स्वकृत आरत्या

 

 स्वकृत आरत्या 


सोमवारच्या आरत्या 

बारा ज्योतिर्लिंगांची आरती

(चाल:आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा)

 

आरती गातो भक्तीने तुज कर्पूरगौरा

द्वादशज्योतिर्लिंगनिवासी रुद्रा विश्वंभरा || ध्रु.||

 

श्रेष्ठत्वाचा गर्व हराया ब्रह्मा-विष्णूचा

शंभू प्रगटे बनुनी अनंत स्तंभ प्रकाशाचा

प्रकाश पडला त्या स्तंभाचा ज्या ज्या स्थानांत

ज्योतिर्लिंग म्हणुनि स्थाने झाली प्रख्यात || १ ||


प्रभासक्षेत्री जिथे त्रिवेणी संगम मनोहर

सोम सत्ययुगि
, त्रेतायुगात रावण लंकेश्वर

द्वापारयुगी श्रीकृष्ण करी मंदिर निर्माण

'सोमनाथ' क्षेत्रात निरंतर वसे उमारमण || २ ||

कार्तिकेयरोषास हराया महेश अन् पार्वती

मल्लिकासुमे अर्पण करुनी गिरिस्थानी राहती

म्हणून झाले ज्योतिर्लिंग अन् शक्तीचे स्थान

आंध्र प्रदेशी श्रीशैलावर वसे 'मल्लिकार्जुन' || ३ ||


अवंतिनगरी वास करीती शिवभक्त ब्राह्मण

छळण्या त्यांना मत्त जाहला राक्षस दूषण

वधून त्याला वास करीती जेथे मदनहर

उज्जैनमधिल पावन स्थळ  'महाकालेश्वर' || ४ ||



नर्मदेत मांधाता द्वीप ओंकाराकार

भव्य मंदिरी वास करीती 'ओंकारेश्वर'

विंध्यपर्वताच्या भक्तीने प्रसन्न होऊन

भक्तरक्षणा राहती तिथे उदार पंचानन || ५ ||


पांडव निघती शिवा शोधण्या पापक्षालना

हिमालयामधि मिळती महेश वृषरूपे त्यांना

भक्तरक्षणा तेच जाहले अक्षय शिवतीर्थ

पवित्र मंदिर हिमालयात  'केदारनाथ' || ६ ||



ब्रह्मदेव देता वर त्रिपुरासुर झाला मत्त

जिंकुनिया देवांना केले सकल जनां त्रस्त

त्रिनेत्रधारी संहारितसे जेथे त्रिपुरासुर

भीमेसन्निध सह्यगिरीवर स्थळ 'भीमाशंकर'  || ७ ||


लिंग बनुनि शिव रावणासवे निघती लंकेस

वदती लिंग तयाला भूमीवर न ठेवण्यास

युक्तीने परि लिंग भूवरी ठेवी गजानन

'बैद्यनाथ' ज्योतिर्लिंग  दिव्य तेच स्थान || ८ ||

दारुक दानव मातला करी सर्वांना त्रस्त

शिवमंत्रास जपाया सांगे सुप्रिया शिवभक्त

भक्तरक्षणा जिथे राहिले नागेश गंगाधर

क्षेत्र शिवाचे तेच जाहले मंगल 'नागेश्वर' || ९ ||


शिव नि पार्वती तप करण्याला  क्षेत्र निर्मितात

मणिकर्णिका आणिक पीठे जिथे असंख्यात

मोक्ष लाभतो जीवा करिता जिथे देहत्याग

'काशी विश्वेश्वर' गंगातीरी ते ज्योतिर्लिंग || १० ||



दक्षिणगंगा गोदावरिचा होइ ज्यात उगम

त्या ब्रह्मगिरीतळी विलसते मंदिर मनोरम

ब्रह्मा, विष्णू, शंकररूपे मंदिरी उमापती

म्हणुनि 'त्र्यंबकेश्वर' नावाने क्षेत्राची ख्याती || ११ ||


दक्षिणेस श्रीराम पातले मुक्तिस सीतेच्या

युद्धामध्ये दशाननावर विजय प्राप्त करण्या

स्थापुनि पार्थिव लिंग करीती पूजन शिवाचे

प्रसिद्ध झाले ते 'रामेश्वर' गृह चूडामणिचे || १२ ||


घुष्मेच्या भक्तीला मृत्युंजय शिव पावून

मृत पुत्राला तिचिया जेथे देऊनी जीवन

भक्तमनोरथ पुरविण्या राहति जेथे निरंतर

वेरुळजवळी दयानिधीचे 'घृष्णेश्वर' मंदिर || १३ ||

 

