्मा तेथे फिरत होता.
अण्णा सांगतात की त्यांनी मग घरात व्यंकटेश स्तोत्र वाचण्यास सुरुवात केली.
डोक्यातील हळद
आम्ही मुलं तशी गरीबीतील लाडावलेली मुलं होतो. हे लाड अण्णांनी चालवले होते. कारण आम्हाला त्यांनी कुठलंच काम सांगितलं नाही.
अण्णा सकाळी बोपोडी नाक्यावरील दूध सेंटरवरून दूध आणायचे. नंतर नळावरून पाणी आणायचे. मोरीतील रात्रीची भांडी साफ करून टाकायचे आणि मग अंघोळीला बसायचे.
आई आम्हाला कामं सांगत असे. ती अण्णांना सांगत असे,'मुलांना कामं सांगत जा. तुम्हाला पुढे जड जाईल.' परंतु अण्णांना ते जमलंच नाही. असो.
त्या वेळी महाराष्ट्र शासनाची दूध केंद्रं होती. निळ्या झाकणाच्या बाटलीत होल दूध आणि पांढऱ्या झाकणाच्या बाटलीत टोन्ड दूध मिळे. होल दुधाच्या बाटलीची किंमत होती ८० पैसे. आम्ही रोज होल दुधाच्या दोन बाटल्या आणत असू. आदल्या दिवशीच्या रिकाम्या बाटल्या परत करायच्या आणि भरलेल्या बाटल्या घेऊन यायच्या, अशी पद्धत होती. दूध आणायला उशीर झाला तर दूध संपत असे.
अण्णा एक दिवस दूध आणायला गेले. परंतु उशीर झाल्याने दूध संपलं होतं. तेव्हा दुसरा पर्याय काहीच नव्हता. कुठे तरी गवळी शोधावा लागे. अण्णा काय करावं या विचारात उभे होते. कधी आशाही असे, की थांबून राहिलं, तर एखादी बाटली मिळेल. पण दूध सेंटरवाला सेंटर बंद करू लागला. त्यासाठी वरून बंद करायचं लाकडी शटर होतं. हे शटर एकदम अण्णांच्या डोक्यात पडलं.
अण्णांचं टक्कल असल्याने मोठा आघात झाला आणि रक्त वाहू लागलं. दूध सेंटरवाला घाबरून गेला आणि त्याने दुधाच्या दोन बाटल्या काढून दिल्या. अण्णा तशाच स्थितीत डोकं धरून घरी आले आणि कुणाला न सांगता गादीवर पडून राहिले.
आई सकाळची कामं उरकत होती. कामाच्या वेळी अण्णांना पडून राहिलेले पाहून आई वैतागून काही बोलणार, इतक्यात तिचं लक्ष अण्णांच्या डोक्याकडे गेलं आणि ती घाबरून गेली. घरात औषधही नव्हतं. तिने स्वयंपाकाच्या हळद-तिखटाच्या डब्यातून हळद काढून जमेल तितकी हळद डोक्यात भरली.
अण्णांनी रजा घेतली का ते कामावर गेले, मला आठवत नाही. अण्णा सिक लीव्ह घेऊन घरात राहिल्याचे मला फारसे आठवत नाही.
संध्याकाळी अण्णा डॉक्टर कानिटकरांकडे गेले. त्यावेळी डॉक्टर जखम धुवून ड्रेसिंग करीत. आता ही ड्रेसिंगची पद्धत बंद झाली. डोक्याला ड्रेसिंग करून अण्णा घरी आले.
अण्णा सांगत होते, ' भिकूताई (डॉक्टरांच्या 'रोती सूरत' कंपाउंडर) वैतागल्या होत्या, डोक्यात कुणी एवढी हळद भरली?'
रेशमाचे बंध
अण्णा अतिशय मृदुभाषी होते. कुणाला तोडून बोलणं त्यांच्या स्वभावात नव्हते. प्रत्येक माणसामध्ये त्यांना, युधिष्ठिराप्रमाणे, आपल्याप्रमाणे चांगला माणूस दिसत असे. अर्थात याचा गैरफायदा घेणारेही होते. उदा. दुकानदार. 'तो म्हणाला,' चांगलं आहे. घेऊन जा. पैशाची काही घाई नाही. सावकाश पैसे द्या.' हे आईला निस्तरावे लागत असे. अगदी मित्र म्हणवणारे सुद्धा फसवू पाहत. परंतु त्यांचा चांगुलपणा जाणून चांगले वागणारे लोकही होते. जे आठवतात, त्यांच्याबद्दल सांगतो.१. डॉ. मो. ग. कानिटकर:- यांचा खडकीमध्ये एल्फिन्स्टन रोडला (आता लक्ष्मणराव किर्लोस्कर पंथ) बंगला कम दवाखाना होता. शरीरयष्टीने उंच, दिसायला गोरेपान, घारे डोळे , मृदू आवाज आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व. दवाखान्यात त्यांच्या वडिलांचा फोटो लावला होता. वडिलांबद्दल खूप आदर. वडिलांनी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला होता. एकदा वडिलांचे टाइप केलेले छोटे चरित्र अण्णांना वाचायला दिले होते. डॉक्टरांना फोटोग्राफीचा छंद होता. त्यांनी आपल्या छायाचित्रांचे प्रदर्शन एकदा पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात भरवले होते. आम्ही ते पाहायला गेलो होते.
डॉक्टरांकडून आम्ही उधार औषध आणत असे. अण्णा महिन्याचे एकदम पैसे देत. आम्हा मुलांकडे डॉक्टरांनी कधी पैशाचा विषय काढला नाही. एकदाच त्यांना पैशाची गरज होती, तेव्हा एक पत्र लिहून पाकिटात टाकून ते आम्हाला देऊन वडिलांना देण्यास सांगितले होते. अण्णांना ते एकदा म्हणाले होते,'मी असेपर्यंत तुमच्याकडे पैसे मागणार नाही '
२. न्हावी:-आमचं घरासमोरील मुंबई पुणे रस्ता ओलांडला की एका मुस्लीम न्हाव्याचं छोटंसं दुकान होतं. आम्ही त्याच्याकडे केस कापायला जात असू. केस कापून झाल्यावर तो आम्हाला रस्ता क्रॉस करून द्यायचा. अण्णा त्याला एकदम पैसे द्यायचे. त्याची आठवण म्हणून मी मुलाचं , अद्वैतचं जावळ या न्हाव्याला चिंचवडला घरी बोलावून करून घेतलं होतं.
