सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

स्वकृत भक्तिरचना

 


देव-देवतांचे स्मरण 

गणेशस्तुती 


मस्तकी मुगुट | प्रसन्न वदन || 

मंगल ते ध्यान | मोरयाचे || १ ||

परशू नि पाश | धरिले करांत || 

भक्तांचे रक्षण | करावया || २ ||

तिसऱ्या करात | मोदक शोभतो || 

आशिर्वाद देतो | चौथा हात || ३ ||

सदैव स्मरता | विघ्नविनाशन || 

असा गजानन | मोक्ष देई || ४ ||

कार्तिकेयस्तुति 


हा मुखांचा स्वामी जगाचा 

                                                                            गणेशभ्राता सुत जो शिवाचा 

जगी पातला तारका संहराया 

नमस्कार माझा तया कार्तिकेया


सूर्यस्तुती

तुझा स्पर्श होतो जेव्हा नभाला

अंधार सारा जातो लयाला

देतोस ऊर्जा विश्वास साऱ्या

नमस्कार माझा तुला सूर्यराया

श्रीरामस्तुती
 

धन्य तो रामराया | केली मुक्त अहिल्या ||
तारिले त्रैलोक्याला | मारुनी रावणाला ||

हनुमानस्तुती
 


धन्य मारुतीराया | सीतामाईस शोधिले ||
द्रोणागिरी आणूनीया | लक्ष्मणास वाचविले ||


श्रीअंगदस्तोत्र


श्रीगणेशाय नमः


गौरीपुत्र गणेशाला करुनी नम्र वंदन

अंगदस्तोत्र हे गातो भक्तिभावे नमूनीया || १ ||

पुत्र श्रेष्ठ वालीचा असे अंगद महाबली

रामाने वधिता वाली होई युवराज अंगद || २ ||

शोधण्या सीतामाईस वानरप्रमुख अंगद

सीतेस शोधुनीया किष्किंधेस परतला || ३ ||

आज्ञेवरून रामाच्या शिष्टाई करि अंगद

गर्व दूर रावणाचा केला विक्रम दावुनी || ४ ||

रामरावणयुद्धात नरांतक दैत्य मारुनी

अंगदाने श्रीरामा केले मोठे सहाय्य ते || ५ ||

स्तोत्र अंगदाचे हे नित्य पठण जो करी 

रामभक्त अंगद तो संकटांना निवारितो || ६ ||

इति श्रीअंगदस्तोत्रम् सम्पूर्णम् 

श्रीअंगदार्पणमस्तु

 

श्रीकृष्ण  



धन्य नाग कालिया
कृष्ण ज्यास मर्दुनिया  
ठेवुनी पद शिरी  
त्याचा उद्धार करी ||
धन्य गिरी गोवर्धन 
कृष्ण घेई ज्यास करी 
रक्षुनी गोकुळास 
गर्व देवेंद्राचा हरी ||
धन्य ऋषी सांदीपनी
कृष्ण गुरू मानी ज्यांना
मुलास जीवन देऊनी
दिली गुरुदक्षिणा ||

संतस्तुती 

श्रीसाईस्तुती 


शिरडीग्रामी अवतरला तू होउनि यवन फकीर | 
दाखविले तू रूप भिन्न जरि एक असे ईश्वर || 
बंधुभाव शिकवुनी जनांना दाखविला सत्पंथ | 
पार कराया भवसागरास नमू साईनाथ ||



स्वामी समर्थ



धन्य स्वामी समर्थ I शिकविला परमार्थ II
भक्तांच्या प्रेमापोटी I आले अक्कलकोटी II

स्वामी नित्यानंद

उष्ण जलाचा हौद औषधी व्याधी दूर करी

इंद्रपुरी ते नगर मनोहर असे गणेशपुरी II

गुरुस्पर्शाने नगर जाहले मुक्तीचे द्वार

नित्यानंद गुरूंना माझा असो नमस्कार II १ II

 

तिकिटावाचुनि गाडीमधुनी गुरूंस उतरविता

स्टेशनातुनी गाडी न जाइ गुरूंस नच घेता II 

गुरूंवाचुनी जीवनरथ नच पुढे सरकणार 

नित्यानंद गुरूंना माझा असो नमस्कार II १ II

 

प्रेम मुलांचे फार गुरूंना देति भोजनास  

सुलभ करुनि अध्यात्म सांगती शिकविति बंधुत्व

नित्यानंद गुरूंना माझा असो नमस्कार II ३ II



समर्थ रामदास 

 

तुम्ही स्थापिली मंदिरे मारुतीची
दिली प्रेरणा शक्ती संपादण्याची
महाराष्ट्र तुम्हीच  नेला सुपंथा
नमस्कार माझा तुम्हा श्रीसमर्था || १ ||