करीतसे जो यात्रा बारा ज्योतिर्लिंगांची

हृदयी दृढ होऊनी भक्ती कारुण्यसिंधुची

भवभयातुनी, जन्ममृत्युतुनि  होउनिया मुक्ती

सुखदायी अक्षय शिवधामाची  होइ त्यास प्राप्ती || १४ ||

 

मंगळवारच्या आरत्या 

अष्टविनायकांची आरती

(चाल: आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा)

 आरति गातो सद्भावे तुजला गजानना

अष्टविनायकरूपे येउनि तारिसि भक्तांना || ध्रु.||

मयुरारूढ गणेशे वधिला सिंधुदैत्य क्रूर
ब्रह्म्याने निर्मिले म्हणूनी गणेशमंदिर

गोसावी मोरयांस निशिदिन ध्यास असे ज्याचा

'मोरेश्वर' तो प्रथम विनायक असे मोरगावचा || १ ||

नेइ गणासुर कपिलऋषींचे 'चिंतामणि' रत्न
मिळवी गणेश पुन्हा रत्न ते गणासुरा मारुन

द्वितिय विनायक 'चिंतामणि'चे ते स्थळ थेऊर

माधवांस थोरल्या पेशव्यां भक्ति ज्याचि फार || २ ||

मधु-कैटभ या दैत्यांनी त्रासिला चतुरानन
श्रीविष्णू मारिती दैत्यां गणेशमंत्र जपुन

'सिद्धिविनायक" सिद्धीदाता तो सिद्धटेकचा

 तृतिय विनायक प्रभावशाली उजव्या सोंडेचा  || ३ ||

मातला त्रिपुरासुर पराजित केले देवांस

पाठ करुनिया संकटनाशन गणेशस्तोत्रास

जिथे मारितो त्रिपुरासुरा गिरिजेचा नाथ

रांजणगावी 'महागणपती' विनायक चतुर्थ || ४ ||

इंद्रपदास्तव यज्ञ करितसे अभिनंदन राया

यज्ञ मोडण्या इंद्र निर्मितो विघ्नासुर दैत्या

गणेशास प्रार्थिता तयाने दैत्यास हरविले

ओझरचा 'विघ्नेश्वर' तेची तीर्थक्षेत्र झाले || ५ ||

लेण्याद्रीवरि अखंड पाषाणामध्ये मंदिर

सभामंडपा स्तंभाचाही नाही आधार

तप करिते पार्वती लाभण्या सुत गणेश म्हणुनी

विनायक सहावा 'गिरिजात्मज' शोभे त्या स्थानी || ६ ||

गणेश प्रसन्न गृत्समदाच्या होउनि भक्तीस

भक्तमनोरथ पुरविण्या जिथे नित्य करी वास

गणेशमूर्ती स्वयंभू जिथे मिळे जलाशयी

महड गावचा 'वरदविनायक' तेथे सुखदायी || ७ ||

सूर्य उगवता किरणे ज्याचे घेती मुखदर्शन

हीरकमंडित नेत्र जयाचे दिसती शोभून

नाम भक्त बल्लाळाचे धारण करी निरंतर

आठवा विनायक पालीचा तो बल्लाळेश्वर || ८ ||


अष्टविनायकयात्रा नियमित जीवनात करिता

अष्टविनायकरूपी गणेश चित्तामधि स्मरता

गणेशकृपा होई निरंतर होई यशप्राप्ती

जीवनयात्रा सफल होउनी मोक्ष मिळे अंती|| ९ ||

 

 गुरुवारच्या आरत्या 

श्रीपादवल्लभांची आरती

 


 जय देव जय देव श्रीपादवल्लभा

उजळतसे विश्वाला तव तेजप्रभा || ध्रु.||

 

