शुक्रवार, ३ मार्च, २०२३

बालगीते

 

बालगीते 


मुलांच्या संगोपनामध्ये बालगीतांचे फार मोठे महत्त्व आहे. बालगीतांमधून मुलांचा प्रथम भाषेशी परिचय होतो. बालगीतांतून त्यांचे भाव विश्व तयार होते. यमकांमधून त्यांच्या मनात भाषेचे प्रोग्रामिंग होत जाते आणि भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची पार्श्वभूमी तयार होते. माझ्या मोठ्या  भावाच्या कॅनडा मध्ये असणाऱ्या नातवासाठी तक्ष साठी मी काही बालगीते लिहून पाठवली. त्यांसाठी चित्रेही मीच काढली. ही बालगीते प्राण्यांची ओळख तसेच माहिती करून देण्यासाठी आहेत. ही बालगीते तुमच्या घरातील लहानग्यांना म्हणून दाखवा आणि मला प्रतिक्रिया जरूर पाठवा.  

 

बाबा आणि अमनी 


बाबा आणि अमनी

होती अमनी नावाची | गरीब मुलगी गुणाची

चिंध्या झाल्या कपड्यांच्या | झिपऱ्या झाल्या केसांच्या

होती बाबांची लाडकी  | बाबांना भेटायला यायची  |  

एक दिवस हट्ट धरला | 'बाबा, रुपैया द्या मला' |

बाबा खोटे रागावले | डोळे वटारले |

अमनी हिरमुसली | मुसमुसू लागली |

बाबांनी जवळ घेतले  |  डोळे तिचे पुसले | 

खिशातून रुपया काढला | अमनीच्या हातावर ठेवला | 

अमनी खुदकन हसली | बाबांनी पापी घेतली 

लहान मुले आवडतात बाबांना | म्हणून करा रोज नमस्कार त्यांना

व्हेल मासा


मी आहे व्हेल मासा जगातील मोठा प्राणी | 
नाकातून उडवतो कारंजे गातोही गाणी |
लाखो वर्षापूर्वी मी चालत होतो जमिनीवर | 

पायांचे झाले पर आता समुद्र माझे घर |

पांडा

मी आहे पांडा, अस्वलाचा भाऊ

बांबूचे बन  माझे घर, बांबू माझा खाऊ

हत्ती

मी आहे हत्ती, भला मोठा प्राणी

सुपासारखे कान,

खांबासारखे पाय

सोंडेतून उडवतो पाणी

सुळे माझे पांढरे शुभ्र

चालतो मी डुलत डुलत

ओढून मोठी लाकडे

करतो तुम्हाला मदत

झेब्रा

दिसतो मी घोड्यासारखा पण नाही मी घोडा

विचार करणारा होतो खरोखर वेडा

भेटतो मी तुम्हाला रस्त्यावर, लाल, हिरव्या दिव्यांवर,

आई म्हणते,' नेहमी चाल झेब्रा क्रॉसिंगवर, बाळा'

तोच मी झेब्रा, ओळखा, काळ्यावर पांढरा की पांढऱ्यावर काळा

पोपट

 


 

पोपटभाऊ पोपटभाऊ, 

सांग पाहू झटपट 

मिळवलास कुठून हा 

हिरवा  हिरवा शर्ट 

ताईची लिपस्टिक लाल 

मिळाली कशी तुला 

बाबांचा टाय निळा 

गळ्यात कसा आला |

नको बघू घाबरून, 

नाही टाकणार पिंजऱ्यात  |

पाहीन तुला आनंदात, 

हिरव्यागार पानांत ||

मुंगीताई


 