३. पुस्तकवाला सरदारजी:-अण्णांच्या ऑफीसमध्ये एक सरदारजी होता. तो नोकरीनंतर बोपोडी नाक्यावर पुस्तकांचा स्टॉल चालवत असे. अण्णांनी त्याला आम्हाला लागतील ती पुस्तकं देण्यास सांगितले होते. आम्ही त्याच्याकडून इंद्रजाल कॉमिक्स आणि चांदोबा आणत असू. अण्णा त्याला एकदम पैसे देत.
४. पेपरवाले आजोबा:-आमच्याकडे एक म्हातारे आजोबा पेपर टाकत. हे आजोबा आम्हाला पेपरव्यतिरिक्त कुमार मासिकाचा अंक देत.
५. घरमालक रमेश अगरवाल:-याच्याविषयी बऱ्याच वाईट गोष्टी ऐकण्यात होत्या. परंतु अण्णांशी तो अतिशय आदराने वागत असे. मला तो एकदाच आमच्या घरी आलेला आठवतो.
६.मुन्ना वाण्याचे वडील:- मुंबई पुणे रस्ता ओलांडला की यांचं दुकान होतं. आम्ही यांच्याकडून उधारीवर सामान आणत असे. यांनासुद्धा अण्णांनी मुलांना लागेल त्या वस्तू देण्यास सांगितले होते. एकदा उधारी खूप थकल्यावर त्याने अण्णांना सांगितलं होतं, 'मी तुमच्यावरील प्रेमापोटी वस्तू देत आहे, पण माझ्या मुलांकडे येऊ नका. ते तुमचा अपमान करतील.'
७. नि.ल.केदारी:-याचे बोपोडी नाक्यावर रेशनचे दुकान होते. याच्याकडे कधी पूर्ण रेशन मिळत नसे, तांदूळ आहे तर गहू नाही, गहू आहे तर साखर नाही. त्यामुळे लोक याला फार तळतळाट देत. याला बहुतेक पैशाची चणचण होती. त्यामुळे तो मिळतील ते पैसे घ्यायचा, त्यातून दुसरं धान्य आणायचा.
मी एकदा त्याच्याविषयी वाईट बोलत असताना, अण्णांनी त्याची एक आठवण सांगितली. एकदा त्याने अण्णांना पैसे दिले. कसले, कशासाठी मला आठवत नाही. मग तो अण्णांना म्हणाला, ' जुन्नरकर,पैसे व्यवस्थित ठेवले नं? मला तुमचा धांदरट स्वभाव माहीत आहे. दाखवा बघू कुठे ठेवले? घरी व्यवस्थित घेऊन जा.'
अण्णा मला म्हणाले, 'हे रेशमाचे बंध असतात. जोडायला वेळ लागतो. तोडायला वेळ लागत नाही.'
अण्णांच्या जनसंपर्काचे हेच सूत्र होते.
अण्णांच्या आवडीनिवडी
लहानपण कष्टात काढल्यामुळे आणि आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, अण्णांच्या आवडीनिवडी फारशा चोखंदळ नव्हत्या.
खाण्यापिण्यामध्ये ते सर्व काही आनंदाने आणि पदार्थांची तारीफ करून खात. पानात काही टाकत नसत. गोड पदार्थांची त्यांना आवड होती. त्यांना निनाव आणि वड्यांचे सांबार आवडत असे, हे त्यांनीच एकदा सांगितले, तेव्हा कळले. एकदा आजी आली असताना (तेव्हा आई हॉस्पिटलमध्ये होती) अण्णांनी हे सांगितलं. आजीने तत्परतेने दुसऱ्या दिवशी वड्यांचे सांबार बनवले.
मी आणि दादा शेजाऱ्यांकडे रेडिओ ऐकायला जात असू. त्यामुळे आई-अण्णांनी मर्फीचा मिग २ मॉडेलचा ट्रांझिस्टर घेतला. अण्णा हा रेडिओ सकाळीच चालू करीत. त्या वेळी सकाळी मंगल प्रभात कार्यक्रम असे. आईचा महिला मंडळाचा कार्यक्रम, आमचा बालोद्यान म्हणून लहान मुलांचा कार्यक्रम ते आठवणीने लावत. त्यांना शास्त्रीय संगीत ऐकायला आवडे. संगीताला उजव्या हाताने ते दाद देत.
गायकांमध्ये त्यांना सैगल आवडत असे. सैगलविषयी ते आणि दादा चर्चा करीत. मी केवळ ऐकत असे.अण्णांचा आवाज गोड होता. त्यांनी मोठ्याने कधी गाइले नाही. पण ते स्वतःशीच गुणगुणत.
चित्रपटांमध्ये त्यांना मराठी चित्रपट आवडत असत. त्या वेळी मराठी पिक्चर ब्लॅक अँड व्हाइट असत. शिवाय त्यामध्ये गावचा पाटील, लावण्या, सुनेचा छळ ही कथानके प्रामुख्याने असत. त्यामुळे आम्हाला मराठी चित्रपट पाहणे म्हणजे शिक्षा वाटे.ते प्रभातच्या माया बाजार, माया मच्छिंद्र वगैरे चित्रपटांची खूप तारीख करीत.
चित्रपटापेक्षा नाटक जास्त वास्तववादी आहे, हे मत ते मांडत. चित्रपट म्हणजे नुसती पडद्यावरील चित्रे, नाटक म्हणजे खरेखुरे डोळ्यासमोर घडते, असे ते सांगत.
निवडणुकीमध्ये ते त्या वेळच्या जनसंघाला मत देत. कॉंग्रेसविषयी मी त्यांच्या तोंडून एकच तक्रार ऐकली,'अमेरिकेत जनावरांना जो गहू खायला देतात, तो इथे आम्हाला खायला देतात.'
नातवंडांचे घरात आगमन झाल्यावर त्यांच्याशी ते पत्ते खेळत बसत. प्रांजळ एका जागी बसून रिंगा घरभर फेकत असे. त्या रिंगा तिला ते शांतपणे आणून देत. आजोबा-नातीचा असा सतत खेळ चालत असे.