पिठापूर ग्रामाचे भाग्य उदेले 

अप्पलराज-सुमतीला पुत्ररत्न झाले

ब्रह्मा-विष्णु-शिवांचे रूप मनोहर

श्रीदत्तांचा झाला आदिम अवतार || ||

 

दूर करुनि निज बंधूंचे व्यंग

मातापित्यांचे फेडियले पांग

वृद्ध ब्राह्मण पोटदुखीने त्रस्त

तव कृपेने झाला पीडेतुनि मुक्त ||  ||

 

वास्तव्याने कुरवपुर केले पावन

दिधले भक्तांलागी दत्तदर्शन

'श्रीपादनामाचा करिता नित्य जप

काळाचे भय नुरते नको दुजे तप ||   ||

 

श्रीनवनाथांची आरती



(चाल: आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा)


आरती नवनाथां गातो जोडुनि उभय करां

नवनारायण भक्तोद्धारा घेती अवतारा ।। धृ।।


कवि नारायण 'मच्छिंद्रनाथ' पहिला अवतार

जन्मति उदरातुनि माशाच्या, करती तप घोर

प्रसन्न होउनि दत्तात्रेये दिधले वरदान,

'नाथसंप्रदायाला वत्सा करशिल स्थापन' || १ ||


सरस्वती या ब्राह्मणस्त्रीला पुत्रप्राप्ति होण्या

दिव्य विभूती मच्छिंद्रनाथ देती मंत्रुनिया

सरस्वतीने  शेणात परी टाकता विभूती

हरि नारायण "गोरक्षनाथ' तीतुन अवतरती || २ ||


गोरक्षनाथ करीत असता जप संजीवनिचा

मुले सांगती बनवायाला पुतळा मातीचा

संजीवनि मंत्राने पुतळा जीवित होऊन

'गहिनी' नामे अवतरती करभजन नारायण || ३ ||


सोमयाग यज्ञास बृहद्रव राजाने केले

अंतरिक्ष नारायण अग्नीमध्ये प्रवेशले

यज्ञाच्या राखेमधि बालक दिव्य दिसुनि आले

भूवरि 'जालंदर' हे चौथे नाथ प्रगट झाले || ४ ||


अंश ब्रह्मदेवाचा राही हत्तीच्या कानी

प्रबुद्ध नारायण राहतसे प्रवेश त्यात करुनी

कानिफरूपे षोडश वर्षी होई अवतार

जालंदरांस आणिक लाभे शिष्य एक थोर || ५ ||


सूर्यपुत्र 'भर्तरी' म्हणूनी भूवरि अवतरले

नाथ सहावे म्हणून धृमीन नारायण आले

भार्याविरहामधे भर्तरी पडता गुंतून

गोरक्षनाथ मुक्त करी त्या मोहबंधनातुन || ६ ||


रेवातीरी रेतीमध्ये ब्रह्मदेव-अंश

ईश चमसनारायण करुनी तीमधे प्रवेश

नाथ सातवे रेवणसिद्ध घेती अवतार

दत्तकृपेने जाहले जगी सिद्ध एक थोर || ७ ||


सर्पिणीच्या उदरी राही ब्रह्मदेव-अंश

ऐरहोत्रनारायण करुनी त्यामधे प्रवेश

नाथ आठवे वटसिद्ध नागनाथ  जगी आले

दर्शन देता श्रीदत्तांनी ब्रह्मपरायण झाले || ८ |||


तृणामध्ये शिल्लक राही ब्रह्मदेव-अंश

पिप्पलायन नारायण त्यात करूनी प्रवेश

नववे नाथ चरपटीनाथ जगात अवतरले

होताच गर्व देवेंद्राला शासन त्या केले || ९ ||


मंत्र शाबरी नवनाथांनी केले संकलित

देव-दैत्य अन् भूत-पिशाच्चे पदि त्यांच्या विनत

जागृत स्थाने नवनाथांची  भूमंडळि असती

शरण जाऊनी नवनाथांना साधुनि घ्या मुक्ती || १० ||


 स्वामिनारायणांची आरती 


या  हो गुरुराज स्वामिनारायण  | 

वाट मी पाहतो डोळ्यांत आणुनी प्राण  || ध्रु.||


आलिया गेलिया हाती धाडी निरोप |  

छपैया गावी अवतरले माझे मायबाप  || १ ||


भगवे वस्त्र कैसे गगनी झळकले | 

सूर्यासम तेजस्वी माझे कैवारी आले || २ ||


स्वामींचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी | 

स्वामींसी भक्त जीवे भावे ओवाळी || ३ ||


असो नसो भाव आलो तुमच्या पाया | 

कृपादृष्टी पाहे मजकडे स्वामिराया || ४ ||


 शुक्रवारच्या आरत्या 

श्रीएकवीरा देवीची आरती 

 