मुंगीताई मुंगीताई

कुठे चाललीस तुरु तुरु

बस जरा थोडा वेळ 

आपण दोघं गप्पा मारू

घर तुझं आलिशान

जसा मोठा टॉवर

आहे का घरी तुझ्या 

टीव्ही, फ्रिज आणि गीझर

सदा बाई तुझं काम काम 

पावसाळा येईल म्हणून गाळतेस घाम

दिसतेस चिंगी, पण ताकद तुझी फार

चावलीस की सारे होतात बेजार

माझा घोडा 

तबडक तबडक धावे 

माझा घोडा ऐटदार

वाऱ्याला ही टाकीन मागे 

होऊन त्यावर  स्वार

ओलांडीन नदी 

ओलांडीन माळराना

राक्षसाच्या गढीत जाऊन 

आणीन त्याचा खजिना

रात्र होता घरी येईन 

घोड्यास दाणापाणी देईन

आईच्या कुशीत झोपून 

गोड गोड स्वप्न पाहीन

कासव 



भले मोठे दप्तर

मारून पाठीला

ठुमकत निघाले

कासव शाळेला

सर्वांच्या आधी

कासव पोहचले

टीचरनी त्याचे

खूप कौतुक केले

टीचरच्या कौतुकाने

कासव गेले लाजून

डोके आणि पाय घेतले

ऑक्टोपस

आतमध्ये ओढून

मी आहे ऑक्टोपस

राहतो खोल समुद्रात

मोजा माझे आठ पाय

रंग बदलतो मी क्षणात

जिराफ 

नको मला कुत्रा

नको मांजर पाळायला

आणशील का आई मला

जिराफ खेळायला

खेळीन घसरगुंडी

लांब त्याच्या मानेवरून

लाडवाचा डबा

शोधून काढीन फळीवरून

लांब त्याच्या मानेवरून

जाईन आभाळात

चांदोबाशी खेळीन

आणि लोळेन ढगात

नको सांगू बाबांना

खेळणी आणायला

आणशील का आई मला

जिराफ खेळायला

बेडूक राव

बेडूक राव बेडूक राव

डोळे का वटारता

ओरडता डराव डराव

टुणकन उडी मारता

पाऊस पडू लागला की

दिसू तुम्ही लागता

पाउस संपला की

गायब कुठे होता

जीभ हलवता

किडा पकडता झटक्यात

पळा पळा साप आला 

मारा उडी डबक्यात

 मगर 

मगर पहा मगर

दिसते भयंकर

ब्रश रोज करते

दात मजबूत ठेवते

जबड्यातून तिच्या

कुणी नाही सुटते

झुरळ 

'झुरळ आलं झुरळ'

म्हणून ओरडता

दिसलो की मला

मारायला धावता

टाकता तुम्ही कचरा

मी साफ करतो भराभरा

तरी मला मारता

झाडूने ठोकता

स्वच्छता पाळा

आणि मला टाळा

गोगलगाय



शंखासारखे घर

घेऊनिया पाठीवर

हळू हळू चाले भारी

गोगलगायीची स्वारी

गवतामध्ये राहते

मिळेल ते खाते

अंग तिचे मऊ भारी

गोगलगायीची स्वारी

जाते जेव्हा घाबरून

राहते घरात बसून

आहे गरीब बिचारी

गोगलगायीची स्वारी

फुलपाखरू

आई, पहा ना फुलपाखराला

फुलावर डोलते, वाऱ्यावर उडते

सांग ना आई मी धरू का त्याला'

'नको रे बाळा, उडू दे त्याला

माझ्यासारखी त्याची, आई आहे घरी

म्हणेल कुठे गेला, माझा सोनुला '

'आई, फुलपाखराचे एवढे कसे रंग ?

पिवळे, काळे, सोनेरी, निळे 

पंखावर नक्षी काढली कोणी सांग'

'आकाशात आहे देवबाप्पा बाळा

रंगवतो फुलांना, फळांना, पानांना

त्यानेच रंग दिले फुलपाखराला'

 'आई, मी दुरून पाहीन फुलपाखराला

उडू दे त्याला, खेळू दे त्याला

मित्रांना त्याच्या भेटू दे त्याला'

'फुलपाखरू आहे मित्र फुलांचा

तुझा नि माझा, साऱ्या  जगाचा

फुलपाखरू माझे, बाळ माझा गुणाचा'

 गाढवदादा

गाढवदादा, गाढवदादा,

वेडेपणा करतोस सदा

नको उगी ओरडू

नको लाथा झाडू'

'भाऊ, माझं ऐकशील?

देवाजीला सांगशील?

तू गाढवाला

असा का बनवला?

त्याला राबवतात

आणि दांडक्याने मारतात

मोडला पाय

की रस्त्यावर सोडतात

भाऊ, माझं ऐकशील?

मालकाला सांगशील?