आई टी व्ही वरील सीरिअल्स पाहत बसे. तिच्याबरोबर ते सुद्धा सीरिअल्स पाहत. त्यांना त्या आवडत होत्या की नाही, ते माहीत नाही. पण आईच्या आवडीनिवडींवर त्यांनी कधी टीका केली नाही.
आमची परिस्थिती सुधारल्यावर आम्ही मुलांनी त्यांच्या आवडी-निवडी पूर्ण करण्याचा यथाशक्ति प्रयत्न केला.
त्यांच्या आवडी निवडी पूर्ण करणे तसे कठीणही नव्हते. कारण साध्या साध्या गोष्टींतून त्यांना आनंद मिळत असे, जी गोष्ट आज मोठ्या सेमिनार्समध्ये सांगतात. ज्याला साध्या गोष्टींतून आनंद मिळतो, त्याचा आनंद कधीच संपत नाही.
मला दादाचं एक वाक्य आठवतं,'या माणसाकडे पाहिलं की कधी असं वाटतं, देव्हाऱ्यातून देव उचलून फेकून द्यावे.' पण त्यांची देवाबद्दल कधीच तक्रार नव्हती. आई-वडिलांच्या छत्रास लहानपणी मुकल्यानंतरही देवावरचा विश्वास त्यांनी कधीच ढळू दिला नाही. मला वाटतं , त्यांच्या सर्व आवडी-निवडी पूर्ण झाल्या असाव्यात. कारण या आवडी-निवडींमध्ये त्यांची आसक्ती कधीच नव्हती.
अण्णांना पुरणपोळी (तेल पोळी), पुरणाचे कडबू आणि सगळेच गोड पदार्थ आवडायचे.
अण्णासाहेब
अण्णांना 'अण्णा' नाव आईच्या माहेरच्यांनी दिले. आमची आई सर्व भावंडांत मोठी. अण्णा पहिले जावई. जावयांना काय म्हणावं याचा विचार झाला आणि अण्णासाहेब म्हणायचं ठरलं. मग आम्हा मुलांनाही वडिलांना अण्णा म्हणण्यास सांगितले.आजी-आजोबांनी अण्णांचा जावई म्हणून योग्य तो मान ठेवला. आजी तर अण्णांना आपल्या मुलाप्रमाणे मानत असे. आजोबा अखेरच्या दिवसात चिंचवडला होते. आई-अण्णांनी त्यांची त्या वेळी त्यांची खूप सेवा केली.
आई सांगते की अण्णांना नानामामा पाहण्यास आला आणि त्याने कन्फर्म केलं की मुलगा चांगला आहे. मग पुढे आईच्या संसारात ज्या समस्या आल्या, त्यांना आपण जबाबदार आहोत असं त्याला वाटत राहिलं. त्यामुळे तो अखेरपर्यंत आम्हाला मदत करीत राहिला. माझं कॉलेजचं शिक्षण केलं. हर्षलमामी सुद्धा अण्णांचा खूप आदर करीत असे.
शालीमावशी आणि कुसुमावशी यांची जोडी होती. त्यामुळे शाली-कुसुम असा त्यांचा एकत्र उल्लेख होत असे. शालीमावशी बाळंतपणात गेली.
आई कधी गमतीने कुसुममावशीला म्हणे, 'तुमचे अण्णासाहेब वाटतात तेवढे भोळे नाहीत.' कुसुममावशी उत्तर देई,'नाही ग, अण्णासाहेब म्हणजे देवमाणूस.'
कुसुममावशीचे यजमान नानाकाका अण्णांना जेव्हा अर्धांगवायूचा झटका आला होता, तेव्हा अण्णांना पाहायला घरी आले होते.
दीदीमावशी आणि तिचे यजमान दादाकाकासुद्धा अण्णांचा खूप आदर करीत असे.
लतामावशी अण्णांना नियमित राखी पाठवत असे.
लतामावशीचे यजमान पद्माकरकाका यांनाही वाचनाची आवड होती. पुस्तकांचा संग्रहही मोठा होता. अण्णांनी अखेरच्या दिवसात काढलेली टिपणं त्यांनी पूर्ण वाचली. अण्णा गेले त्याच वर्षी म्हणजे २०१४ च्या जूनमध्ये त्यांनीही जीवनयात्रा पूर्ण केली.
में महिन्याच्या सुट्टीत मुंबईला गेलो की रमेशमामाचा सिनेमा पाहण्यास जाण्याचा बेत होई. एकदा आम्ही सर्वजण 'हमजोली' चित्रपट पाहण्यास गेलो. चित्रपटात जितेंद्र नायक आणि मेहमूदची तिहेरी भूमिका. कथानक नावाला, बाकी सारा धांगडधिंगा. रात्री नऊचा शो होता. अचानक कुणाच्या तरी घोरण्याचा आवाज आला . सर्वांनी पाहिलं तर अण्णा घोरत होते.
रमेशमामा दर भाऊबीजेला आमच्याकडे येत असे. त्याचं लग्न झाल्यावर स्वातीमामीसुद्धा येत असे. रमेशमामाला वारंवार चहा लागत असे. त्यामुळे 'अण्णासाहेब, जरा चहा बनवता?' अशी विनंती होतं असे. अण्णांचं हे तर आनंदाचं काम होतं.
रमेशमामाचा स्वभाव विनोदी होता. तो अण्णांची थट्टामस्करी करीत असे. आई त्याला लटके रागावतही असे. आता त्या सर्व आठवणी राहिल्या.
आज दीदीमावशी, दादाकाका, रमेशमामा, हर्षलमामी हयात नाहीत. नानामामाने नव्वदी ओलांडली आहे. लतामावशी, कुसुममावशी, नानाकाका, स्वातीमामी यांचंही खूप वय झालं आहे. त्यांचे लाडके अण्णासाहेब अनंतात विलीन झाले आहेत.