स्वराज्यास आधारस्तंभासमान
शिवाजी-नृपाचे तुम्ही स्फूर्तिस्थान
'शिवा आठवी' सांगुनी शंभुराया
तुम्ही पूर्ण केले अवतारकार्या || २ ||

श्रीरामानुजाचार्य

धन्य रामानुजाचार्य | केले वेदांवरी भाष्य ||
दक्षिणेचे थोर वैष्णव | शिकविला बंधुभाव ||

अभंग 

विठ्ठल स्मरण 


आम्हा घरी धन | नाम विठ्ठलाचे || 

नाही संपण्याचे | भय  त्याला || १ || 

नको परिश्रम | धन मिळवाया || 

जागीच बैसल्या | गाठी येई || २ ||   

कपाट तिजोरी | नाही लागे त्यास || 

लुटे भांडारास | चोर श्रेष्ठ || ३ || 

भक्त म्हणे नको | दुसरी संपत्ती || 

स्थिर राहो मती | विठूनामी || ४ || 

वैष्णवांची होळी 


काम क्रोध लोभ | मोह मद मत्सर || 
सहा तरुवर | निवडिले || १ || 
असंगशस्त्राने | तोडून तरुंस || 
मोठी त्याची रास | रचियेली || २ ||  
टाकून त्यावर | विषयांची पाने || 
भक्तीच्या ज्योतीने | पेटवली || ३ || 
वैष्णवांची होळी | जळे रात्रंदिन || 
पाहे नारायण | कौतुकाने || ४ ||


रंगांचा खेळ 

श्रीहरिनामाचे | श्रवण , कीर्तन || 
अर्चन , स्मरण | श्रीहरीचे || १ || 
श्रीहरि-वंदन | श्रीहरीशी सख्य || 
श्रीहरीचे दास्य | निरंतर || २ || 
श्रीहरिचरण | नित्य सेवितात || 
गुज सांगतात | श्रीहरीला || ३ || 
नवविधाभक्ती | घेऊनीया रंग || 
भक्त झाले  दंग | खेळामध्ये || ४ ||




काव्यरचना 

शेगावीचे योगी  



पत्रावळि उष्ट्या शोधत आले गुरुवर

वाटेवर खिळली दृष्टी शुष्क विहीर 

प्रभू अवतरल्यावर उदंड पाणी झाले 

घरि माझ्या शेगावीचे योगी आले II १ II 


गोजिरी दिगंबर सडसडीत ती मूर्ती 

तुळतुळीत शिर ते चिलीम आणिक हाती 

'गणि गणात बोते ' गायन अविरत चाले 

घरि माझ्या शेगावीचे योगी आले II  २ II 


पाहुनी गुरूंना गाय दीन ती  झाली 

झणि चिंचवण्याला अमृतमधुरा आली

पक्वान्न नको म्हणति ' द्या शिळे कानवले '

घरि माझ्या शेगावीचे योगी आले II ३ II 


मृत श्वानाला संजीवनि पुन्हा मिळाली 

मन-अश्वाला अन् अपूर्व शांती आली 

सोडुनी बिछाना प्रभु त्याच्या पदि निजले 

घरि माझ्या शेगावीचे योगी आले II ४ II 

हरिची माया



( पार्श्वभूमी:-भगवान श्रीकृष्ण अक्रूराबरोबर मथुरेला गेले आहेत)

का राधा येई यमुनातीरी फिरूनी|

धुन मुरलीची येणार न आता कानी ||

तो कदंब वठला हरिविरहात जळूनी |

व्याकुळल्या गाई हंबरती फिरती रानी ||१||

 

का कालिया असा दावा साधुन गेला ?

का गोवर्धनगिरी कोसळूनिया पडला?

की पुतनेस पुन्हा फुटे विषारी पान्हा ?

फसवुनि गोपींना लपला का हा कान्हा? || २||

 

गोपांची क्रीडा का नच हरिला रुचली?

की नवनीताची गोडी आता सरली ?

करिती नित गोपी यशोदेस तक्रारी |

म्हणुनि का न उरली करुणा हरिअंतरी? || ३||

 