नको मारू गाढवाला

खायला दे त्याला

करतो तो खूप काम

दे त्याला थोडा आराम'

गेंडा 

गेंडा रे गेंडा

मिरवितो मोठे शिंग

जसा काही झेंडा

कातडी जाड

अगडबंब धूड

तरी भारी चपळ

जाऊ नका जवळ

उंट 

वाकडी मान

कुबड पाठीला  

तुडवीत वाळवंट

उंट चालला 

उन्हाचे चटके

वादळे धुळीची

उंटाला नाही

पर्वा कशाची

पाला नाही खायला

पाणी नाही प्यायला 

धीराने तरी 

उंट चालला

वाळूचा दर्या

पार करवील

खरे हे जहाज

वाळवंटातील

 म्हैस 

म्हशी ग म्हशी |

किती तू  आळशी  ||ध्रु||

डुंबतेस डबक्यात |

माखतेस चिखलात |

डुलत डुलत घरी पोहचशी || १||

तोंडात गवत साठवून ठेवतेस |

येऊन घरी रवंथ करतेस ||

बत्तीस वेळा का एक घास चावशी ||२||

कावळा 

 

काळा कावळा

दिसतो बावळा

अंगात परी

नाना कळा

खिडकीतून हळूच

डोकावून पाहतो  

पोळी उचलून

उडून  जातो

'काव काव' ओरडतो 

आणि सांगतो 

येणार घरी 

मामाची स्वारी  

कोळी 

घसरतो, पडतो

पुन्हा वर चढतो

घराच्या छतावर

कोळी पहा चालतो

रेशमी धागा तोंडातून काढतो

काना-कोपऱ्यातून जाळी विणतो

किड्या-मकोड्यांना जाळ्यात धरतो

फुकटात घराचे पेस्ट कंट्रोल करतो

हवं तर झाडूने बाहेर ढकला  

पण मारू नका तुमच्या मित्राला  

नसेल कोळी तर किडे वाढतील

अन्न तुमचे फस्त करतील 

उंदीरमामा 



लुकू लुकू बघतो

चूं चूं करतो

खुट्ट झालं की

बिळात लपतो

उंदीरमामा तू त्रास फार देतो

पुस्तकं माझी कुरतडतो

बोलावू मांजरीला ?

आता का पळतो

 कोंबडा

 

ताई, पहा कोंबडा

तुरा त्याचा तांबडा

चोच बाकदार

शेपूट झुपकेदार

ऐटदार चाल

जसा कोतवाल

नजरेला करड्या

घाबरती कोंबड्या

'कुकूच कू' करतो

सूर्य उगवता

जणू काही सांगतो,

'उठा आता' 

मनी  

 

मनी माझी लाडाची

आहे मोठी गुणाची 

सशासारखे अंग मऊ

शेपूट झुबकेदार

उंचावरून उडी मारून 

उभी चार पायांवर 

खुशीत आली की

लोळते अंग ताणून 

रुसली की कोपऱ्यात   

बसते मिशा फिसकारून 

 दूध हवे असले की  

'मियॉंव मियॉंव' करते

चेंडू दिला की

खेळत बसते

दाखवते प्रेम

अंग घासून पायाला

मनीसारखी मैत्रीण

दुसरी नाही मला

साप

जीभ लवलवती

चट्टे पट्टे अंगावरी

साप सारे

नाही विषारी

पाय नाही बापड्याला

म्हणून सरपटतो

अध्यात मध्यात नाही कुणाच्या

सर्वांना टाळतो

येत नाही बोलायला

म्हणून फुत्कार टाकतो

घाबरतो तुम्हाला

म्हणून फणा काढतो

उंदीर घुशी खातो

धान्य वाचवतो

नका उगारू लाठ्या-काठ्या |

मित्र माना त्याला |

चिऊताई 



'आजी, आजी, चिऊताई का भिरभिरते?

सकाळी सकाळी काय बरं शोधते ?'

'माणसानं बांधली मोठी घरं बाळा

नाही ठेवली जागा चिऊताईला

चिऊताई भिरभिरते

घरट्यासाठी जागा शोधते'

'आजी, माझ्या खोलीत जागा दे चिऊताईला

खुशाल घरटं तिथे बांधू दे तिला

आणू  दे तिला तिच्या बाळांना

दाणापाणी देईन मी त्यांना'

'गुणी बाळा, तुझं बोलणं ऐकून

काड्या आणायला गेली चिऊताई उडून'