आध्यात्मिक थोरवी
अण्णांची आध्यात्मिक बैठक ज्यांनी घडवली ते
श्रीगोंद्याचे प. पू. श्रीनानामहाराज नाचणे
अण्णांचा पिंड मुळात आध्यात्मिक होता. त्यांची आध्यात्मिक जडण घडण बहुतेक नानामहाराजांकडे घडली होती. गोपीचाळीत कशा प्रकारची वस्ती होती ते सांगितलेच आहेच. खडकी हेही एक बकाल गाव होते. अशा ठिकाणी त्यांनी आमच्यावर चांगले संस्कार केले. त्यांनी खालील स्तोत्रे शिकवली:
१. श्री गणपति अथर्वशीर्ष २. रामरक्षा ३. पंचरत्न हरिपाठ . ४. दत्तस्तुती ५. श्री व्यंकटेश स्तोत्र. श्रीज्ञानेश्वरीचे ते फार चाहते होते. घरात त्यांनी आम्हाला नवनाथ पोथी वाचून दाखवली होती. गुरुचरित्रही ते वाचीत. गुरुवारचा उपास ते करीत. त्यांना श्री दत्तावर त्यांची विशेष भक्ती होती. कुणी काही आध्यात्मिक वाचन करीत असले तर ते अतिशय भक्तिभावाने ऐकत. श्री साईसच्चरित ते निवृत्तीनंतर ते बऱ्याचदा वाचीत.
ते आम्हाला नेहमी सांगत, रामनामामध्ये फार मोठी शक्ती आहे. रामनाम नियमित घेत जा. उपासना नियमित आणि ठराविक वेळी करण्याचे महत्त्व ते सांगत. उपासना नियमित ठराविक वेळी केली तर त्या दैवताला त्या वेळी येण्याची सवय लागते आणि ते दैवत त्या वेळेला उपस्थित राहू लागते असे ते सांगत. या दैवताच्या येण्याच्या वेळी अचानक एखादा सुगंध येतो किंवा काहीतरी संकेत मिळतो . त्यावेळी आपली उपासना त्या दैवताला पसंत पडू लागली आहे असे ते समजावे., असे ते सांगत.
त्यांची भक्ती संत सात्त्विक प्रकारची होती. कर्मकांड किंवा संकटांवरील उपाय म्हणून त्यांनी भक्ती कधी सांगितली नाही.
अण्णा सांगतात एक आणि आचरणात दुसरेच आणतात असे कधी वाटले नाही.
कधी आम्हा भावंडात भांडणं झाली आणि तो मला असं म्हणाला अशी तक्रार केली तर ते सांगत, ' कोणी काही बोललं तर ऐकून घ्यावं. कोणी काही बोललं म्हणून आपल्या अंगाला घरं पडत नाहीत.'
'कुणी गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये', ' 'दुसरा ऐकत नसेल तर आपण आपल्याकडे कमीपणा घ्यावा, त्याने काही बिघडत नाही,' असा त्यावेळचा कितीतरी उपदेश त्यावेळी पटत नसे. पण आता त्याचे मोल कळते. अशी मी किती वचने सांगू ?
मला सतत बोलण्याची सवय होती. ते मला सांगत, तू तुझी एनर्जी फार फुकट घालवतो आहेस. गांधीजी महिन्यातून एक दिवस मौन पाळत. (गांधीजींबद्दल त्यांना फार आदर होता).
आज मी कुठल्याही आध्यात्मिक गुरूंची प्रवचने ऐकतो, तेव्हा असे आठवते की अरे हे अण्णांनी आपल्याला लहानपणीच सांगितले होते.
आमच्या इथे नानी म्हणून एक बाई आणि त्यांच कुटुंब रहातं. नानी अनिरुद्ध बापूंच्या भक्त आहेत. अण्णा आलेले कळले की त्या त्यांच्या संस्थेतून रामनाम लिहिण्याच्या वह्या आणून द्यायच्या, अण्णा आणि त्यांच्याबरोबर नील रामनाम लिहायचे. अण्णांच्या खूप वह्या लिहून झाल्या होत्या. त्याच एक पासबुक बनवून अण्णांच अकाऊंटं उघडल होतं.
त्यांच परमेश्वरावर प्रचंड अधिष्ठान होतं. त्यांना गीतेचे बरेच अध्याय तोंडपाठ होते. आई बर्याचदा त्यांना ते म्हणायला सांगायची. ते मला दासबोध आणि ज्ञानेश्वरी मधील पण खूप दाखले द्यायचे. मला ज्ञानेश्वरी कळत नाही असं सांगितलं तर म्हणाले होते, "कळत नसेल तरी रोज दोन ओव्या वाचत जा. गोडी लागेल आणि हळूहळू कळायलापण लागेल".
त्यांना मावळणारा सूर्य आवडत असे. माझ्या हाॅलच्या खिडकीतून मावळणारा सूर्य, सूर्यास्त छान दिसे. ते चहा प्यायला खिडकीत बसत आणि मावळणार्या सूर्याशी बोलत असत. नील विचारायचा,"अण्णा कोणाशी बोलतात?" सूर्याशी असं सांगितल तर नील विचारायचा की सूर्याला तुमच बोलणं कळतं का? ते म्हणाले कळतं, त्याला भावना आहेत तू पण बोलून बघ. ऋषीमुनींनी सूर्य उपासना करून खूप ज्ञान प्राप्त केलं होतं नीलला हे आजही आठवतं. नील म्हणतो माॅम तुम्ही सगळेच खूप नशीबवान होतात की तुमचे आई वडील आई अण्णा होते.
भाऊने आणून दिलेल्या प्रभात कंपनीच्या मराठी सिनेमांच्या सी डी ते जवळपास रोज बघायचे नील लावून द्यायचा. त्यातील एक प्रसंग शिवाजीमहाराज, संत तुकारामांच्या बायकोला रेशमी साडी, मुलांना कपडे दागिने पाठवतात, ते सगळेजण ते परिधान करतात, संत तुकारामांना हे कळल्यावर ते बायकोला मुलांना ते काढायला सांगतात आणि परत करतात. नीलला तुकारामांचा खूप राग येत असे. अण्णा त्याला समजावून सांगत पण तो ऐकत नसे. मी अण्णांना म्हटलं, कसले त्याच्या नादी लागता? तर तरी ते त्यांची बाजू न सोडता नीलला म्हणाले, आता पटलं नाही तरी मोठा झाल्यावर तुला हे नक्कीच पटेल.