आरती एकवीरा | तूचि मायेचा झरा || 

वारुनी संकटांना | देसी भक्तां निवारा || ध्रु.||

पांडवांनी बांधियेले | तुझे मंदिर प्रशस्त | 

अज्ञातवासामध्ये | त्यांना ठेवियले गुप्त ||  ||

संत एकनाथांची | तू कुलदेवता || 

कार्लागडी तुझा वास | तू रेणुकामाता ||  ||

वंद्य तू कोळियांना | तू शिवाची शक्ती || 

शुक्रवार साधूनीया | भक्त  ओटी भरती ||  ||

गुण तुझे गावयाला | नसे पामरा शक्ती || 

विनंती एक पायी | देई अनन्य भक्ती ||  ||

 

श्री लक्ष्मीची आरती  

येई लक्ष्मी माते माझे माऊली ये

माझे माऊली ये

दोन्ही कर जोडुनी, दोन्ही कर जोडुनी

तुझी वाट मी पाहे || ध्रु.||

आलिया गेलिया धाडी निरोप

धाडी निरोप

कोल्हापूरी आहे कोल्हापूरी आहे 

माझी महालक्ष्मी माय || ||

साडी तांबडी कैसी गगनी झळकली

गगनी झळकली

ऐरावतावरी  S ऐरावतावरी बैसूनी

माझी लक्ष्मीमाता आली || ||

लक्ष्मीमातेचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी

नित्य दिपवाळी 

लक्ष्मीमातेला  भक्त S लक्ष्मीमातेला भक्त

जीवेभावे ओवाळी || ||

असो नसो भाव आलो तुझिया ठाये

तुझिया ठाये

कृपादृष्टी पाहे कृपादृष्टी पाहे 

मजकडे श्री लक्ष्मीमाये || ||

 

श्रीजीवदानी देवीची आरती

जय देवी जय देवी जय जीवदानी |

आधार सर्वां तू विश्वाची जननी || ध्रु. ||


विरारनगरी दुर्गम गिरिस्थान |

शोधून पांडव करिती स्थापन |

एकवीरा योगलिंग नामे 'जीवधनी' |

झाली तू भक्तांची पुढे जीवदानी || १ ||


त्या स्थानी आदि शंकराचार्य आले |

माहात्म्य तुझे महारास कथिले ||

भक्तिभावे त्याने करिता सेवेस |

प्रसन्न होऊनीया दिला मोक्ष त्यास || २ ||


पुत्रहीन स्त्री शरण  येता तुला |

तव कृपेने तिजला पुत्रलाभ झाला ||

करिता तुजला तांबूल दान |

प्रसन्न होऊनि  करिसी वंशवर्धन || ३ ||


नवरात्री होई उत्सव थोर |

लोटे मंदिरी भक्तसागर ||

होवो तव भक्तीत मन माझे लीन

प्रसन्न होऊनी दे चरणांशी स्थान || ४ ||

 

शनिवारच्या आरत्या 

श्री हनुमानाची आरती 

 


आरती हनुमाना | सकलशक्तिनिधाना || ध्रु.||

होताच तुझा जन्म | केला महापराक्रम ||

उड्डाण नभी केले | आणि सूर्यास ग्रासिले ||  ||

सीतेचे रावण | जेव्हा करी हरण ||

सीतेला तू शोधून | केले लंकादहन ||  ||

मारुनी महिरावण | रक्षी रामलक्ष्मण ||

संजीवनी आणून | लक्ष्मणा देई जीवन ||  ||

चिरंजीव तू भुवनी | येसी संकटी धावुनी ||

तुझ्यासम रामभक्ती | घडो हीच विनंती ||  ||

  

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संजलवहिनींचा आगळा छंद

आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण

आईसाठी पान