मोर


                                                                         झाडावर बसला

आई पहा मोर 

 झुलतो त्याचा 

पिसारा सुंदर 

अंग निळे निळे 

डोक्यावर तुरा 

जांभळ्या ठिपक्यांनी

भरला पिसारा 

पाऊस आला की 

होतो आनंदित 

पिसारा फुलवून 

नाचतो खुशीत

 कुत्रा  

मोत्या, टिपू आधी होतो

डॉगी, रॉकी आता झालो 

दारामध्ये तेव्हा होतो

आता तुमच्या घरात आलो

खुट्ट झालं की कान टवकारतो

वासाने मी माणूस ओळखतो

खुशीत आलो की शेपूट हलवतो

छोट्या मुलांना मी आवडतो

चोर मला घाबरतात

राखण करतो घराची

मदत करून पोलिसांची

मिळवली पदके सोन्याची

 बदक 

 

पसरट चोच

ढब्बू अंग

बदक चाले

जसा गब्बरसिंग

पाण्यात शिरता

तरंगते डौलात

नाव जशी जाते

पाणी कापीत

क्वॅक क्वॅक क्वॅक क्वॅक

दिवसभर बोलते

बाळाला खेळायला

बोलावते

डायनॉसॉर्स 

'आजोबा, आजोबा,

खूप पुस्तकं वाचता

कुठे भेटेल डायनॉसॉर्स

मला जरा सांगता?'

'खूप खूप  पूर्वी

नव्हतो आपण कोणी 

तेव्हा होते डायनॉसॉर्स

सरपटणारे प्राणी

कुणी बिल्डिंगएवढे अगडबंब  

कुणी कोंबडीएवढे चिमुकले 

आज ते कुणीही  

शिल्लक नाही राहिले

आता त्यांना पाहायचे

फक्त पुस्तकांत

असतील कदाचित

ते आपल्यात'

हरण 

इवलेसे कान

डोळे टपोरे

चिमुकल्या तोंडाचे 

हरण गोजिरे

कळपात राहते 

वाऱ्यासारखे धावते

उंच उडी मारते

नदी पोहून जाते    

आहे भारी बुजरे  

दूर दूर राहते

चारा दिला

की जवळ येते 

  गरुड 

उंचावर आकाशात

जसे तरंगते विमान  

उडतो गरुड 

पंख पसरून 

नखे मजबूत

चोच बाकदार

ताकद पंखात 

पाहतो झोकात

भक्ष्य दिसता 

धारदार नजरेला

गरुडाच्या पकडीतून

वाचवील कोण त्याला

खेकडेराव 

खेकडेराव खेकडेराव

रुबाब तुमचा भारी 

कवच तुमचे मजबूत 

जसे चिलखत अंगावरी 

नांग्या तुमच्या धारदार 

जशा तलवारी फिरती 

तावडीत सापडेल त्याचे 

तुकडे दोन करती

लढाईला कुठल्या 

निघाला वीर फाकडे

चाला जरा सरळ

नका चालू वाकडे

वानर 

या फांदीवरून 

त्या फांदीवर 

मारीत उड्या 

जातो वानर 

झाड त्याचे घर 

फळे आहार

वानरास नाही 

उद्याचा विचार

त्रास नका देऊ

उगीच त्याला

धडगत नाही

जर तो चिडला

कोंबडीबाई

 
कोंबडीबाई

कुक् कुक् करते

मान उडवीत

तोऱ्यात फिरते

कोंबडीबाईला 

भूक फार लागते

सदा न् कदा 

दाणे टिपते

कोंबडीबाई

पिलांना जपते 

घार  दिसली की 

पंखाखाली घेते

ससा  

 

 मऊ मऊ अंगाचा

टपोऱ्या डोळ्यांचा

कान टवकारीत

ससा आला दारात

नाक कसे खाजवतो

लुबू लुबू खातो

तुरु तुरु चालत

ससा आला दारात

मोबाईल ठेव बाजूला

ये जरा खेळायला

सांगायला मला

ससा आला दारात

कांगारू  

पुढे दोन पाय छोटे

मागे दोन पाय मोठे

जमिनीला शेपूट टेकते 

कांगारू उड्या  मारते 

माणसासारखे उभे राहते

मागील दोन पायांवर 

त्याच पायांनी हाणते

प्राण्यांमधील किक बॉक्सर

बाळाला  ठेवून

पोटाच्या पिशवीत  

कांगारूंची आई 

फिरते खुशीत

कांगारू खेळते, बागडते

कुणाच्या वाटेला न जाते

 याक 

उंच प्रदेशात

याकची वसती

गाय त्याला समजून

भले भले फसती

जाड कातडी

केस अंगावर 

याकचा जणू

ऊबदार स्वेटर

डोंगर उंच

बर्फ सभोवती

सांभाळीत पावले

याक चाले 

प्राणी येथे

कोण टिकणार

येथील लोकांना

याकचा आधार

 कबूतर 

खिडकीत बाळाने

दाणे ठेवले

पंख फडफडत

कबूतर आले

इवल्याशा डोळ्यांनी

पाहिले बाळाला

'घे घे खा खा,'