अण्णांची टिपणे
यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् |
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावित:
|| श्रीमद्भगवद्गीता, अ. ८, श्लो.६ ||
( हे कौंतेया, अंतकाळी देहत्याग करताना जो ज्या ज्या भावाला स्मरतो, त्या भावाने भावित झालेला तो नेहमी त्या त्या भावाला जातो )अण्णांनी त्यांच्या अखेरच्या दिवसांत एका जुन्या डायरीत काही टिपणे काढली.
अण्णांची टिपणे पाहिली तर ते ईश्वराविषयी चिंतन करीत होते. पांडुरंग, ज्ञानेश्वर हे त्यांचे आयुष्यभरातील आवडीचे विषय होते. त्या विषयांवर त्यांची बहुतांश टिपणे आहेत. काही टिपणे अर्धवट राहिली आहेत. काही पुन्हा पुन्हा लिहिली आहेत. त्यांचे एक प्रकारे अखेरचे चिंतन होते. त्यात त्यांचा आयुष्याविषयी संतुष्टता, परमेश्वराविषयी कृतज्ञता दिसून येते.
अमृतकण
ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ।।
ईशावास्य उपनिषदांत या श्लोकापासून अर्थ झाला आहे.
परमेश्वर सर्वोच्च शक्तिमान आहे. जगाचा शासक आहे. जगाच्या अणू-रेणूत भरलेला आहे. म्हणून लोकेषणा, वित्तेषणा, पुत्रेषणा सोडून ‘इदं न मम’ या बुद्धीने, वैराग्याने भोग घ्यावेत. कारण धन कोणाचे आहे बरे?
पांडुरंगाष्टकम्
महायोगपीठे तटे भीमरथ्यावरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।
समागत्य निष्ठन्तमानंदकंदं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ १ ॥
हरिपाठ-अंतरंग दर्शन
(हरिपाठें गेले, ते निवांतचि ठेले)
-डॉ. व. दि. कुलकर्णी
कुलकर्णी म्हणतात, इतर संतांसारखे श्री ज्ञानेश्वर साधकावस्थेत जन्म घेऊन ते या जन्मात सिद्धावस्थेत गेले नाहीत. ते सर्व (श्री निवृत्तीनाथ, श्री ज्ञानेश्वर, श्री सोपानदेव व मुक्ताबाई) पूर्ण सिद्धावस्थेतच जन्मले होते.त्यामुळे त्या सर्वांचा अध्यात्मासंबंधीचा अभ्यास मागच्या जन्मीच पूर्ण झालेला होता. तो सर्व अभ्यास पूर्ण होण्याकरिता त्यांना अनंत जन्म घ्यावे लागले.
श्रीभगवद्गीतेवर त्यांनी आपल्या भावार्थ दीपिकेत (श्री ज्ञानेश्वरी) संपूर्ण विवेचन प्राकृत भाषेत केले आहे. ते पुष्कळ प्रदीर्घ व त्यांच्या वेळच्या रोजच्या प्राकृत भाषेत केले. ते सर्वांनाच समजण्यासारखे नाही. म्हणून त्यांनी अगदी सामान्य माणसांना समजावे म्हणून अगदी थोडक्या शब्दांत व सोप्या भाषेत 'श्री हरिपाठ' रोजच्या पठणाकरिता लिहिला.
या सर्व भक्तांना मोठ्या तीर्थ स्थानात किंवा घोर जंगलात जाण्याची आवश्यकता नाही. त्यांनी संसार त्याग करण्याची पण जरुरी नाही.
' ज्या ठिकाणी, जसे असाल तसे रहा. मी (श्री ज्ञानेश्वर) तुमच्याकरिता 'हरिपाठ' लिहिला आहे. तो रोज नित्य नेमाने म्हणा. अगदी मनापासून हे एवढे काम करा. तुम्ही जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटाल.'
या हरिपाठाचा पहिला अभंग-
'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी
तेणे साधियेल्या चारी मुक्ती' II १ II
याचा अर्थ असा आहे की,
अगदी एक चित्त होऊन देवाचे दर्शन घ्या व तुम्हाला काय अनुभव येतो तो पहा.
गीता माहात्म्य
गीता सुगीता कर्तव्या किमन्यै: शास्त्रविस्तरैःया स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद् विनिसृता :
गीतेचे माहात्म्य सांगितले आहे की, स्वतः भगवान श्रीविष्णू यांच्या मुखकमलातून बाहेर पडलेली (सांगितली गेलेली) गीता चांगली वाचावी (अर्थातच आचरणात आणावी). असे केले तर इतर शास्त्रांच्या पसाऱ्याची काय आवश्यकता? सर्व शास्त्रांचे सार गीतेत सामावले आहे, हे समजून घेऊन आचरणात आणावे.
