सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

स्वकृत काव्यरचना

 

नसतानाही वारा

थरथरतात पाने

आठवून रात्रीची

मधुर स्वप्ने

पांढरे शुभ्र पाखरू

भिरभिरते ओढ्यावरून

झोंबणाऱ्या गारव्याने

पाणी जाते शहारून

निरोप घेताना रात्रीचा

हळवे होते भुरे आकाश

आतुरतेने वाट पाहते

कधी दिसेल सूर्यप्रकाश


आईने डोळे मिटले तेव्हा

आईने डोळे मिटले

तेव्हा खरे नाही वाटले

वाटले, ते खळखळून हसणे

ते गाणी गुणगुणणे 

कुठे बरे विरले


होती जेव्हा आई

तेव्हा वाटायचे किती बावळट ही बाई

नाही कळत साध्या गोष्टी हिला

तिच्या निरागसपणाचा राग राग केला


आता पावलापावलाला

येते तिची आठवण

आता कळते किती उपयोगी

होती तिची शिकवण


पण वाटते आईवाचूनही 

राहिले पाहिजे चालत

आईवाचून खचलो

तर व्यर्थ गेली आईची मेहनत


आईलाही करायची आहे

अनंताची वाटचाल

तिच्या आठवणीत कुढलो

तर तिचेही अडखळेल पाऊल

डेक्कन एक्स्प्रेसची मुशाफिरी

लोणावळ्यास अजुनी चिक्कीचा गोडवा आहे

करजतला अजुनी बटाटेवड्याचा गंध दरवळतो आहे

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वाहनांनी तुडुंब भरला आहे

मला मात्र डेक्कन एक्स्प्रेसची मुशाफिरी याद आहे

पाऊस

पाऊस मनींचे गुज 

मला माझ्या जवळ नेणारा

माझीचं माझ्याशी ओळख करून देणारा 

अलवार आठवणी डोहातून वर आणणारा

दुःखाचे कढ उचंबळवून डोळ्यांत पूर आणणारा

सगळे सुहृद् गेले तेव्हा सोबत करणारा

तोच हुळहुळवणारा, 

मनाला उभारी देणारा

धरेला हरिता करणारा,

देण्यातला आनंद अधोरेखित करणारा

मी आणि तो एकाच समेवर....


..........शामा

अर्जुनसाठी पाळणा


बाळा जो जो रे |

अर्जुना | भार्गवकुलनंदना || ध्रु.||

आई अन् बाबा | उजळती जीवना ||

पंचप्राणांच्या | करुनी निरांजना || १ ||

आजोबा आजी | वाहती काळजी ||

करुनी वर्षाव | माया-अमृताचा || २ ||

लाभू दे तुजला | उदंड आयुष्य ||

सुख अन् समृद्धी | सर्वांची कामना || ३ ||

भाऊबीज

आज दीस भाऊबीज

येईल भाऊ घरी

न्हाऊ माखू घालीन

गोडधोडाची करते तयारी

होतो जेव्हा लहान

भांडभांडलो वेड्यावाणी

आठवणी येती दाटून

डोळां खळे ना पाणी

आज कळे अर्थ

भाऊबहीण नात्याचा

सात जन्मी राहो हाच

बंध रेशमाचा

ज्योत आणि पतंग

ज्योत पतंगाला म्हणाली,

'दूर हो, मी तुझ्यासाठी साक्षात् मृत्यू आहे'

पतंग ज्योतीला म्हणाला,

'तू माझ्यासाठी संजीवनी आहेस'


ज्योत पतंगाला म्हणाली,

'वेड्या, तुझ्यासारखे कितीतरी पतंग माझ्याभोवती फिरत आहेत'

पतंग ज्योतीला म्हणाला,

'माझे तुझ्याभोवती फिरणे मला पुरेसे आहे'


ज्योत पतंगाला म्हणाली,

'अरे, मी तर कायमची दिव्याशी संलग्न आहे'

पतंग ज्योतीला म्हणाला,

'माझी दिठी तुझ्याभोवती भ्रमत राहणार आहे'


ज्योत पतंगाला म्हणाली,

'मी कणाकणाने नष्ट होते आहे'

पतंग ज्योतीला म्हणाला,

'अमरत्वाच्या प्राप्तीसाठी माझा प्राण मी पणाला लावला आहे'


-४ फेब्रुवारी २००३

मिरा रोड

शमा और परवाना  

शमा ने जलती नज़र से कहा,

'दूर हो जाओ, तुम्हारे लिये मैं सीधी मौत हूँ'

परवाना लहराकर बोला,

'मेरे लिये तुम जीवन हो'


शमा ने घूरते हुए कहा,

'देखते नहीं, मेरे आसपास कई कीड़े घूम रहे है़'

परवाना उछलकर बोला,

'परवाना तो परवाना ही होता हैं'


शमा ने काँपते हुए कहा,

'ज़िद छोड़ो, मैं शमादान के साथ जुड़ी हूँ'

परवाना मँड़राते हुए बोला,

'मैं तुम्हारी रोशनी के घेरे में बँधा हूँ'


शमा ने क्षीण होते हुए कहा,

'होश में आओ, मैं कण कण से मिट रही हूँ'

परवाना स्थिर होते हुए बोला,

'मैं अमरता की क्षण की प्रतीक्षा में हूँ'


-मिरा रोड, ४ एप्रिल २००३


Sister

Remember the days when we played together,

Shared the tears and the laughter

Gone is now all  that splendour

My sister

I offended you often,

But you remained calm, still inspiration,

A rare mentor,

My sister

With you, I walked thorny path

And faced bravely the Destiny’s wrath

Still dare to challenge the bleak disaster

When you are still with me sister


गातो पाऊस मनात

 

नाचती धुंद जलधारा

पदि पैंजण रुमझुमतात

करि मधुर गुंजना वारा

गातो पाऊस मनात

 

ध्वनि करती ना धिन धिन ना

मेघांचे तबले  अविरत

घेताती तरुवर ताना

गातो पाऊस मनात

 

ता थै तक थै थै करुनी

नाचे बिजली गगनात

खग डोळे घेती मिटुनी    

गातो पाऊस मनात

 

लेऊन वस्त्र फेसाचे

नर्तन लाटा करितात

संगीत घुमे दर्याचे

गातो पाऊस मनात

 

नादब्रह्मी सदने  दंग

उजळते तेज नेत्रांत

जिवाशिवात भरला रंग

गातो पाऊस मनात

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण

 आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर  (१७/१०/१९२२-१/२/२०१४) माझे वडील कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर एक अत्यंत...