बाळ म्हणाला 

चिमुकल्या चोचीने

टिपले दाणे 

' गुटर्र  गू  गूटर्र गू 

म्हटले गाणे

हसला बाळ 

खुशीत येऊन 

कबूतर गेले

भुर्रकन उडून

 बगळा  



चोच निमुळती

नागमोडी मान

तळ्याच्या काठावर

बगळ्याचे ध्यान

नजर फिरवी

अधून मधून

पंख साफ करी

चोचीने छान

फसला मासा

जवळ आला

झटक्यात बगळ्याचा

घास झाला

कोकिळा 

माळरानात दूर 

कोकिळेचे घर

रंग काळासावळा

परी गोड गळा

'कुहू कुहू' आवाज 

येतो कुठून 

गाते कोकिळा

पानांआडून 

सांगे 'ऋतू वसंत

आला करू स्वागत'

 वाघोबा 

पिवळ्या अंगावर

पट्टे काळे  

वाघोबाचे घर

करवंदाचे जाळे

वाघोबाचे डोळे

जळते निखारे

वाघोबाच्या डरकाळीने

जंगल सारे हादरे

वाघोबा म्हणजे

सर्वांत मोठे मांजर

तरीसुद्धा पाण्यामध्ये

पोहून जाती झरझर

शिकारीदादा नको करू

शिकार वाघोबाची

नाहीतर फक्त चित्रात

भेट होईल त्याची

मेंढीबाई 

 