एकनाथांचे अभंग
जेथे परापश्यन्तीची I मावळली भाषा I
तो स्वयंप्रकाश I दावी गुरू II
उद्धार विश्वाचा I दीपकु तेजाचा I
प्रकाश कृपेचा I दावियला II
त्रिभुवनीचा दीप I प्रकाशु देखिला I
हृदयस्थ पाहिला I जनार्दन II
दीपाची ती वाती I वातीचा प्रकाश I
कळिकामय दीप I देही दिसे II
चिन्मय प्रकाश I स्वयं आत्मज्योती I
एका जनार्दनी भ्रांती I निरसली II
काळाचे शास्त्र I गाता श्रीहरीचे गुण II
ऐसे सुलभ नाम वाचे I घेई घेई गोविंदाचे II
🌺 🌺 🌺
संत तुकारामांचे अभंग
अमृताहूनि गोड नाम तुझे देवा
मन माझे केशवा का बा ना घे
आनंदे कीर्तन कथा करी घोष
आवडीचा रस प्रेम सुख
स्वल्प मंत्र वाचे बैसलासे निका
रामकृष्ण सखा नारायण
तुका म्हणे चित्त रंगलेसे ठायी
माझे तुझ्यापायी पांडुरंग
🙏
धर्माचे पालन करणे पाषांडखंड
हेचि आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम
तीक्ष्ण उत्तरे । हाती घेऊनि बाण फिरे।।
नाही भीड भार । तुका म्हणे सानाक्षरे ।।
🙏
विभूतीच्या लेपे शरीर अवघे शुभ्र विलसेस्मशानी जो राहे करी रुचिर व्याघ्रां दिसे
स्वभावे निर्वाण सुरवर मुनी ज्यासी जपती
असा शंभो द्वाही सकळ तुमचे अर्थ पुरवी
🙏
उंच नीच काही नेणे भगवंत
तिष्ठे भाव भक्त देखोनीया
पुंडलिकासाठी अझुनि तिष्ठत
तुका म्हणे मात धान्य त्याची
🙏
पराविया नारी रखुमाई समान
हे गेले नमून ठाईचे ची
एक दरीला चित्ती I आम्ही रखुमाईचा पती II
तेणे झाले अवघे काम I निवारिला भवभ्रम
पर द्रव्य पर नारी I जाली विषाचिये परी
🙏
कन्या सासुऱ्याशी जाये I मागे परतोनी पाहे
तैसे होई माझ्या जीवा I कधी भेटसी माधवा
🙏
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
रवी शशी कळा लोपलिया
🙏
नाम संकीर्तन साधन पै सोपे
जळतील पापे जन्मांतरीची
न लागे सायास जावे वनांतरा
सुखे येतो घरा नारायण
साधकाची दशा उदास असावी
उपाधी नसावी अंतर्बाहय
लोलुप्यता काय निद्रेसी जिंकावे
भोजन करावे परिमित
नमो आदि रूपा ॐकार स्वरूपा
विश्वाचिया रूपा मायबापा
भोक्ता नारायण लक्ष्मीचा पती
म्हणूनि प्राणाहुती घेतलीया
तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते
आणीन त्वरित मोरयासी
🌺 🌺 🌺
बहिणाबाईचे अभंग
सखा सहोदर तूच एक हरीदिनाचा कैवारी पांडुरंग
बहिणी म्हणे देवा ऐसिया संकटी
करी कृपादृष्टी गुरुवर
षट्चक्रभेदन
उच्चतम भक्तीच्या साह्याने 'षट्चक्र भेदन' ही अवस्था प्राप्त होते. ह्याच अवस्थेला 'ऋषित्व' म्हणतात व ही अवस्था आली की ज्ञान आपोआप पाझरू लागते. ही सतरावी जीवन कला आहे. भक्तियोगातून ज्ञानप्राप्ती होते.हिंदूंच्या धर्मग्रंथात वर्णन केलेली सहा दर्शने अशी आहेत:-
१.सांख्य २.योग ३.वेदांत ४. मीमांसा ५.न्याय ६.नैरोषिक
योगी कथामृत (परमहंस योगानंद) या ग्रंथातून घेतले आहे (पान नं.३२०).
भगवान पतंजलीचा काळ अनिश्चित आहे. काही विद्वान तो ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात झाला असे मानतात.
चित्तवृत्ती:-१.प्राणशक्ती २.मानस ३.अहंकार ४.बुद्धि यांचा समावेश होतो.
आणि वृत्ति म्हणजे शब्दश: 'भोवरा' म्हणजे विचार व भावना.
अलिकडच्या उपनिषदांमध्ये या षड्दर्शनांपैकी योगसूत्रांना सरळ सत्यशोधन करण्याची सर्वोत्तम पद्धत मानली जाते.
योगासारख्या प्रात्यक्षिक तंत्राचा अभ्यास करून मनुष्य तर्क, कुतर्काचा वैराण मुलूख पाठीमागे टाकून परमात्मतत्त्वाचा अंतिम सत्याचा अनुभव करून घेतो.
भगवान पतंजलीच्या योगपद्धतीला 'अष्टांगयोगपद्धती' असेही म्हणतात.
या पद्धतीची पहिली दोन अंगे म्हणजे -
१. यम - नैतिक व्यवहार आणि २. नियम - धार्मिक व्रते.
यम म्हणजे सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह आणि नियम शौच, तप, संतोष, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिपात.
पुढील अंगे म्हणजे (३) आसन (बसण्याची शास्त्रशुद्ध बैठक) :- मेरुदंड ताठ असला पाहिजे आणि शरीर ध्यानाच्या दृष्टीने सुखावह अशा आसनामध्ये स्थिर असले पाहिजे (४) प्राणायाम (प्राण सूक्ष्म जीवनप्रवाह यावर नियंत्रण ठेवणे) आणि (५) प्रत्याहार (बाह्य वस्तूंपासून इंद्रियांना आत खेचून घेणे).
शुद्ध योगाची शेवटची दोन अंगे म्हणजे (६) धारणा (एकाच विचारावर मन केन्द्रित करणे) (७) ध्यान (८) समाधी (अतींद्रिय ज्ञानाचा अनुभव).
ह्या अष्टांगयोगाच्या साधनेने कैवल्यप्राप्ती होते. म्हणजे योगी बुद्धियुक्त अवलोकनाच्या पलिकडे जाऊन सत्यदर्शनाचा अनुभव घेतो.
महर्षी व्यास
-प्रा. मेधा सोमण
महर्षी व्यासांनी निर्माण केलेल्या आणि संपादित केलेल्या साहित्याला व्यासचर्या असे म्हटले जाते. संस्कृतीचा धर्म, अर्थ, राजकारण, समाजकारण, शिक्षण, कला, वाङ्मय आणि विज्ञान अशा अष्टांगांवर त्यांनी जितका प्रकाश टाकला तेवढा आजपर्यंत कुणीही टाकला नाही.पराशराचे पुत्र म्हणून व्यासांना पाराशर असे म्हणतात. ते वर्णाने काळे होते आणि द्वीपामध्ये त्यांचा जन्म झाला. म्हणून त्यांना कृष्णद्वैपायन असेही म्हणतात.
वेदांचे विषयवार विभाजन त्यांनी केले म्हणून त्यांना वेदव्यास म्हणतात. अलौकिक प्रतिभावान व्यक्तिमत्त्व असलेले महर्षी व्यास यांचे कर्तृत्व असामान्य, अद्वितीय असे आहे. वेदोत्तर कालापासून आजपर्यंत हिंदुस्तानी संस्कृतीवर त्यांच्याइतका प्रभाव दुसऱ्या कुणाचाच राहिलेला नाही.
वेद राशींचे विभाजन:
महर्षी व्यासांना वेदांबद्दल अपार निष्ठा होती. वैदिक वाङ्मयाचे प्रतिबिंब प्रत्येक वाङ्मयात पडले पाहिजे असा महर्षी व्यासांचा आग्रह होता.