यमुनातटि हरिची राधेला पावले |

दिसता राधेचे देहभान हरपले ||

कळली राधेला हरिविरहाची किमया |

नच उरली राधा सारी हरिची माया || ४||


साईबाबा 


जो जुनी फाटकी कफनी अंगी ल्याला 

तो चराचराला व्यापुन आहे उरला 

दगडाची बैठक ज्यास आवडे फार 

तो सकल जिवांचा एकमात्र आधार 


भिक्षेसाठी जो हाती घेई थाळी 

अक्षय खजिन्याची चावी त्याच्याजवळी 

आवडता ज्याचा तरुवर कडुलिंबाचा 

तो निवारा असे सर्व जीवमात्राचा 


जो धुनीचे सतत करीतसे प्रज्वलन 

तो दुर्बुद्धीचे अखंड करतो दहन 

जो शिकवीत असे श्रद्धा आणि सबुरी 

तो चुकवुनि देई जन्म-मृत्यूची फेरी  



सुजाताची खीर


पुत्रप्राप्ती झाल्याने  

नवस पूर्ण करण्यास

सुजाता आली रानात 

वृक्षाला खीर अर्पिण्यास

तो दिसली समोर वृक्षाखाली 

बुद्धांची दिव्य मूर्ती

तेजाचा पुतळा जणू 

साक्षात् दया-क्षमा-शांती

वाटला सुजाताला  

हा वृक्षदेव दिसे नयना

श्रद्धेने सुजाताने 

खीर अर्पिली बुद्धांना

पाहून श्रद्धा सुजाताची 

बुद्धांनी  खीर स्वीकारली

सुजाताची भक्ती फळली 

अन् बुद्धांस ज्ञानप्राप्ती झाली


मज मुहंमदांनी भगिनि आज मानिले



(प्रस्तुत कविता इस्लामधर्मसंस्थापक प्रेषित मुहंमद यांच्या जीवनातील एका हृद्य प्रसंगावर आधारित आहे. प्रेषितांचे आईवडील लहानपणी वारल्यामुळे त्यांच्या आजोबांनी प्रेषितांना हलीमा नावाच्या एका दाईकडे स्तनपानासाठी सोपविले होते. पुढे प्रेषित मोठे झाल्यानंतर ताएफच्या मोहिमेत बंदी बनवलेल्या लोकांना आणण्यात आले. या बंद्यांमध्ये प्रेषितांची एक दूधबहीण होती. ही दूधबहीण खालील कवितेमध्ये प्रेषितांशी बोलत आहे)


स्मरतो हज़रत का स्पर्श मदिय हातांचा

घालीत गळा विळखा लडिवाळ करांचा

वावरता तुम्ही मृगजळात जळ आले

तापल्या उन्हाचे शीत चांदणे झाले


मिसळला श्वास तव श्वासामध्ये माझ्या

बहु श्रमून गेले पुरवित तुमच्या खोड्या

तव बोलांनी जळत्या वायुस सुख झाले

तव पदस्पर्शाने वाळवंट हिरवळले


स्मरते का गोडी त्या सुमधुर दुग्धाची

करिताना प्राशन नसे शुद्ध जगताची

दोघांस आपणा जिने जीवना दिधले

उपकार तिचे नच अजून कधिही फिटले


एकदा तुम्हा पाठीवर माझ्या घेता

स्मरते का पाठिस कसे चावला होता

ती खूण अजूनी आहे पाठीवरती

दोन दात पाहा कसे अजूनी दिसती


ती खूण पाहता पैगंबर गहिवरले

दाटून कंठ डोळ्यांमधि पाणी आले

जाहले धन्य मी जीवन सार्थक झाले

मज मुहंमदांनी भगिनि आज मानिले


(यानंतर प्रेषितांनी तिला बसण्यास चादर अंथरली व तिला भेटवस्तू दिल्या. तिने आपल्या कुटुंबासमवेत राहावे असेही सुचविले. परंतु प्रेषितांनी दिलेल्या भेटवस्तू घेऊन आपल्या कुटुंबात जाणे तिने पसंत केले)


-५ एप्रिल २००३, मिरा रोड 


मेरीला बाळ झाला

('साधी माणसं' या मराठी चित्रपटातील 'राजाच्या रंगमहाली' या गाण्याच्या चालीवर)


रातीच्या काळोखात

रुप्याचा तारा आला

सांगं सोन्याचा दूत

मेरीला बाळ झाला

      गडणी सजणी गडणी सजणी गं || १ ||


बोललं धनगर

जाऊ बेथलहेमला

पाहू या डोळंभर

मेरीचा बाळ भला

     गडणी सजणी गडणी सजणी गं || २ ||


चालून सारी रात

मेळा गोठ्यात आला

मिणमिणत्या उजेडात

मेरीचा बाळ दिसला

     गडणी सजणी गडणी सजणी गं || ३ ||


चा-यावर सानुला

बघती गाईगुरं

कवतिक बापाला

माझं बाळ गोजिरं

     गडणी सजणी गडणी सजणी गं || ४ ||


आला पूत देवाचा

आण खरी कराया

आधार समद्यांचा

मेरीचा बाळराया

     गडणी सजणी गडणी सजणी गं || ५ ||

 






 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण

 आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर  (१७/१०/१९२२-१/२/२०१४) माझे वडील कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर एक अत्यंत...