मेंढीबाई मेंढीबाई

गोजिरवाणी दिसते

हिरव्या कुरणामध्ये

दिवसभर चरते

मेंढीबाई मेंढीबाई

कळपामध्ये राहते

कळपातून हरवली की

'बें बें ' ओरडते

मेंढीबाई मेंढीबाई

मऊ लोकर देते

स्वेटर घालून मी

शाळेला जाते

बैल 

वाजवीत खुळ खुळ

घुंगरू गळ्यातील 

बैल गाडी ओढतो

मामाच्या गावी नेतो

रणरणत्या उन्हात 

मुसळधार पावसात  

चाबकाचे फटके खातो

शेत नांगरून देतो 

बैलामुळे आपल्याला

मिळते जेवायला

नका चिडवू यापुढे

'बैल' कुणाला 

 मधमाशी


                                                                         
मधमाशी

गूं गूं गाणे गाते

फुलाफुलातून

मध वेचते

षट्कोनी विटांचे

घर मधमाशीचे

भरले भांडार

आतमध्ये मधाचे

मधमाशी देते

बाळाला गोड मध

बाळ म्हणून

घेतो औषध

डुक्कर 

डुक्कर वाटतो आपल्याला

प्राणी घाणीतला

घाणीत खरा लोळतो तो

अंग थंड ठेवायला

पसरट नाकाने डुक्कर

वास लक्षात ठेवतो

कुत्र्यासारखा इमानदार

मालकासाठी जीव टाकतो

छोटयांना आवडतो

पिगी बँक बनून येतो

खाऊचे पैसे 

वाचवायला शिकवतो 

पेंग्विन 

थंडी कडाक्याची

बर्फ पडे भुरू भुरू

झोके खात खात 

पेंग्विन चाले तुरु तुरु

डोके काळे काळे 

रंगाने पांढरा 

येते न उडता

पोहतो भरा भरा 

दुरूनच पाहू

आपण पेंग्विनला

बर्फाच्या जगात

बागडू दे त्याला

गिधाड  

टकलू बॉस हा कोण

पिसे नाहीत  डोक्यावर

मजबूत चोच, नखे अणकुचीदार 

गिधाड आहे हे तर

माळरानावर आकाशात

तरंगत फिरते

मेलेले, सडलेले

प्राणी कोरून खाते

नका भिऊ त्याला

मित्र आहे आपला

गिधाड मोठे काम करते

परिसर स्वच्छ ठेवते

 गाय

साधी सुधी गाय

माळरानावर चरते

 गहू, तांदूळ, घरातील

पोळीसुद्धा खाते

वासरावर प्रेम भारी

शिंगाने कुरवाळते

वासरू दिसले नाहीतर

'हम्मा हम्मा' हंबरते

गोड दूध हिचे 

बाळाला शक्ती देते

तूप आहे औषधी

शेणाचे खत बनते 

अस्वल  

                                                                   अस्वल धिप्पाड प्राणी

पाय आहेत चार

तरी उभा राहतो

दोन पायांवर

पाण्यामध्ये पोहतो

चढतो झाडावर

मासे पकडतो

असा आहे हुशार

लोकर खूप अंगावर

गुबगुबीत फार

खेळतो मुलांशी

बनून टेडी बेअर

शहामृग

सर्व पक्ष्यांत मोठे डोळे

पाय मजबूत फार

शहामृगाच्या लाथेने

सिंह होतो गार

लांबुडकी मान 

उंचावून पाहतो

संकटात जमिनीवर

लोळून राहतो

येत नाही उडता

पण धावण्यात चपळ भारी

शहामृगाच्या पाठीवरून

करू या सवारी 

 कोल्हा 

दिसे छोटा कुत्रा

अशी कोल्होबांची मूर्ती

धावण्यात चपळ  

कुई कुई ओरडती  

कोल्होबांची स्वारी 

मिळेल ते खाते 

दुसऱ्याची शिकार 

पोट भरायला चालते 

लबाड म्हणून 

बदनाम आहे

नाही तसे काही

साधा प्राणी आहे

डॉल्फिन 

डॉल्फिनला जरी

मासा म्हणतात

आहे खरा प्राणी

राहतो समुद्रात

तोंड दिसे गोड

जसा काही हसतो

आहे मोठा कलाकार

शिट्टी वाजवतो

भलताच हुशार

 शिकतो जे शिकवू

पाण्यातच खेळू द्या

नका गुलाम बनवू

हंस  

दुधासारखा रंग

नाजूक मान

चोच नारिंगी 

हंस दिसे छान

तलावात, नदीत

डौलाने पोहतो 

मोठे पंख पसरून

आकाशात उडतो

पाण्याजवळ

घरटे बांधतो

आपल्या कुटुंबाला

भारी जपतो

लांडगा 

लांडगा हा खरं तर 

 कुत्रा मोठा सर्वांत

कुत्रा आला माणसांत

लांडगा राहिला जंगलात

नाक, कान, डोळे, दात

सारे काही मजबूत

कळपात राहतो

धावतो भारी वेगात 

 लबाड लांडगा 

उगीच म्हणतात सारे

आहे भारी हुशार

एवढे मात्र खरे

घुबड 

मोठे डोळे

चोच बाकदार

घुबड म्हणजे

उडते मांजर

टोकदार नखांचा

गुबगुबीत अंगाचा

घुबड म्हणजे

राजा रात्रीचा

फडशा पाडतो

उंदीर घुशींचा

घुबड म्हणजे

मित्र सर्वांचा

 गोरिला

उंच धिप्पाड गोरिला

भयंकर दिसण्यास 

परी मनाने प्रेमळ

देत नाही त्रास

चार पाय असुनी 

दोन पायांवर उभा राहतो

आहे फार हुशार

कळपामध्ये राहतो

जंगलतोडीमुळे

बेघर झाला आहे 

पूर्वज आपला

आता धोक्यात आहे

शेळी 

शेळी पहा शेळी 

दिसायला भोळी 

परी चपळ भारी

उंच उडी मारी

लोकर देते

गोड दूध देते

आजारी माणसाला

शक्ती देते

 स्वच्छता आवडते

गवत कोवळे खाते

कुरवाळले

की जवळ येते

खार

छोटीशी नाजूक

चपळ खार

टपोरे डोळे

शेपूट झुबकेदार

शेंगा आणि बिया

जमिनीत पुरते

भूक लागली की

 खणून काढते

नकळत झाडे लावते 

पुरून पुरून बिया

आहे  की नाही हुशार

ही  छोटीशी बया

वटवाघूळ 

ओसाड जागी अंधारात

वटवाघूळ उलटे लटकते

दिवसा झोपी जाते

रात्र झाली की फिरते

पंख याचे म्हणजे

लांबच लांब हात 

नाही पक्षी, आहे प्राणी, 

तरी उडते अंधारात

किडे मकोडे खाते

परिसर साफ ठेवते

मित्र आहे आपला

नका भिऊ त्याला

शार्क मासा

मोठ्या डोळ्यांचा

उंच नाकाचा

 शार्क मासा  म्हणजे

राजा समुद्राचा

लांबच लांब रांगा

दातांच्या तोंडात

लिबलिबीत अंगाचा

हाडे नाहीत अंगात

आवडते त्याला

उंच उडी मारायला

साऱ्याच शार्कचा

धोका नाही आपल्याला

फ्लेमिंगो 

दिसतो गुलाबी बगळा

पण पक्षी हा वेगळा

काटकुळ्या पायांचा

फ्लेमिंगो नावाचा

 गवा

दिसतो रेड्यासारखा

पण लक्षात ठेवा

नाही हा रेडा

नाव याचे 'गवा'

गवतामध्ये चरतो

कळपामध्ये राहतो

उगीच त्रास दिला तर  

धाऊन येईल अंगावर  

 चित्ता  

चित्ता पिवळ्या रंगाचा

आणि काळ्या ठिपक्यांचा

मांजर जसा दिसतो

एका झाडावरून

दुसऱ्या झाडावर

उड्या  मारीत जातो 

धावतो भारी वेगात 

तरबेज आहे पोहण्यात 

कमोडो ड्रॅगन

ही  मोठी मगर  आहे ?

की  मोठा सरडा आहे ?

की वाचला डायनॉसॉर कुणी ?

हा तर 'कमोडो ड्रॅगन' प्राणी 

फोर्क सारखी जीभ दुधारी

लाळ  याची आहे विषारी 

काळा काळा रंग

खवल्या-खवल्यांचे अंग

दात, नखे, नजर तीक्ष्ण फार

मग शिकार याची कशी सुटणार

 तरस

कुत्र्यासारखा दिसतो

रात्री शिकार करतो

बिळात काढतो दिवस

असा हा प्राणी 'तरस'

दात, नखे मजबूत भारी

दिसेल ते फस्त करी

मजेशीर आवाज काढतो

जसा काही हसतो

हिप्पोपोटॅमस 

अगडबंब  शरीर

भलामोठा जबडा

असा हिप्पोपोटॅमस

किंवा पाणघोडा 

राहतो पाण्यात 

पण काठाने चालतो

संध्याकाळी खाण्या गवत

बाहेर पडतो

रागावला की

येतो अंगावर धावून

म्हणूनच त्याला

सिह असतो भिऊन

विंचू 

विंचू हा कीटक

आठ पायांचा

समोर चिमटा

दोन हातांचा

शेपूट म्हणजे

नांगी विषारी

फिरवून उलटी

डंख मारी

नका काढू याची

मुळीच खोडी

डंख मारला तर होईल

पळता भुई थोडी

जेलीफिश 

हात नाही,पाय नाही

नाही हाडे अंगात

तरीही  राहतो

जेलीफिश आरामात

टोपी रंगीत काचेची 

जशी  काही दिसते

पाण्यामध्ये फिरतो 

जशी छत्री तरंगते 

मूंगूस

तोंड चिमुकले

टपोरे डोळे

शेपूट झुबकेदार खार 

मूंगूस दिसतो डौलदार

आयते बीळ शोधून

बिळात शिरतो

खणत नाही बीळ

पण बिळात राहतो

आहे भारी चपळ

तुरू तुरू धावतो

साप दिसला की

तुटून पडतो 

काटेरी अंगरखा

घालून अंगावर

साळींदर

लुटू लुटू चाले

साळींदर

दात मोठे पुढे

चावायला  

झाडावर चढता

येते त्याला

रागावला की काटे

ताठ होतात 

नाही कुणी त्याच्या

वाटेला जात 

आमच्या झाडाचे आंबे

आमच्या झाडाला आंबे आले

पिकून झाले लाल पिवळे

आजोबा उठले फटाफटा 

आंबे कापले कटाकटा



 Humming Bird



Humming bird, humming bird

Your beak is long

Humming bird, humming bird

Sing a sweet song

Humming bird, humming bird

Flutter your wings

Teach your merriness

To the living beings


Young Fireman


I am a young fireman

In red attire

I carry water gun

Go away you fire

 

© [2024] [Hemant Junnarkar]. All rights reserved. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this blog’s author and/or owner is strictly prohibited.

 

 

 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण

 आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर  (१७/१०/१९२२-१/२/२०१४) माझे वडील कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर एक अत्यंत...