हजारो वर्षांपासून वेदांनीच समाजाला जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक व विधायक दृष्टिकोन दिला आहे, तेजस्वी जीवननिष्ठा शिकविली आहे.
जीवेत शरद: शतम् | नन्दाम: शरद: शतम् | अदीन: स्याम् शरद: शतम् |
मी लाचार न होता ताठ मानेने शंभर वर्षे जगेन अशा हिंमतीने जगण्याची प्रेरणा वैदिक वाङ्मयच देते, असा त्यांचा विश्वास होता. अशा वेदराशींचा अभ्यास सर्वांनाच उभ्या आयुष्यात करता येईल असे नाही, म्हणून महर्षी व्यासांनी वेदराशींच्या ऋचांची वर्गवारी केली.
भारतीय घटना
भारताचे संविधान
आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निर्विघ्नपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये एकीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारा बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना अस्तित्वात
आतापर्यंत ९४ घटना दुरुस्त्या
उद्देशिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे शब्द ४२वी घटनादुरुस्ती करून समाविष्ट करण्यात आले.
उद्देशिकेत राष्ट्राची एकता व एकात्मता हे शब्दही ४२वी घटनादुरुस्ती करून समाविष्ट करण्यात आले.
महत्त्वपूर्ण दुरुस्ती
१ मार्च १९८५: पक्षांतर बंदी
२८ मार्च १९८९: मतदानाच्या अधिकाराचे वय २१ वरून १८ वर.
१२ डिसेंबर २००२ सहा ते चौदा वयोगटातील बालकांना शिक्षणाचा अधिकार.
१७ जानेवारी २००४ मंत्रिमंडळाचा आकार लोकनियुक्त सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्या घ्या १५ टक्के करण्याचा निर्णय.
२० जानेवारी २००६ इतर मागासवर्गीयांना सरकारी तसेच खाजगी संस्थेमध्ये आरक्षण.
मसुदा समितीची स्थापना : २९ ऑगस्ट १९४७
सदस्य संख्या : ६
स्वीकृतिपूर्व कालावधी : १ वर्ष ११ महिने १८ दिवस
इंग्रजी आवृत्तीतील शब्दसंख्या: १ लाख १७ हजार ३६९
घटनेत काय :
१२ भाग १४ परिशिष्टे १२ अनुसूची ३९५ कलमे ९५ दुरुस्त्या
मूलभूत हक्क
समानतेचा हक्क-कायद्यापुढे सर्व समान. धर्म, जात, लिंग, जन्मस्थान या किंवा यांपैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करता येणार नाही.
राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवायोजना किंवा नियुक्ती यांमध्ये सर्वांना समान संधी.
भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय लाभाच्या पदावरील व्यक्ती परकीय देशाकडून किताब स्वीकारणार नाही.
सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क
भारताच्या राज्यक्षेत्रात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहण्याचा, आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी वा संस्कृती असेल त्याला ती जतन करण्याचा हक्क असेल.
स्वातंत्र्याचा हक्क
भाषा, अभिव्यक्ती, शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचा, अधिसंघ वा संघ बनविण्याचा, भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचा वा स्थायिक होण्याचा, कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालविण्याचा हक्क.
शिक्षणाचा हक्क
वय ६ ते १४ वयाच्या बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद (२००३ मध्ये ८६ वी सुधारणा).
वेठबिगारी
बालकांना कामाला ठेवण्यास मनाई (१४ वर्षांखालील बालकांना कामावर ठेवण्यास मनाई).
सदसद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार.
अधिक मास
दर तीन वर्षांनी येणा-या या मासाला अधिक मास म्हणतात. याला आणखी 'मल' मास असेसुद्धा म्हणतात. तिसरा शब्द आहे , धोंड्या मास.पृथ्वीभोवती चंद्राची एक फेरी होण्यास जो काळ लागतो, त्यास चांद्रमास म्हणतात. याप्रमाणे त्यांच्या १२ प्रदक्षिणा पूर्ण होण्यास एकूण ३५४ दिवस लागतात.
पृथ्वीची सूर्याभोवती एक प्रदक्षिणा होण्यास एक वर्षाचा काळ लागतो, त्याला सौरवर्ष असे म्हणतात. आपले सण, व्रतवैकल्ये ही चंद्रावर अवलंबून असतात तर ऋतू हे सूर्याच्या उगवण्यावर अवलंबून असतात. ठराविक सण, व्रतवैकल्ये ही ठराविक ऋतूमध्ये यावीत यासाठी चांद्रवर्ष व सौरवर्ष यांचा ताळमेळ साधणे आवश्यक आहे. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करावयास ३६५ दिवस, ५ तास, ४८ मिनिटे व ४६ सेकंद लागतात.
यालाच सौरवर्ष म्हणतात. तर चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालावयास ३५४ दिवस ८ तास ४८ मिनिटे ३४ सेकंद एवढा काळ लागतो. यालाच चांद्रवर्ष म्हणतात. यामुळे दर वर्षी चांद्रवर्ष व सौरवर्ष यांमध्ये ११ दिवसांचा फरक पडतो. एका चांद्रवर्षात ३६० तिथी येतात. तर एका सौर वर्षात ३७१ तिथी येतात. हे अंतर अधिक वाढू नये तसेच या दोन्हींत समन्वय साधला जावा म्हणूनच दर तीन वर्षांनीं चांद्र वर्षातील एक महिना अधिक धरला जातो. या वाढीव महिन्यास अधिक मास म्हणून संबोधले जाते.
सामान्यतः प्रत्येक चांद्रमासात एक सौर क्रांती होत असते. सूर्याच्या गतीस संक्रमण म्हणतात. अशा १२ सूर्य क्रांती घडत असतात. चैत्रादी १२ महिन्यांचे १. वरुण २. सूर्य ३. भानू ४. तपन ५. चण्ड ६. रवी ७. गभस्ती ८. अर्यमा ९. हिरण्यरेता १०. दिवाकर ११. मित्र १२. विष्णू असे एकूण १२ सूर्य आहेत. सूर्याचे राशिवास्तव्य हा मूलभूत आधार असला तरी कधी, कधी असेही घडते की एखाद्या महिन्यात संक्रमण होत नाही. ज्या महिन्यात अशी एकही सौरक्रांती घडून येत नाही, म्हणजेच तो चांद्रमास पूर्णपणे दोन संक्रांतींच्या मध्ये येतो. तो अधिक मास समजला जातो.
