नानाकाका
कै. रमेश कृष्णराव चावक
(१/१/१९२८-१६/६/२०२४)
नानाकाका माझी मावशी कुसुममावशीचे यजमान. मी मामाकडे कॉलेज शिक्षणासाठी घाटकोपरला (१९७५ ते १९७९) राहत असताना माझा नानाकाकांशी जास्त संबंध आला. नानाकाका रिलेशन्स मेंटेन करण्यात फार पर्टिक्युलर होते. कुणी आजारी असले की आवर्जून ते भेटण्यास जात. मी त्यांच्या घरी गेलो की कुसुममावशीला काहीतरी विशेष बनवायला सांगत. आग्रह करून खायला घालत.
मी लहान असताना एकदा पुस्तकाला कव्हर घालत होतो. ते पाहून त्यांनी मला एक सोपी पद्धत सांगितली. आधी कव्हर पुस्तकाला रॅप करून घ्यायचं असं सांगितलं आणि ते कसं करायचं तेही दाखवलं. ही पद्धत आजही मी फॉलो करतो.
त्यांचा चेहरा कुठल्याही प्रसंगी स्ट्रेट असे. त्यामुळे त्यांच्या भावनांचा थांग लागत नसे. पण कठीण प्रसंगाला ते अशाच कणखर चेहऱ्याने तोंड देत. त्यामुळे अडीअडचणीच्या वेळी सर्वांना त्यांचा आधार वाटत असे.
नानाकाका कुर्ल्याच्या मिलमध्ये कामाला होते. आपला संसार चालवण्यासाठी ते किती खटपटी करीत ते मला आता कळते. गिरणी कामगारांच्या संपामध्ये मिल्स बंद झाल्या. अशा अनेक अडचणींना त्यांनी तोंड दिले. त्यांना पाहिले की ' बाप हा बापच असतो' हे मला पटते. ते अंबर टिप्स चहा विकत असत हे मला आठवते. मी सुट्टीत मुंबईहून घरी खडकीला चाललो की एक चहाचा पुडा आमच्यासाठी कॉम्प्लिमेंटरी असे.
वृद्धापकाळात ते मुलाकडे संजूकडे नेरुळ येथे राहत. आपली औषधे वेळच्या वेळी घेणे, संध्याकाळी फिरायला जाणे, असा दिनक्रम ते नियमित पाळत. मुलगी स्मिता आणि मुलगा संतोष भेटायला येऊन त्यांना काय हवे नको ते पाहत.
अजूनसुद्धा घरी भेटायला आलो की त्यांना खूप आनंद होई. काहीतरी बनवायला सांगत. कसा आला, कसा जाणार याविषयी चौकशी करीत. त्यांना स्वच्छता, टापटीप यांची विशेष आवड होती.
त्यांच्या शेवटच्या दिवसात कुसुममावशीने, मुलांनी, सुनांनी, नातवंडांनी, जावयाने त्यांची सर्व प्रकारची सेवा केली. नानाकाकांकडे पाहून त्यांचे वर्णन मला एकाच वाक्यात करता येईल, ' ते आयुष्य अखेरपर्यंत आपल्या पद्धतीने जगले.' ईश्वर नानाकाकांच्या आत्म्यास शांती देवो. मी नानाकाकांना सदैव मिस करीन.