प्लेगचा हाहा:कार आणि शेक्सपिअरचा जन्म
(हा उतारा त्यांनी माझ्याच 'मुलांसाठी शेक्सपिअर' या पुस्तक संचातून लिहिला आहे)इंग्लंडमध्ये वॉरिक परगण्याच्या दक्षिण भागामध्ये स्ट्रॅटफर्ड नावाचे एक छोटेसे गाव आहे. गावाच्या मधून एक सुंदर नदी वाहते. या नदीचे नाव ॲव्हन. ॲव्हन नदीवरून गावाची ओळख स्ट्रॅटफर्ड ऑन ॲव्हन.
स्ट्रॅटफर्ड गावाची वस्ती जेमतेम दोन हजार माणसांची. स्ट्रॅटफर्डच्या उत्तरेला अरण्य आहे.
स्ट्रॅटफर्ड गाव लहान असले तरीसुद्धा ते बाजाराचे ठिकाण होते.
स्ट्रॅटफर्डमध्ये हेन्ली स्ट्रीट नावाच्या रस्त्यावर चामड्याच्या वस्तू बनवून विकणारा एक छोटा व्यापारी राहत होता. त्याचे नाव होते जॉन शेक्स्पिअर. जॉन गावातील खाटकांकडून किंवा अन्य दुकानदारांकडून बकरे, हरीण आणि इतर प्राण्यांची कातडी घेऊन येई. केसाळ प्राण्यांची कातडी मऊ असत तर काही कातडी कडक असत. मऊ कातडे कापणे हे कौशल्याचे काम होते.
अशी निरनिराळी कातडी आपल्याला हव्या त्या आकारात कापून घेऊन जॉन नंतर मोठी सुई आणि जाड दोऱ्याने निरनिराळ्या वस्तू बनवत असे. या वस्तूंमध्ये हातमोजे, अंगात घालावयाचे कपडे, खेळणी इत्यादी असत.
जॉनने हे कौशल्य सात वर्षांच्या परिश्रमांनी आत्मसात केले होते. मदतीला कारागीर असतं.
जॉनचा हा व्यवसाय असल्यामुळे घरामध्ये जिकडे तिकडे कातड्याचा उग्र वास येत असे. विकण्यासाठी मांडलेल्या कातड्याच्या निरनिराळ्या वस्तू दिसत.
गुरुवारच्या दिवशी स्ट्रॅटफर्डमध्ये आठवड्याचा बाजार असल्याने रस्त्यावर, पुलावर , चौकात स्टॉल उभारून जॉन आपल्या वस्तू विकावयास ठेवी. जॉनच्या वस्तू कौशल्याने बनविलेल्या असल्याने त्यांची विक्रीही चांगली होईल.
जॉन सावकारीही करीत असे. त्याने स्ट्रॅटफर्डमध्ये सभोवताली बगीचा असलेले प्रशस्त घर खरेदी केलेले होतेच. पुढे त्याने बाजूची आणखी दोन घरे खरेदी केली. त्याचा व्यापार भरभराटीस येत होता. समाजात त्याला बरीच मानमान्यता मिळतं होती. काही अधिकाराची पदेही त्याच्याकडे चालून आली. एकदा तो स्ट्रॅटफर्डचा बेलिफही झाला. बेलिफचे पद नगराध्यक्षाच्या पदाएवढे मोठे होते.
जॉनच्या पत्नीचे नाव मेरी. मेरी एका शेतकऱ्याची मुलगी होती. तिचे वडील रिचर्ड आर्डन यांची बरीच मालमत्ता होती आणि काही त्यांनी मेरीच्या नावावर केली होती. मेरी आपले घरकाम सांभाळून जॉनला त्याच्या कातडी वस्तू बनविण्याच्या कामात मदत करीत होती.
जॉन आणि मेरीला पहिली मुलगी झाली. पण ती फार दिवस जगली नाही. त्या काळी अनेक प्रकारच्या रोगांनी लहान मुलांचा मृत्यू होई. औषधपाण्याची फारशी सोय नव्हती. मुलगी मेल्याने जॉन आणि मेरीला फार दु:ख झाले.
मेरीला पुन्हा दिवस गेले आणि दुसरी मुलगी झाली. परंतु ही मुलगी सुद्धा जास्त जगली नाही.
लवकरच मेरीला एक मुलगा झाला. तीन दिवसांनी ख्रिस्ती धर्मविधीप्रमाणे मुलाचा बाप्तिस्मा करावयाचे ठरले.
जॉन आणि मेरी बाळाला पांढरे कपडे स्ट्रॅटफर्डमधील होली ट्रिनिटी चर्चमध्ये घेऊन आले. फादरनी मंत्र म्हटले. बाळाच्या वतीने जॉन आणि मेरीने फादरनी म्हणावयास सांगितलेली वचने म्हटली. फादरनी बाळाच्या डोक्याला पवित्र जल लावले. कपाळावर बोटांनी पवित्र क्रॉसची आकृती काढली.
बाळाचा बाप्तिस्मा पूर्ण झाला. ही तारीख होती २५ जुलै १५६६.
बाळाचे नाव ठेवण्यात आले, 'विल्यम.' याच विल्यमने विल्यम शेक्सपिअर या नावाने प्रसिद्ध नाटककार बनून नाट्यक्षेत्रावर आजतागायत अधिराज्य गाजविले. त्याची गोष्ट आपण येथे माहीत करून घेणार आहोत.
अमृतकण
पांडुरंगाष्टकम्
हरिपाठ-अंतरंग दर्शन
(
गीता माहात्म्य
एकनाथांचे अभंग
बहिणाबाईचे अभंग
षट्चक्रभेदन
महर्षी व्यास -प्रा. मेधा सोमण
भारतीय घटना
●
●
●
●
●
अधिक मास
शेक्सपिअर
|
|
|
|
कौस्तुभचा वाढदिवस (स्मिताच्या अल्बममधून) |
|
|
|
|
२००० अद्वैतची मुंज
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
श्यामाच्या लग्नात |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा