मंगळवार, २४ जानेवारी, २०२३

MISCELLANEOUS

MISCELLANEOUS

Bhabhi and Sanjal 

Hi Bhabhi Sanjal

You are kind like an angel

Hi Kishan,

You are the magnanimous person

In your house, we landed

And like royal guests, we were treated

Your hearts are full of sunshine

Your nature is pure and fine

Please come to our nest

And give us an opportunity to serve you to our  best

Shower our house with your kindness

And let us relax in that unparalleled bliss

खुषी और गम

फूल और काँटों का होता है अनोखा रिश्ता

अगर गम न होते तो खुषी का मजा क्या होता

दिवाळी

रंगीबेरंगी दिव्यांनी

झगमगते घर घर

गरिबाच्या घरी

हसतो अंधार भेसूर

सराफांच्या दुकानांत

खरेदी चाले सोन्याची

वणवण फिरे गरीब

करण्या विक्री पणत्यांची

नरकासुराच्या बंदीवासातून

न होई सुटका नारीची

अत्याचारित महिलेला

पारखी माया भावाची

कधी येईल ती दिवाळी

 घेऊन समतेचा प्रकाश

सौख्य फुलेल घरोघरी 

होईल अन्यायाचा नाश

21/10/22

धनत्रयोदशी

आज धनत्रयोदशी

पूजा करा रे धनाची

सारे कष्ट धनासाठी

जाणा महत्ता तयाची

कमवाल जितके धन

थोडे त्यातील करा जतन

आज धन रक्षिलेले

उद्या तुमचे करील रक्षण

उपभोग घ्या धनाचा

गरजूंना करा दान

जावयाचे आपल्याला

धन येथेच ठेवून

23/10/22

03/01/2023 आज दादाने दिलेली हिचकॉकची तिसरी डी व्ही डी Rich and Strange पाहिली. कथा थोडक्यात अशी आहे- फ्रेड आणि एमिली हे जेमतेम परिस्थितीत राहणारे जोडपे श्रीमंतीची स्वप्ने पाहत असतात. त्यांना वारसा हक्कापोटी काही पैसे मिळतात. त्यामुळे ते जहाजाने जगप्रवासाला जाण्यास निघतात. वाटेत फ्रेड एका नकली राजकुमारीच्या नादी लागून तिच्यावर पैसे उधळतो. एमिलीचे एका कमांडरबरोबर प्रेमप्रकरण चालू होते. पूर्ण प्रवास झाल्यावर त्यांचे पैसे संपतात. म्हणून ते एका स्वस्तातील जहाजाने परत जायचे ठरवतात. हे जहाज वाटेत फुटते. एका चिनी जहाजातील लोक त्यांना वाचवतात आणि ते जेमतेम घरी येतात. पैशापाठी सुख येतेच असे नाही, याची त्यांना जाणीव होते.

 १  शब्दाने हरीण:-शिकारी हरणाला आकर्षित करण्यासाठी हरणासारखा आवाज काढतो. हरणाला वाटतं की आपल्यापैकी कुणी आहे आणि तो त्या दिशेने जातो आणि शिका-याच्या जाळ्यात फसतो.

२. स्पर्शाने हत्ती:-हत्तीची शिकार करण्यासाठी खड्डा खणून तो आच्छादून त्यावर कोवळे गवत टाकतात. या गवताच्या स्पर्शाने हत्ती फसतो आणि त्यावर पाऊल टाकून खड्ड्यात पडतो आणि शिका-याच्या जाळ्यात फसतो.

३. रसाने मासा:-माश्याला फसवण्यासाठी जे आमिष लावतात, त्यात मृत कीटक किंवा जिवंत कीटक असतो. त्यांपैकी जिवंत कीटकाकडे मासा लवकर आकर्षित होतो. त्याचे कारण जिवंत कीटकाची हालचाल आणि त्याचा गंध.

४. रूपाने पतंग:-पतंग दिव्याकडे आकर्षित होतो, त्याचे एक संभाव्य कारण म्हणजे दिव्यापसून येणारा प्रकाश. या प्रकाशापासून तो आपला मार्ग शोधत असतो.

५. गंधाने भ्रमर:- फुलाच्या रंगामुळे आणि सुगंधामुळे भ्रमर फुलाकडे आकर्षित होतो.

वरील अर्थ पारंपरिक नसून प्रत्यक्ष आहेत. पारंपरिक अर्थांसाठी केवळ संकेत पुरेसे असतात. जसे, चातक आणि चकोर पक्षी काल्पनिक आहेत. हंसाचा नीर-क्षीर-विवेक काल्पनिक आहे.

आकाशाचे ओझे त्यांना नाही कधीच पेलले  

पण आपल्या पाखरांवर कुठले ओझे त्यांनी नाही कधीच टाकले 

स्वतः साठी कुणाकडे नाही काही मागितले  

पण पाखरांच्या चोचीत घास भरविण्यास कितीदा हात पसरले 

फसले कितीदा पण नाही फसवले कुणा 

संकटांच्या वादळात नाही सोडला प्रामाणिकपणा 

उघडले ज्ञानाचे भांडार, दाखवला मार्ग भक्तीचा 

सुगंध दरवळे जीवनात वडिलांच्या स्मृतींचा



शालीमावशीची अधुरी कहाणी:

मला अजूनही शालीमावशी आठवते, दिसायला गोरीपान, ठेंगणी, दात पुढे आलेले (आजीचे दात पुढे होते, त्या वळणावर). ते साल होते १९६५. मी दुसरीमध्ये, म्हणजे सहा वर्षांचा होतो. आमचे सर्व नातेवाईक मुंबईमध्ये होते . शालीमावशी पुण्यात दिल्यामुळे आम्हाला एक सोबत झाली. शालीमावशी वरचेवर आमच्याकडे खडकीला येत असे. आम्हीसुद्धा पुण्याला तिच्या घरी जात असू. शालीमावशीच्या यजमानांना भाऊसाहेब म्हणत, आम्ही मुले त्यांना भाऊकाका म्हणत. तेसुद्धा मला चांगले आठवतात. मला शाळेची वही हवी होती. शालीमावशीने मला 'अरुण'ची वही घेऊन दिली. ती  वहीसुद्धा मला आठवते. अरुणच्या वहीवर उगवत्या सूर्याचे आणि   कोंबड्याचे चित्र असे. आम्ही खडकी स्टेशनवर गेलो. मला भुईमुगाच्या शेंगा घेऊन दिल्या. नंतर बातमी आली की शालीमावशीला के एम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे. आई-अण्णा तिला पाहण्यास जाऊ लागले. मी एकदा आईबरोबर गेलो होतो. शालीमावशीची वाचा गेली होते. आई तिला म्हणाली,' शाले, मी ताई आले आहे.' शालीमावशीला कळले असावे. ती  बोलू शकत नव्हती. नंतर बातमी आली की शालीमावशी गेली. आई शेजारणींना गप्पा मारताना सांगत असे. त्यात असा भाग असे, शालीमावशी गरोदर होती. नवऱ्याने तिच्या पोटावर लाथ मारून तिचा गर्भ मारला होता. सासूने तिला शेंदूर किंवा असाच काहीतरी पदार्थ खायला घातल्यामुळे तिची वाचा गेली होती. हॉस्पिटलमध्ये तिच्या सासरचे ठीक इलाज करत नव्हते. तिच्या नवऱ्याच्या निष्क्रियतेवर हॉस्पिटलच्या प्रमुख बानू कोयाजीसुद्धा चिडल्या होत्या. आमचा धाकटा मामा रमेशमामा फार हळवा होता. शालीमावशी गेल्यानंतर तो भाऊसाहेबांना मारायला चालला होता म्हणे. परंतु बानू कोयाजींनी त्याला आवरले. आई म्हणते, तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी रमेशमामा चितेत उडी टाकतो की काय अशी भीती वाटत होती. आजी खूप रडली. म्हणत  होती, ' शाले, तू बाळंतपणाला माझ्याकडे यायचं. मी तुझं केलं असतं.' आई सांगत असे की शालीमावशी लहानपणी खाण्यात फार चोखंदळ होती. चपातीवर करपलेला पापुद्रा काढून टाकत असे. तिला सासरी शिळे पदार्थ खायला मिळू लागले. तिचे सासरचे नाव स्नेहलता होते. सासू एक सारखीस्नेहलता’ नावाने किंचाळत असे. तिची कुसुममावशी बरोबर जोडी होती. त्यामुळे नेहमी शाली-कुसुम असा उल्लेख होत असे. त्यांच्या भरपूर मारामाऱ्या चालत, असे कुसुममावशी सांगे. अण्णा सांगत की तिचा अंत्यसंस्कार झाला त्या दिवशी काळाकुट्ट अंधार आणि कडाक्याची थंडी होती. आई सांगत होती, की तिला एकदा स्वप्न पडले. शाली मावशी स्वप्नात येऊन विचारत होती, ' माझी इच्छा पूर्ण झाली नाही. मी आता कुणाच्या पोटी जन्म घेऊ.' मनातील विचार स्वप्नरूपाने दिसले असतील. जगात सासरच्यांच्या छळामुळे सम्पणाऱयांमधील एक शालीमावशीची अधुरी कहाणी.     

दादा- माझ्या स्मरणात शाली मावशी चांगली आहे. मला ती खूप आवडायची. मी मुंबईत असताना रात्री तिच्या पुढ्यात झोपायचो.   ती खूप टापटीपीची आणि खूप चोखंदळ स्वभावाची होती. अण्णांनी पुण्याचे स्थळ आणले. श्री. प्रधान 512 मध्ये होतेसुधाकर देशपांडे त्यांचा मेव्हणात्याला आई होती पण वडील नव्हतंमला हे (आई वगैरे आणि exact नातेही ) काही नीटस आठवत नाहीपण मी मुंबईत असतानाच शाली आणि कुसूम मावशींचे लग्न ठरलंशाली मावशीला हा मुलगा पसंत नव्हता आणि त्यावरून तिची आजीची भांडणं व्हायचीमला आठवतं एकदा आजीने तिला मारलेही होते. बाईला नवरा चांगला मिळाला नाही की तिचे आयुष्य वैराण होते. शाली मावशीच्या कोणत्या ही व्याख्येत सुधाकर बसत नव्हतात्याला कायम स्वरूपाची नोकरी नव्हती आणि मिळवून टिकवायची ईच्छा ही नव्हती. हे ही चालले असते पण तो बाहेरख्याली होता आणि वेश्यांकडे जायचा. ह्या सगळ्याचा तिला खूप त्रास व्हायचा आणि ती आई कडे येऊन रडायचीअण्णांना असे झालं की मी हे काय करायला गेलो आणि काय झालेमी चौथीत होतो आणि घरी पुण्यात आलो होतोमला मुंबईत असताना दिसणारी आनंदी शाली मावशी कुठेही दिसत नव्हती. आई अण्णा तिला धीर देत पण ती झुरत राहिली. सुधाकर बहिणी कडेच रहात होता, वेगळा राहून संसार करायची त्याला ईच्छा नव्हती. त्यात शाली मावशी गरोदर राहिली, खरेतर तिला तो नवरा, ते घर, ते सासर  काहीच आवडत नव्हतं. मी एकदाच आजी आजोबांबरोबर एक रात्र तिच्या सासरी राहीलो होतो, तो पुण्यातील जुना पण प्रशस्त वाडा होता पण ढेकणांनी भरलेला होता, मी पाच मिनिटं पण झोपू  शकलो  नाही आणि ह्या ठिकाणी शाली मावशी रहाते ह्या विचारानेच मला रडू फुटायचे.

भाऊबीज

 आज दीस भाऊबीज

येईल भाऊ घरी

न्हाऊ माखू घालीन

गोडधोडाची करते तयारी

होतो जेव्हा लहान

भांडभांडलो वेड्यावाणी

आठवणी येती दाटून

डोळां खळे ना पाणी

आज कळे अर्थ

भाऊबहीण नात्याचा

सात जन्मी राहो हाच

बंध रेशमाचा


कालच्या मतदानातील प्रत्यक्ष घडलेला विनोद                 २५/३/२०२३

एक ऑसी कुटुंब मतदानाला आले होते. वडील, मुलगा आणि एक शाळेत जाणारा मुलगा असे तिघे जण होते. मुलगा चांगला चुणचुणीत दिसत होता.  मी मतपत्रिका देत असताना आईचे आणि मुलाचे संभाषण चालू होते. मुलगा शंका विचारत होता आणि आई शंकानिरसन करीत होती. 

मुलगा म्हणाला,'If there is some election  like for premier, I will vote for you, because you are very bossy.'

आम्ही सर्व जण हसू लागलो.

(टीप: ऑस्ट्रेलिया मध्ये राज्याच्या प्रमुखास, म्हणजे आपल्याकडील मुख्यमंत्री, प्रीमिअर म्हणतात. तिथे पंंतप्रधानासही Premier हाच शब्द जास्त प्रचलित आहे.)


मुन्ना वाणी

आम्ही खडकीला मुंबई पुणे रस्त्याला लागून असणा-या गोपीचाळीत राहत होतो. रस्ता ओलांडला की मुन्ना वाण्याचे दुकान होते.


मुन्नाचे वडील पहाटे दुकानाच्या दारात डोक्यावर पाणी ओतून घ्यायचे आणि धोतर नेसून दुकानात बसायचे. त्यांच्या मदतीला त्यांचा मुलगा मुन्ना येत असे. मग रात्री दहापर्यंत दुकान चालू असे.


दिवसभर दुकानामध्ये गि-हाइकांची ये जा चालू असे. एक आण्याची मोहरी, एक आण्याची मिस्री, एक आण्याचा चहा, अशा स्वरूपाची खरेदी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व गि-हाइके करीत असत. मुन्ना आणि मुन्नाचे वडील शांतपणे भराभर छोट्या छोट्या पुड्या बांधत. 'चहा एक आण्याचा येत नाही, दोन आण्याचा घ्यावा लागेल,' असे कधी कधी गि-हाइकाला सांगितले जाई.


त्या काळी पिशवीबंद पदार्थ जवळ जवळ नव्हतेच. मुन्नाकडे सर्व वस्तू मिळत. दुकानात काचेच्या कपाटांत मांडलेल्या वस्तू पाहायला छान वाटे. माझ्या बहिणीला मुन्नाकडे मिळणारे चिल्लाळ ब्रँडचे भरपूर तेल आणि लोणच्याचा मसाला घातलेले लोणचे अजून आठवते.


मुन्ना काही आमच्या वयाचा नव्हता. त्याचे खरे नाव काय होते कुणास ठाऊक. पण आम्ही त्याला 'ए मुन्ना' असेच सरळ म्हणत असू. मुन्नाचा रंग गोरापान, मोठी दंतपंक्ती आणि मुद्रा हसरी होती. मुन्ना हसला की दंतपंक्तीचे दर्शन होई.


आमच्या वडिलांचे मुन्नाच्या वडिलांकडे उधारीचे खाते होते. वडिलांनी मुन्नाच्या वडिलांना सांगून ठेवले होते, की 'माझी मुले आली तर त्यांना काही लागेल ते द्या.' मुन्नाचा एक भाऊ होता, मोहन म्हणून. हा मुन्नासारखा नव्हता, अतिशय उद्धट होता. एकदा त्याने आमची 'दिवसातून किती वेळा लिहून ठेवायचं,' म्हणून माझी आणि माझ्या मोठ्या भावाची बोळवण केली होती. मुन्ना कधी आम्हाला असे काही बोलल्याचे मला आठवत नाही.


पुढे मुले मोठी झाल्यानंतर मुन्नाच्या वडिलांनी मुलांना स्वतंत्र दुकाने थाटून दिली. त्यामुळे मग मुन्नाची भेट झाली नाही.

 

मी नंतर सी ए करू लागलो. आर्टिकलशिप करताना चिंचवडच्या युनायटेड वेस्टर्न बँकेत ऑडिट साठी गेलो असता  मँनेजरच्या कँबिनमध्ये मी मुन्ना बसलेला पाहिला. डोक्याचे पूर्ण टक्कल झाले होते. मी विचारलं, हे कोण? मला सांगितलं, 'हे मुन्नाशेट, या ऑफीसचे मालक.' म्हणजे इथेही मुन्ना हा मुन्नाच होता, फक्त शेट झाला होता. मी मुन्नाला ओळख दिली. मुन्नाने निश्चित मला ओळखलं नाही, पण खूप जुनी ओळख असल्याचं दाखवलं. गप्पा मारल्या. बँकेतील सर्वच लोक त्याच्याशी खेळीमेळीने वागत होते. मुन्ना तसाच होता.


नंतर माझे सी ए पूर्ण झाले . सुरुवातीला मी प्रँक्टिस करीत होतो. मुन्ना तेव्हा मला कुठे भेटला, मला आठवत नाही. पण मुन्ना मला त्याच्या ओळखीच्या दुकानदारांकडे घेऊन गेला.'ये बहुत शरीफ लडका है. इसे अपना काम दो,' म्हणून माझी शिफारस केली.


तेव्हा आम्ही खडकी सोडून चिंचवडला जागा घेतली होती. मी मुन्नाला आमच्या घरी चलण्यास सांगितले. 'तुम्हाला भेटून माझ्या आई-वडिलांना आनंद होईल,' असे सांगितले. मुन्ना आवर्जून घरी आला. वाटेत मला म्हणाला, 'मला असेच एक ग्रुहस्थ भेटले होते. ते म्हणाले, तुम्ही होता म्हणून आमचे वाईट दिवस निघून गेले.' आमच्या बाबतीतही ते ब-याच अंशी खरे होते.


मुन्ना घरी आला. आई-वडिलांशी गप्पा मारल्या. ही माझी मुन्नाशी शेवटची भेट.


काही दिवसांपूर्वी एक लेख माझ्या पाहण्यात आला की 'मोठ्या मॉल्सना टक्कर देऊन छोटे दुकानदार कसे टिकून आहेत.' लेख न वाचताच मला प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. कारण मला मुन्ना वाणी आठवला होता.

दादा:

खूपच सुंदर...हृदयस्पर्शी.. अण्णा ना वाचून खूप छान वाटले असते..मला मुन्नचा मुलगा आठवतो तो पुण्यातील शाळेत होता साधारण आपल्याच वयाचा...त्याला का कुणास ठाऊक आपल्या बद्दल खूप आदर वाटायचा..आणि तो खूप आदराने बोलायचं...कदाचित मुन्ना आणि त्याच्या वडिलांनी सांगितले असावे...

प. पू. श्रीराऊळ महाराज


ही गोष्ट साधारण १९८५ सालची असेल. आम्ही तेव्हा खडकी सोडून चिंचवडला जागा घेतली होती. मी सी ए पूर्ण केले होतो. आमच्या खडकीच्या जागेत मी माझे सी ए चे ऑफीस थाटले होते. खडकीला बोपोडीला तेव्हा दूध केंद्र होते. (पूर्वी महाराष्ट्र शासनाची दूध केंद्रे असत आणि पहाटे दूध केंद्रावर जाऊन दुधाच्या बाटल्या आणाव्या लागत.) या दूध केंद्रावरील बाई माझ्या ओळखीच्या झाल्या होत्या. मला व्हिजिटिंग कार्डस बनवायची होती आणि या बाईंचा भाऊ व्हिजिटिंग कार्डस बनवत असे म्हणून मी व्हिजिटिंग कार्ड्स बनवण्याचे काम त्याला दिले होते. या बाईंचे नाव मला आठवत नाही, परंतु त्यांच्या भावाचे आडनाव गवांदे होते एवढे मला नक्की आठवते. मी आता सोयीसाठी या बाईंचा सौ. गवांदे आणि  त्यांच्या यजमानांचा श्री. गवांदे असा उल्लेख करतो.


मी माझ्या ऑफीसमधील काम उरकून दुपारी  गवांदेच्या घरी माझ्या कार्डांची चौकशी करण्यास गेलो होतो. बोलता बोलता सौ.गवांदे मला म्हणाल्या की त्यांच्या गुरूंचे, श्रीराऊळ  महाराजांचे, निर्वाण झाले. मला श्रीराऊळ महाराज माहीत नव्हते, त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेला परिणाम माझ्या चेहऱ्यावर दिसला नाही. त्यामुळे श्री. गवांदे पुढे सांगू लागले.

'माझा श्रीराऊळ महाराजांशी लहानपणापासून संबंध आला होता. मी त्यांचे सहज शे-दीडशे तरी चमत्कार पाहिले आहेत,' 


'एकदा श्रीराऊळ महाराजांनी एका बेकरीच्या काऊंटरवरील बरणी उघडून बरणीतील बटर काढून रस्त्यावरील कुत्र्याला खायला घातले. हे पाहताच बेकरीवाला त्यांच्या पाठी धावत आला आणि तावातावाने भांडत बटर मागू लागला. महाराजांनी एकदा बेकरीवाल्याकडे पाहिले आणि कुत्र्याच्या पाठीवर थाप मारून म्हणाले,'टाक त्याचे बटर.' आणि त्या कुत्र्याच्या तोंडातून खरोखरच बटर बाहेर पडले. ती लाळ होती आणि बटरचा अंश तिच्यात दिसत होता. हे पाहून बेकरीवाला अवाक् झाला आणि चुपचाप निघून गेला.


श्री. गवांदे यांनी सांगितले की लहान असताना ते सकाळी झोपेतून जागे झाले होते, पण अंथरुणातच पडून होते. त्यांनी पाहिले की महाराज काहीतरी करीत होते. श्री. गवांदेंची  बालसुलभ उत्सुकता जागृत झाली. त्यांना असे दिसले की महाराजांनी चक्क एक घड्याळ घेतले आणि फोडून टाकले. त्यांनी सांगितले की ते असेच समोरच्याच्या हातातील घड्याळ मागून घेत आणि त्याच्यासमोरच फोडून टाकत.


श्री. गवांदेंनी सांगितले की श्रीमहाराज कुणाच्या घरी गेले तर देव्हाऱ्यातील देव उचलून बाहेर फेकून देत.


येथून पुढे सौ. गवांदे यांची कथा सुरू होते. सौ. गवांदे यांनी सांगितले की खूप प्रयत्न करून त्यांचे लग्न जमत नव्हते. त्यांना कुणीतरी  श्रीमहाराजांचे नाव सांगून त्यांना विचारण्यास सांगितले. परंतु त्या म्हणाल्या की माझा यावर विश्वास नव्हता. 


एकदा गावामध्ये कुठल्या तरी कारणासाठी गावजेवण होते आणि श्रीमहाराज सुद्धा आले होते. त्याच मनुष्याने सर्वांदेखत श्रीमहाराजांना विचारले की हिचे लग्न कोणाशी होणार ते सांगा. श्रीमहाराजांनी स्वत: उत्तर न देता तेथे एक मुका मनुष्य होता, त्याच्या पाठीवर थाप मारून म्हटले की, 'ते तर हासुद्धा सांगेल. सांग रे, हिचं लग्न कुणाशी होणार?'


त्या वेळी त्या मुक्या मनुष्याने श्री. गवांदे यांच्याकडे बोट दाखवून सांगितले की,' ह्याच्याशी होणार.' सौ. गवांदे म्हणाल्या की मी अवाक् झाले. प्रत्यक्ष श्रीमहाराजांनीच सांगितल्यामुळे सौ. गवांदे यांच्या आई-वडिलांनी श्री. गवांदे यांच्या आईवडिलांशी बोलणी केली. अशा प्रकारे सौ. गवांदे यांचे लग्न श्री. गवांदे यांच्याशी झाले.


सौ. गवांदे यांनी आणखी एक आठवण सांगितली. त्यांच्या ओळखीच्या एक बाई होत्या. त्यांना मूल नव्हते. कुणीतरी त्यांना सांगितले की शेजारी श्रीराऊळ महाराज आले आहेत, त्यांच्याकडे मूल होण्याविषयी सांगावे. या बाई त्या वेळी जेवत होत्या. त्यांनी विचार केला की जेवण  पूर्ण करून निघावे. त्यामुळे जेवण पूर्ण करून हातावर पाणी पडल्या पडल्या त्या श्रीमहाराजांच्या भेटीस निघाल्या. परंतु श्रीमहाराज निघाले सुद्धा होते. या बाई त्यांना शोधत एस टी स्टँडपर्यंत आल्या. परंतु श्रीमहाराज तोपर्यंत बसमध्ये बसलेसुद्धा होते.


 सौ. गवांदे सांगत होत्या की श्रीमहाराजांच्या समाधीच्या वेळी  सुद्धा श्रीमहाराज त्यांना काही ना काही प्रसंगांतून सूचना देत होते, परंतु त्या त्यांना कळल्या नाहीत. उदाहरणार्थ रात्री मुले झोपण्याची तयारी करीत होती. एका मुलाने दुसऱ्याच्या अंगावर खूप पांघरुण टाकले, तेव्हा तो मुलगा म्हणाला, 'मला असं पुरलं का आहे?'. ऐकताना ते विचित्र वाटले, परंतु नंतर श्रीमहाराजांच्या समाधीचे वृत्त आल्यानंतर त्याची संगती लागली.


अशा प्रकारे गवांदे दांपत्याने मला श्रीराऊळ महाराजांविषयी भरभरून सांगितले. मला श्रीमहाराजांचा एक फोटोही मला दिला होता. हा फोटो बरेच दिवस मी ठेवला होता. परंतु नंतर तो हरवला.


श्री राऊळ महाराजांच्या या आठवणी कुठेतरी लिहून ठेवाव्या, असे मला ब-याच दिवसांपासून वाटत होते. परंतु अखेर आज श्रीराऊळ महाराजांच्या कृपेने योग आला आणि मला आठवतील तेवढ्या आठवणी, माझे कुठलेही भाष्य न लिहिता, मी शब्दबद्ध केल्या.

(इंटरनेटवर श्रीराऊळमहाराजांची पिंगुळीला समाधी आहे अशी माहिती मिळते)

|| श्री राऊळ महाराजांस शतश: प्रणाम ||

Message to Shama for her success in classes

शामास, तुझ्या शिकवणीतील मुलांचे यश कौतुकास्पद आहे. खडकीला असताना आपल्या भाजीवालीच्या मुलीपासून तू शिकवणीला सुरुवात केली. शिकवणी करून घरात कपाट घेतले. चांदोबामध्ये आलेल्या कथेप्रमाणे कुठले कौशल्य कधी कामाला येईल ते सांगता येत नाही. तसे ते कौशल्य तुला आज कामाला आले. अतिशय अडचणी असताना, सुखसोयी उपलब्ध नसताना, अतिशय माफक फी घेऊन, कमी वेळामध्ये , मुलांच्या पालकांची मर्जी सांभाळून तू एक फार मोठी यशोगाथा लिहिली आहेस. खरोखर एखाद्या टी व्ही चँनलवर तुझी मुलाखत घ्यायला पाहिजे. असा पराक्रम तू आज नाही, पूर्वीसुद्धा केला आहेस. सर्वच पालकांना ही जाण नसते. मुलगा यशस्वी झाला तर तो हुशार, अपयशी झाला तर 'एवढे पैसे घेऊन बरोबर शिकवलं नाही' म्हणणारे पालकही असतात. व्यावसायिक क्लासेसमध्ये आधी भरमसाट फी घेऊन मोकळे होतात आणि विद्यार्थी यशस्वी होवो न होवो याच्याशी त्यांना कर्तव्य नसते. पण विद्यार्थी यशस्वी झाल्यावर मात्र त्याचे फोटो टाकून स्वतः ची जाहिरात करतात. तूसुद्धा तुझ्या यशाची गाथा कुठेतरी नोंदवून ठेव. मुलांच्या प्रोफाइल्स बनवून ठेव. पुढे पालक जेव्हा शिकवणीच्या शोधात येतील, तेव्हा तुला या प्रोफाइल्स दाखवता येतील. क्लासेसना फक्त मुलांच्या परीक्षेतील यशाशी कर्तव्य असते. पण तू मुलांचं व्यक्तिमत्त्व, आयुष्य घडवतेस. परंतु असंही वाटतं की एकसारखं हेच काम करू नको. भविष्यात बसल्या जागी कसा पैसा मिळवता येईल त्याचा विचार कर. उदाहरणार्थ, यू ट्यूब चँनल वगैरे. If you do not do things differently, you continue to do the same thing. फोनवर एवढं आठवणार नाही, म्हणून सुचेल ते लिहून काढलं. तुझ्या यशास पुन्हा प्रणाम.🙏

16/5/2023

अकरा वेळा भीमरूपी स्तोत्र

ही गोष्ट १९७५-७६ सालची असेल. मी त्या वेळी शिक्षणासाठी घाटकोपरला माझ्या मामाकडे, नानामामाकडे राहण्यास होतो.   


चाळीतील आमच्या घराची कौले फार जुनी झाली होती आणि बदलावयाची होती. परंतु वडिलांच्या पगारात ते काही केल्या जमत नव्हते. मोठ्या भावाला, दादाला नोकरी लागली होती. पावसाळा सुरू होण्याच्या आत घराचे छप्पर बदलणे आवश्यक होते. अँस्बेस्टॉसचे पत्रे फार महाग होते. त्यामुळे मध्यम पर्याय म्हणून अँस्फॉल्टेड पत्रे घालावयाचे ठरले. आमच्या चाळीतच एक सुतार राहत होते, त्यांच्याकडून पत्रे बसवून घेतले. आता पुढील भाग म्हणजे भिंत आणि पत्रे यांच्यामधील फटी बुजवून घेणे. त्यासाठी गवंडी पाहणे आवश्यक होते.


मी मे महिन्याच्या सुट्टीत खडकीला घरी राहावयाला आलो होतो. मे महिन्यामध्ये उष्णता वाढते आणि एखादा तरी वादळी पाऊस होतो.


त्या दिवशी आम्ही सारेजण गाढ झोपेत होतो. मध्यरात्र झाली होती आणि अचानक वादळी पाऊस सुरू झाला. काळाकुट्ट अंधार, विजा कडकडू लागल्या. ढगांचा गडगडाट होऊ लागला. आम्ही सर्व जागे झालो. 


सोसाट्याचा वारा सुटला होता. घराच्या भिंती आणि छप्पर यांमध्ये असणाऱ्या फटीतून वारा आत शिरला आणि नवीन पत्रे एखादा कागद हातात धरून ताणावा त्याप्रमाणे ताणले जाऊ लागले. कुणीतरी छपरावर बसून पत्रे उपटून काढण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे, असे वाटू लागले. छप्पर आता कुठल्याही क्षणी निघणार याची खात्री पटली. मध्यरात्री, अशा मुसळधार पावसात छप्पर उडून गेले तर आमची काय अवस्था होईल या कल्पनेने आम्ही अतिशय घाबरून गेलो. असहाय्यपणे आम्ही पत्र्यांकडे पाहत होतो.


माझ्या एकदम काहीतरी मनात आले आणि मी देवासमोर उभा राहून मोठ्याने भीमरूपी स्तोत्र म्हणावयास सुरुवात केली. वा-याचा जोर वाढतच होता. मी स्तोत्र म्हणणे चालूच ठेवले होते. 


थोड्या वेळाने पाऊस ओसरू लागला. वा-याचा जोर कमी होऊ लागला. पाऊस थांबला. माझे भीमरूपी स्तोत्र अकरा वेळा वाचून झाले होते. घरभर पाणी झाले होते. परंतु छप्पर शाबूत राहिले होते.


मी अशाच प्रकारे अकरा वेळा भीमरूपी स्तोत्राचा दोन वेळा प्रयोग केला आहे. परंतु ते प्रसंग एवढे महत्त्वाचे नव्हते.


तुमच्या ऐहिक गरजांसाठी नाही, परंतु जेव्हा तुमचे सर्व उपाय थकले आहेत, कुणीच मदत करू शकत नाही, अशा वेळी आर्त होऊन भीमरूपी स्तोत्र अकरा वेळा म्हटले, तर भक्तवत्सल मारुतिराया निश्चित मदतीला धावून येतो, असा अनुभव मी घेतला आहे. नमस्कार माझा तया मारुतीला.💐


१६/मे/२०२३, सिडनी


दुर्दैवी राजवी


आम्ही खडकीला गोपीचाळीत राहत असताना आमच्या शेजारी एक कन्नड जोडपे राहायला आले.  यजमानांचे पानाचे दुकान होते. हे जोडपे उडुपीचे राहणारे होते आणि स्वत:ला उडुपी म्हणूनच सांगत. यांच्या बायकोचे नाव इंदिरा का इंद्रा होते. मी आणि माझी बहीण शामा तेव्हा खूप लहान होतो. या बाईंना आम्ही इंद्रामावशी म्हणत असू.


आमच्या चाळीत तेव्हा पाण्याचा खूप त्रास होता. अख्ख्या चाळीसाठी पाण्याचा एक नळ होता. पाण्याला खूप बारीक धार असायची.  दु:खाची गोष्ट म्हणजे आम्हाला लोक पाणीच घेऊ द्यायचे नाहीत. घरात कंदील होता. वडिलांना, अण्णांना, बहुतेक तेव्हा ओव्हरटाइम होता, कारण १९६२च्या भारत-चीन युद्धाचे दिवस होते. 


आई कायम पाण्याच्या विवंचनेत असायची. मी आणि शामा आईला सोडत नसे. आई नळावरून पाणी आणायला लागली की आम्ही दोघे कंदिलाच्या उजेडात घरात थांबत नसू. आईच्या पाठी फिरत असू. माझा मोठा भाऊ दादा तेव्हा मुंबईला मामाकडे शिकण्यास होता.


इंद्रा मोठी खमकी बाई होती. चाळीतील भांडखोर बायकांना ती पुरून उरायची. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती माझ्या आईच्या बाजूला होती आणि आईला पाणी मिळवून द्यायची.


 एक प्रसंग मला चांगला आठवतो. रात्रीची वेळ होती. सा-या बायका पाणी भरत होत्या. आईला कोणी पाणी घेऊ देत नव्हते. आई हताश होऊन कमरेवर हात ठेवून बाजूला उभी होती. इंद्रामावशी तरातरा आली आणि हिंदीत म्हणाली,'असं कमरेवर हात ठेवून कुणी पाणी घेऊ देणार आहे का?' नळाला जे भांडं लावलं होतं, ते तिने सरळ काढून टाकलं आणि आईचा हंडा नळाला लावला. इंद्रामावशीला अडवण्याची कुणाची हिंमत झाली नाही.  इंद्रामावशीचा आणखी एक फायदा असा होता की या बायका कन्नडमध्ये जे बोलत ते तिला समजत असे.


इंद्रामावशीला राजवी नावाची एकच मुलगी होती. तिला ती राजू म्हणत असे. राजू खूप रडत असे. एकदा तर राजू जिवाच्या आकांताने रडत होती. राजू बहुतेक वेळ आमच्याच घरी राहत असे. आमच्याच घरी झोपी जाई. इंद्रामावशी मग तिला घेऊन जात असे. 


इंद्रामावशीच्या यजमानांनी नंतर कळसला जागा घेतली. तिथे त्यांनी उपाहारगृह काढले होते. आम्ही कळसला त्यांच्या घरी भेटायला गेलो. इंद्रामावशीचा पाहुणचार घेऊन त्यांचे 'रमा कँफे' नावाचे उपाहारगृह पाहून आम्ही घरी आलो.


नंतर ब-याच  वर्षांनी एका शेजारणीशी बोलत असताना इंद्रामावशीचा विषय निघाला. तेव्हा आईने सांगितले की इंद्राला मुलगी नको होती. एकदा तर तिने मुलगी रडत होती म्हणून   तिच्या अंगावर की डोळ्यात  मिरची टाकली होती. आम्ही कळसला राहायला गेलो तेव्हा तिने तिच्या कपड्यांची पिशवी भरली आणि ती आमच्या आईबरोबर जाण्यास निघाली. आम्ही कसातरी तिचा डोळा चुकवून निघालो.


राजू जिवाच्या आका़ंताने का रडली होती, सतत आमच्या घरी का राहत होती, त्याचा मला तेव्हा उलगडा झाला होता.


सिडनी, २३ मे २०२३

श्रीपादवल्लभांच्या आरतीची गोष्ट 

या आरतीची एक गोष्टच झाली. मी आरती बनवून फक्त तुम्हाला दाखवली होती. आज आम्ही आमचे एक मित्र शिरीश यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या मिसेस पडल्या आणि त्यांचा पाय फ्रँक्चर झाला म्हणून त्यांना पाहायचे होते. बरोबर संजय म्हणून दुसरे मित्र आणि त्यांच्या मिसेस होत्या. सुशिल-माधवीसुद्धा आले होते. शिरीशच्या घरासमोर मनोज म्हणून त्यांचे एक मित्र राहतात. ते कार सर्व्हिसिंगचं काम करतात. वर्षानं एकदा तिच्या गाडीचं काम मनोचकडून केलं होतं.

शिरीश म्हणाले की मनोजच्या कडे स्वामी समर्थांची पूजा आहे. म्हटलं जाताना आपण दर्शन घेऊ या. शिरीश, मी,  वर्षा, संजय , माधुरी, सुशिल, माधवी एवढे जण त्यांच्या घरी गेलो. पाहतो तर स्वामी समर्थांची पूजा वगैरे काहीच नाही. देव्हाऱ्यात श्रीपादश्रीवल्लभांचा फोटो होता. भिंतींवर जिकडे तिकडे बहुधा श्रीपादश्रीवल्लभांची वचने लावली होती. त्यांचा श्रीपादश्रीवल्लभांचा कार्यक्रम झाला होता. शिरीशना बहुतेक श्रीपादश्रीवल्लभ माहीत नसल्यामुळे ते स्वामी समर्थ म्हणाले.

मला वाटलं हे श्रीपादश्रीवल्लभांचे एवढे भक्त आहेत तर यांना आरती दाखवण्यास हरकत नाही. मी त्यांना आरतीबद्दल सांगितलं. ते म्हणाले, म्हणून दाखवा, आम्ही ऐकतो. मग मी सर्वांसमोर आरती म्हणून दाखवली. त्यांना आवडली. ते म्हणाले, मला फॉर्वर्ड करा. मी त्यांना आरती फॉर्वर्ड केली.

आमच्या ग्रुप मध्ये एक तेलगू मित्र आहेत. संजय म्हणाले, मी त्यांना फॉर्वर्ड करतो. मी म्हटलं, आरती मराठी आहे, त्यांना कशी समजेल? ते म्हणाले, त्यांना मराठी समजतं. एक ऑडिओसुद्धा द्या, म्हणजे त्यांना चालही कळेल. ते रोज पूजेमध्ये ऑडिओ लावतील. म्हणून ऑडिओ बनवला.

आता योगायोग किती पहा. मी आदल्या दिवशी आरती बनवली होती. आम्ही शिरीशच्या मिसेसना पाहायला गेलो होतो. शिरीशना श्रीपादश्रीवल्लभ माहीत नव्हते. ते स्वामी समर्थ म्हणाले. आम्ही दर्शनाला गेलो स्वामी समर्थांच्या, पण दर्शन दिले श्रीपादश्रीवल्लभांनी आणि आरतीसुद्धा म्हणवून घेतली, त्यांच्या भक्तांना ऐकवली.

सिडनी, २३ जुलै २०२३



चारा भरवुनी चोचीत I बळ देई पंखांत II
पाखरांसाठी आई I कष्टते दिनरात II


आठवणीतील तळेगाव 
आम्ही तळेगावला राहत होतो, तेव्हाच्या या आठवणी आहेत. तळेगावला आम्ही सोमवार पेठेतील जागा सोडून आलो होतो. या जागेला खूप ओल होती. त्यामुळे एक सारखं आजारपण यायचं. तळेगावला येऊन तब्येत सुधारली, असं अण्णा म्हणत. तेव्हाचे म्हणजे १९६१-६२ चे तळेगाव, म्हणजे अगदी खेडेगाव होते‌. माझे वय तेव्हा अवघे दोन-तीन वर्षांचे होते. तरी मला तळेगाव बरेच आठवते. माझ्या आईला आश्चर्य वाटे की मला एवढे कसे आठवते. माझ्या बहिणीचा शामाचा जन्म तळेगावचा, तळेगाव हॉस्पिटलमधील. आम्ही खडकीला राहत असताना, कुठल्या तरी कारणासाठी शामाचे बर्थ सर्टिफिकेट हवे होते. आई-अण्णा तेव्हा तळेगावला जाऊन तळेगाव हॉस्पिटलमधून शामाचे बर्थ सर्टिफिकेट घेऊन , आम्ही राहत होतो त्या चाळीत जाऊन शेजाऱ्यांना भेटून आले होते. शामा तेव्हा दहा-अकरा वर्षांची तरी असेल. गंमत म्हणजे तेव्हा तेथे राहणारे आमचे दणाईत म्हणून एक शेजारी तेव्हाही तेथे राहत होते. माझी मावशी , दीदीमावशी, बाळंतपणासाठी आमच्याकडे तळेगावला होती. त्यामुळे माझ्या मावसभावांचा, सुधीर आणि सुशील (हे जुळे आहेत) यांचा जन्मही तळेगावचा. एकदा आम्ही डेक्कन एक्स्प्रेसने मुंबईहून पुण्याला येत असताना, गाडी तळेगावला थांबली. सुधीर - सुशील स्टेशनवर (प्लॅटफॉर्मच्या पलीकडील बाजूस) रुळावर उतरले आणि माती हातात घेतली. मी विचारले, 'हे काय?' सुशील म्हणाला,' जन्मस्थानच्या मातीला स्पर्श केला.' मला तेथील हरण टेकडी आठवते. एकदा मी आई आणि आईच्या एका मैत्रिणीबरोबर हरण टेकडीवर जायला निघालो. परंतु वर जाळ दिसला. म्हणून आम्ही टेकडी न चढताच परत फिरलो. घरी येईपर्यंत पूर्ण टेकडीला वणवा लागला होता. हा वणवासुद्धा मला आठवतो. तळेगावमध्ये पंच पांडवांचे देऊळ आहे. आम्ही एकदा रात्रीच्या वेळी या देवळात गेलो होतो. तेथे मोठ्या मिशा असलेला, मोठ्या डोळ्यांचा भीम पाहून आम्ही घाबरून गेलो. या देवळात द्रौपदीची एका कुशीवर झोपलेल्या अवस्थेतील मूर्ती होती. ही मूर्ती म्हणे दर सहा महिन्यांनी कूस बदलत असे. ते ऐकून आम्ही आणखीच घाबरलो. आमचं तळेगावातील घर दोन खोल्यांचं होतं. दिवाणखान्याच्या खोलीचा निळा रंग मला आठवतो. घरासमोर पडवी होती. आमची कोपऱ्याची खोली होती. त्यामुळे लागूनच बसण्यासाठी दगडी कट्टा होता. घरातून बाहेर पडलं की मोठा रस्ता होता आणि या रस्त्यावर सतत रहदारी असे. रस्त्यापलीकडे गिरणी होती. मी एकदा एका छोट्या डब्यात खडे घालून दळण आणण्यासाठी गिरणीत गेलो होतो.

आमच्या घरी एक मजबूत लाकडी स्टूल होतं. आईचं नॉव्हेलचं कपडे शिकायचं मशीन होतं. हे सारं तळेगावच्या घरी आणलं होतं. नॉर्टनची एक हिरव्या रंगाची सायकल होती. ही सायकल पुढे चोरीला गेली‌ रंगपंचमीच्या दिवशी एका औषधाच्या काचेच्या बाटलीच्या झाकणाला भोक पाडून आईने मला त्यात रंगीत पाणी भरून दिलं होतं. तेथील मुलांबरोबर मी रंगपंचमी खेळल्याचं मला आठवतं. तेथे भूषण नावाचा माझ्यापेक्षा मोठा मुलगा होता, तोसुद्धा मला आठवतो. एकदा दिवाळीमध्ये मला एक फुसका फटाका मिळाला. तो मी पणतीवर धरला. दादा खिडकीतून पाहत होता. हा फटाका चांगला होता. तो एकदम फुटला. सगळी घरं ओलांडून गेल्यावर दुसऱ्या टोकाला मागच्या बाजूस एक वाणी होता. त्याच्याकडून मी श्रीखंडाच्या वड्या आणलेल्या मला आठवतात. असो. या झाल्या माझ्या आठवणी. तळेगावला पाण्याचा त्रास होता. कावडवाला पाणी आणून द्यायचा. संडास खूप लांब होतं आणि संडासला जाण्यासाठी शेताडी तुडवीत जायला लागायचं. त्यामुळे रात्री संडासला जाणं त्रासदायक होतं. आम्हा लहान मुलांची सोय रस्त्याच्या कडेला होत असल्याने मी संडासपर्यंत गेलो नाही. अण्णांचं ऑफीसला जाणं खूप त्रासदायक होतं. तेव्हा गाड्याही खूप कमी होत्या. एकदा तर ते रात्री दोन वाजताच स्टेशनवर गेले आणि गाडीची चौकशी करू लागले. स्टेशनमास्तर म्हणाला, 'अजून रात्र आहे. आता झोपा स्टेशनवरच.' एकदा आमचे आजोबा (आईचे वडील) राहायला आले. अण्णांचे हाल बघून ते म्हणाले, ' तुम्ही सगळे महालात राहता‌. ते तिकडे हाल काढतात. ऑफीस जवळ जागा पहा.' पुढे १९६२ मध्ये भारत चीन युद्ध सुरू झालं. अण्णांना ओव्हरटाइम सुरू झाला. त्यामुळे खडकीला जायचं ठरलं. अण्णांचा नायडू नावाचा एक मित्र होता, त्याच्या गोपीचाळीतील जागेत पोट भाडेकरू म्हणून. निघताना दणाईत अण्णांना सांगत होते,' जागा सोडून पस्तावाल.' पुढे गोपीचाळीतील पाण्यावरून भांडणं, शेजाऱ्यांच्या त्रास बघून अण्णा वारंवार म्हणत 'तळेगाव सोडून पस्तावलो.' पुढे मी सी ए करीत असताना मला तळेगावचे एक गृहस्थ भेटले. मी त्यांना आम्ही पूर्वी तळेगावात राहत होतो, म्हणून सांगितलं. ते म्हणाले,' तुम्ही चांगला निर्णय घेतला. ऑफीसपासून इतक्या दूर राहण्यात काही अर्थ नाही.' नंतर आणखी एक मित्र भेटला. तो तळेगावात राहत होता. मी त्याला तळेगावच्या आठवणी सांगितल्या. तो म्हणाला, 'तसं काही आता राहिलं नाही. खूप रहदारी झाली आहे.' मी आजतागायत तळेगावला गेलो नाही. त्यामुळे माझ्या आठवणीत तेच तळेगाव आहे, जे ६०-६२ मध्ये होतं.


सिडनी , २ मार्च २०२४


खडकी-लष्करी महत्त्वाचे परंतु दुर्लक्षित गाव -१

पुण्याजवळ असणाऱ्या खडकी गावाबद्दल मला काही सांगायला सांगितलं, तर मी त्याचं वर्णन 'लष्करी महत्त्वाचे परंतु दुर्लक्षित गाव' असंच करीन. अण्णांच्या ५१२ वर्कशॉपमधील नोकरीमुळे आम्ही १९६२ ते १९८४ अशी तब्बल २२ वर्षं खडकीत राहिलो. आमचा खडकीच्या ज्या भागांशी संपर्क आला, त्यांची इथे थोडक्यात माहिती आणि माझ्या आठवणी देतो आहे.


खडकी कॅन्टोन्मेंट:- दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांबरोबर १८०२ मध्ये तैनाती फौजेचा तह करून आपल्या स्वातंत्र्यास तिलांजली दिली होती , तरी त्याचे बापू गोखलेसारखे शूर सेनापती हार मानायला तयार नव्हते. त्यामुळे जी काही अखेरची इंग्रज-मराठा युद्धे लढली गेली, त्यांतील एक लढाई १८१७ मध्ये खडकी येथे लढली गेली. या लढाईत इंग्रजांच्या तीन हजार सैन्यापुढे मराठ्यांच्या अठ्ठावीस हजार सैन्याचा पराभव झाला. या युद्धानंतर खडकीत ज्या भागात इंग्रजांच्या छावण्या होत्या, तो भाग खडकी कॅन्टोन्मेंट झाला. हा खडकीचा मोठा भाग आहे. या भागाच्या निवडणुकाही वेगळ्या होतात.

एल्फिन्स्टन रोड:-खडकीच्या लढाईतील इंग्रजांच्या विजयाचा शिल्पकार माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन याच्या नावे खडकीत एल्फिन्स्टन रोड हा महत्त्वाचा रस्ता होता. याच रस्त्याला किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनी होती. या रस्त्याचे नाव पुढे लक्ष्मणराव किर्लोस्कर पथ करण्यात आले. एल्फिन्स्टन रोड सीमेंट कॉंक्रीटचा होता. त्यावरून कधी रणगाडे गेल्याच्या खुणा होत्या. आमची आलेगावकर शाळा एल्फिन्स्टन रोडलाच होती. या एल्फिन्स्टन रोडला बरेच जुने बंगले होते. यातील एक बंगला भूत बंगला आहे अशी शाळेत चर्चा होत असे. शाळेच्या पुढे गेले की खडकी बाजार लागतो. एल्फिन्स्टन रोड पुढे पुणे स्टेशनला जातो.

आर्मी बेस:- ब्रिटिश काळापासून खडकी हा आर्मीचा बेस होता,  तो स्वातंत्र्यानंतरही राहिला. येथे ॲम्युनिशन फॅक्टरी, ऑर्डिनन्स फॅक्टरी, आर्सेनल, एच ई (हाय एक्स्प्लोझिव्ह ) फॅक्टरी, ५१२ आर्मी बेस वर्कशॉप अशी लष्कराशी संबंधित बरीच संस्थापने होती. 

खडकी स्टेशन ते खडकी बाजार (या रस्त्यास महात्मा गांधी रोड हे नाव होतं) जाताना उजव्या बाजूस नादुरुस्त रणगाड्यांचे मोठे गोदाम होते. येथे पहारा करणारे लष्करी जवान दिसत. एक टेहळणी केंद्रही होते. 

आम्हाला भूगोलाच्या पुस्तकात भौगोलिक ठिकाणांच्या प्रसिद्धीमध्ये 'खडकी-दारूगोळ्याचा कारखाना' असे होते. आम्हाला खोपकर नावाचे सर होते. ते म्हणत, 'भारत पाकिस्तान युद्ध झालं तर खडकी हे पाकिस्तानी विमानांचं लक्ष्य असेल.' आम्ही खडकीत असतानाच १९६५ आणि १९७१ ची भारत-पाकिस्तान युद्धे झाली. पण सुदैवाने म्हणा की आपल्या लष्कराच्या जागरुकतेमुळे म्हणा, तसा प्रसंग ओढवला नाही. पण एच ई फॅक्टरीतील अपघाती स्फोट मात्र माझ्या लक्षात आहे.

एच ई फॅक्टरीतील स्फोट:-  मी या घटनेविषयी निरनिराळ्या ब्राऊझरमध्ये सर्च केलं, परंतु या घटनेविषयी माहिती मिळाली नाही. ही १९७० सालची घटना आहे. कारण मी तेव्हा सातवीत होतो. संध्याकाळची वेळ होती. मी आणि दादा शाळेतून घरी पोहचत होतो. त्या वेळी एक प्रचंड मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. आम्ही मागे वळून पाहिलं तर आकाशात तांबट रंगाचा ज्वालामुखीतून बाहेर पडतो तसा फवारा निघून आकाशात ढग तयार झाला होता. तो बिलकुल हलत नव्हता. आम्ही लवकर घरी आलो. 

दुसऱ्या दिवशी सकाळमध्ये मुख्य मथळा होता,'खडकीच्या एच ई फॅक्टरी मध्ये भीषण स्फोट' आणि आम्ही आदल्या दिवशी पाहिलेल्या ढगाचा फोटो होता. तेव्हा पेपर एवढा तपशीलवार वाचत नव्हतो. पण तेथील फॅक्टरीतील गनपावडरच्या डब्यांचा स्फोट झाला होता. तोही संध्याकाळी. 

अण्णा असं म्हणाले की ते कामगार जे काम करीत होते, त्यामध्ये ते गॅस सिलिंडर्स वापरत होते. हे सिलिंडर्स थंड होण्यास वेळ द्यावा लागतो. पण घरी जाण्याच्या घाईमुळे हा वेळ दिला नाही. त्यामुळे सिलिंडर्सचा स्फोट झाला आणि त्यातून गनपावडरचा स्फोट झाला. या स्फोटातील कामगार वाचणं शक्यच नव्हतं. किती मनुष्यहानी झाली माहीत नाही.खडकी गावात विशेषतः पोलीस लाइनमधील घरांचं खूप नुकसान झालं.

माझ्या वर्गात साठे नावाचा मुलगा पोलीस लाइनीत राहणारा होता. नंतर  आम्हाला शाळेकडून सांगण्यात आलं की दुसऱ्या दिवशी घरून चपाती पेपरमध्ये बांधून घेऊन या. यांतून या अफेक्टेड मुलांना काही दिवस शाळेत जेवायला घालण्यात आलं.

सिडनी , २७/३/२०२४

खडकी-लष्करी महत्त्वाचे परंतु दुर्लक्षित गाव -२

खडकी स्टेशन:-पुणे स्टेशनहून गाडीने मुंबई कडे निघाल्यावर शिवाजीनगर स्टेशन गेले की खडकी. खडकी स्टेशनला बहुतेक सर्व गाड्या जाताना येताना थांबत. (फार पूर्वी डेक्कन क्वीनसुद्धा थांबत असे.) आमचे घर खडकी स्टेशनपासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर होते. त्यामुळे मुंबईला जाताना फार उपयोग होई. पुणे महानगरपालिकेची शहरी बससेवा पी एम टी भरवश्याची नसल्याने पुण्याला जाताना सुद्धा लोकल ट्रेनचा उपयोग होई.

खडकी स्टेशनसमोर जयहिंद चित्रपटगृह होते, जेथे चित्रपट पाहत आम्ही लहानाचे मोठे झालो. जवळच स्टार ऑफ इंडिया नावाचे इराण्याचे हॉटेल होते. 

खडकी स्टेशनपलिकडे गेल्यावर  रेंज हिल्स आणि औंध गाव या ठिकाणी जाता येई. या भागाशी आमचा फारसा संबंध आला नाही. 

खडकी स्टेशन पलीकडे गेल्यावर पुणे विद्यापीठ परिसरही लागत असे. (आता याचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ झाले आहे). पुणे विद्यापीठास फारच मोठा आणि निसर्गरम्य परिसर लाभला आहे. पुणे विद्यापीठात माझे कंपनी सेक्रेटरीच्या परीक्षेचे केंद्र असे.

बोपोडी नाका: दापोडीच्या दिशेने गेल्यावर बोपोडी लागते. येथे पूर्वी फार मोठा जकात नाका होता. त्यामुळे येथे ट्रक्सची फार मोठी लाईन लागत असे. बोपोडी नाक्यावर दूध सेंटर,  मटण मार्केट आणि भाजी मंडई होती. रेल्वे लाइन ओलांडून गेल्यावर बोपोडी गाव होते.  बोपोडी गावात नाईक चाळ होती. या चाळीचा गणपतीचा देखावा दर वर्षी बक्षीस घेऊन जाई. त्यामुळे नाईक चाळीचा गणपती पाहण्यापुरते आम्ही बोपोडी गावात जात असू. बोपोडी गावातच बोपोडी वॉर्डाचे नगरसेवक श्री. चंद्रकांत छाजेड राहत असत. हे कॉंग्रेस आय पक्षाचे होते. आमच्या आलेगावकर शाळेच्या शिक्षण समितीवरही होते. यांच्याविषयी माझा व्यक्तिशः चांगला अनुभव आहे. माझ्या सासूबाईंचा सुद्धा यांच्याविषयी चांगला अनुभव आहे.

खडकी गाव किंवा खडकी बाजार:- लक्ष्मणराव किर्लोस्कर पथाने आमच्या शाळेच्या पुढे गेल्यावर खडकी बाजारचा पी एम टी चा मोठा बस स्टॅंड होता. गावामध्ये सर्व प्रकारची दुकाने होती. आमच्या शाळेत दुकानदारांची मुलं बरीच होती. खडकी गावात आई-अण्णांबरोबर फिरायला आल्यावर हे मित्र दुकानातून हात करायचे. सात आणि दहा तारखेला खडकी गाव फिरण्यास योग्य नव्हता. कारण सात तारखेला ५१२ चा तर दहा तारखेला फॅक्टरीचा पगार होत असे. त्यामुळे मदिराभक्तांस रान मोकळे असे.

खडकी गावात भाजी मार्केट, मटण, चिकनची दुकाने होती. येथे भाजी स्वस्त मिळते म्हणून दादा अजूनही खडकी गावात जातो आणि येथील डेव्हलपमेंट्सची मला माहिती देतो्.

खडकी गावात एक्सेलसिअर हे चित्रपटगृह होतं. येथेसुद्धा आम्ही पुष्कळ चित्रपट पाहिले.  मॉडर्न कॅफे या उडपी रेस्तरॉंमध्ये राइस प्लेट, मसाला डोसा अशा पदार्थांचा आस्वाद घेण्यास भेट होई. सुदर्शन म्हणून एक छोटे हॉटेल होते, तेथे आम्ही फक्त गुलाबजाम खाण्यास जात असू.

खडकी गावात दादा आणि मी ज्ञानज्योती म्हणून वाचनालयात जात असू. पुढे ते वाचनालय बंद करून राजश्री म्हणून वाचनालयात जात असू. तेथून आणखी थोडे पुढे गेल्यावर एक सुंदर राममंदिर होते. आणखी पुढे गेल्यावर गाव संपून मुळा नदी शांतपणे वाहताना दिसे. नदीच्या काठी एक शिवमंदिर होते. नंतर त्या मंदिराच्या बाजूला साईबाबांचे मंदिर झाले. या साईबाबा मंदिरात आम्ही नियमित जात असू.

या बाबांच्या मंदिरातील माझा अनुभव सांगण्यासारखा आहे. मी सी ए एन्ट्रन्सची परीक्षा पास झालो होतो. तेव्हा बाबांच्या मंदिरात पेढे घेऊन गेलो. पुजाऱ्याकडे पेढे देऊन सांगितलं की ही फार अवघड परीक्षा असते. पुजारी एकदम सहजपणे म्हणाला, 'ते होणार , कारण ते बाबांच्या मनात आहे.' तेव्हा ही गोष्ट अशक्य कोटीतील वाटत होती, पण बाबांच्या कृपेने आज शक्य झाली आहे.

खडकी-लष्करी महत्त्वाचे परंतु दुर्लक्षित गाव -३

आलेगावकर शाळा:-खडकीमध्ये ही आमची शाळा होती. येथे प्राथमिक आणि माध्यमिक (११वी पर्यंत) अशा शाळा होत्या. प्राथमिक शाळा मुलामुलींसाठी एकत्र होती. माध्यमिक शाळा मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळ्या होत्या. मुलींच्या शाळेचे नाव गुलुबाई मुलुक इराणी कन्या शाळा होते. (या बाईंनी शाळेला देणगी दिली होती. त्यामुळे त्यांचे नाव शाळेला दिले होते.) शाळेची स्थापना आलेगावकर बंधूंनी केली होती. त्यामुळे शाळेचा स्थापना दिवस (मला वाटतं २३ जुलै) शाळेत साजरा केला जात असे आणि आलेगावकर बंधूंच्या कार्याविषयी माहिती दिली जात असे. आता येथे टिकाराम जगन्नाथ म्हणून कॉलेजही झाले आहे.

खडकीमध्ये इंग्रजी माध्यमासाठी सेंट जोसेफ म्हणून कॉन्व्हेन्ट शाळा होती. आमचे काही मित्र या शाळेत होते.

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड:- खडकी मध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड ही लक्ष्मणराव किर्लोस्कर पथावर तर खडकी स्टेशनच्या पलीकडे स्वस्तिक रबर ही कंपनी होती.

स्वस्तिकच्या चपला फार प्रसिध्द होत्या. एके काळी बाटापेक्षा लोक ही चप्पल मागून घ्यायचे. पण पुढे ही कंपनी बंद झाली.

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स ही कंपनी आमच्या शाळेच्या रस्त्यावर होती. पुढे चालत रेल्वे लाइन लागायची. या रेल्वे लाइनपर्यंत ही कंपनी पसरली होती. पुढे मला कंपनी सेक्रेटरी घ्या ट्रेनिंगसाठी जेव्हा कंपनी निवडावयाची होती, त्या वेळी मी या कंपनीची निवड केली. वास्तविक या वेळी आम्ही चिंचवडगावात राहायला गेलो होतो. त्यामुळे ट्रेनिंगसाठी खडकीला येणे सोयीस्कर नव्हते. परंतु शाळेत जात असल्यापासून जी कंपनी बाहेरून पाहत होतो, ती कंपनी कशी आहे ही पाहण्याची उत्सुकता होती.

कंपनीमध्ये शिरकाव केल्यावर ती बाहेरून जशी प्रशस्त वाटत होती, तशीच आतूनही होती. पण कंपनीतील लोकांचं म्हणणं होतं की नुसता पोकळ वासा आहे. बिझिनेस संपला आहे आणि एवढे लोक पोसणं कंपनीला शक्य होत नाही. 

माझं ट्रेनिंग संपत होतं त्याच दिवशी कंपनीचं वार्षिक उत्पादन लक्ष्य पूर्ण झाल्यामुळे समारंभासस आलेले शंतनुराव किर्लोस्कर आणि चंद्रकांत किर्लोस्कर पाहावयास मिळाले. चंद्रकांत किर्लोस्करांच्या पत्नी सुमनताई किर्लोस्कर यांच्या हस्ते गुणवंत कर्मचाऱ्यांना बक्षिसे देण्यात आली.

जयहिंद चित्रपटगृह: जयहिंद चित्रपटगृहाचा उल्लेख केल्याशिवाय खडकीतील वास्तव्याचे वर्णन पूर्ण होणार नाही. खडकी स्टेशनच्यासमोर या चित्रपटगृहांची  साधी परंतु भव्य इमारत डोळ्यांत भरत असे. चित्रपटगृहातील खुर्च्या लाकडी असल्या तरी बाल्कनी, बॉक्स या सोयी होत्या‌. 

संध्याकाळी सहाच्या खेळाला मी आणि दादा चार वाजता नंबर लावून बसत असू. गुलाबी पातळ कागदाच्या तिकीटांवर पेनने खुर्चीचे नंबर टाकून तिकीटे मिळाली की जग जिंकल्याचा आनंद होत असे. पाहिलेल्या चित्रपटांत पॅनिक इन बगदाद, बगदादका चोर असे अगाध चित्रपट असत. आजच्या मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात उजेड असतो. त्यामुळे चित्रपटाची मजा येत नाही. त्या वेळी दिवे गेले की बाजूला कोण बसलं आहे तेसुद्धा दिसत नसे. पडद्यावरील चित्रांना बांध लो उसे, मारो उस को, बघ रे तुझा बाप आला, असे इशारे देत चित्रपटाशी समरस होणारे प्रेक्षकही आता गेले.  

जयहिंद चित्रपटगृहाविषयी किती लिहिलं तरी ते कमीच पडेल. आता चित्रपटगृह पाडायला घेतलं आहे आणि अखेरच्या घटका मोजतं आहे. पण हे चित्रपटगृह कधीही स्मरणातून जाणार नाही.

खडकीने आम्हाला काय दिलं?- आता शेवटी या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलं तर काय सांगता येईल ? खडकी म्हणजे एक मिश्र वस्तीचे बकाल गाव. देशी दारूची दुकाने जागोजागी. सकाळ झाली की खडकी स्टेशनवरून सदरा, पायजमा , गांधी टोपी घातलेले कामगार गावात जाताना दिसत. तेच संध्याकाळी परत जाताना दिसत. खरं तर हे राहण्यायोग्य गावच नव्हतं. गोपीचाळीत आम्ही राहायला आलो ते 'इथे कुठे कायमचं राहायचं आहे' हा विचार करून. आणि त्याच दहा बाय दहाच्या जागेत आयुष्यातील महत्त्वाची बावीस वर्षे गेली. मग पावसात गळणारी कौले, घरात शिरणारे पाणी, खुडबुड करणारे उंदीर, गलिच्छ संडास हे दैनंदिन जीवन झालं.

पण मुलांसाठी जेथे आईवडील तेच तीर्थक्षेत्र असतं. चाळीतील मुलांशी आम्ही फारसे मिक्स अप झालो नाही. कारण एकदाच चाळीतील मुलांशी भांडण झाल्यावर आईने दाराला कडी घालून आम्हाला घरात बसवलं. मग तिथेच आम्ही खेळलो. कुमार, चांदोबा, इंद्रजाल कॉमिक्सची पारायणे केली. अशा जागेत किळस न करता आमचे मामा-मावश्या, आजी-आजोबा येऊन राहिले.

खडकीतील दुसरे तीर्थक्षेत्र म्हणजे आमची आलेगावकर शाळा. ही शाळा तशी लहान होती. पण या शाळेमुळे आम्हाला सारे मानसन्मान मिळाले. पुण्यातील मोठ्या शाळांत आम्हाला स्पर्धांसाठी नेलं. तेथील शिक्षकांनी अमोल ज्ञान दिलं.

लहानपणीचा काळ सर्वांत महत्त्वाचा असतो. त्यामुळे यापुढे कितीही घरांत राहिलो तरी आमच्या स्वप्नात कायम खडकीचे घरच येते. 







रविवार, १९ सप्टेंबर, २०२१

कौटुंबिक माहिती

 


कौटुंबिक माहिती 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

1. पंढरीनाथ- वडील, 2. दत्तात्रेय- आजोबा 

3. बळवंत- पणजोबा

1. ज्योत्स्ना- आई

 2. आनंदी- आजी

आईची आई - लक्ष्मी

गोत्र- सांख्यायन

नूतन 

बाबा- वसंत 

आजोबा- लक्ष्मण

पणजोबा- दत्तात्रेय

आई- पद्मा

आजी( वडिलांची आई)- वारूबाई

आजी (आईची आई)- लक्ष्मी

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

आईसाठी पान

आईसाठी पान 

आई 
स्व. ज्योत्स्ना पंढरीनाथ जुन्नरकर (माहेरचे नाव- सुमती शंकर राजे)
                                                (२६/५/१९२८-१७/१२/२००८)

जन्म आणि बालपण:

आई सातव्या महिन्यात जन्मली.सहावा पूर्ण होऊन एकच दिवस झाला आणि आईचा जन्म झाला. त्यावेळेस सहाव्या महिन्यात जन्मलेली मुलं जगत नसत. आईच्या आधी आजीला जुळे मुलगे झाले पण अपुऱ्या दिवसांचे झाले आणि गेले. त्यानंतर एक मुलगा झाला तोही तसाच अपुऱ्या दिवसांचा होता आणि गेला. मग आई झाली. आई खूप नाजूक होती. आमच्या आजीने (आईच्या आईने) आईची वर्षभर  जिवापाड काळजी घेतली. तिला अंगाला तेल  मालिश करून कापसात आणि सुती नऊवारी साडीत ऊब मिळावी म्हणून गुंडाळून ठेवी. तिने बाळसं धरेपर्यंत साधारण सात ते आठ महिने तिला अंघोळ घालत नसे. आईला भरभर चालता येत नसे. आजोबा तिला स्वयंपाकाव्यतिरिक्त कष्टाची कामं - भांडी घासणे, विहीरीचं पाणी काढणे, पाणी भरणे, कपडे  धुणे  वगैरे  करू  देत नसत.

आईकडे  पणजीच्या खूप आठवणी होत्या.  कुसुममावशी किंवा शालीमावशी झाली तेव्हा बहुतेक पणजी वारली. 

आईला घरकामाची खूप आवड होती. आजोबांच्या शर्ट, पॅन्ट, कोटाची निघालेली बटणं आई लावत असे, उसवलेले आजोबांचे कपडे आई रिपेअर करून देई. स्वैपाक नासधूस न करता निगुतीने आणि चविष्ट बनवी त्यामुळे आजोबा म्हणत, "ताई,  संसार छान करील".  आईला टापटीप आणि स्वच्छतेची आवड होती. बाकी सारी भावंडे  वेळ वाया  घालवीत  तेव्हा आई  ही  कामं करून नवीन गोष्टी  शिकायची. ती झाशीला स्वेटर विणायला खराट्याच्या काड्यांवर शिकली होती. क्रोशिया वर्क, भरतकाम पण ती असंच शिकली होती. घरातही ती कोणाच्या अध्यात-मध्यात नसायची.

आई सांगे, आजोबांचं इंग्लिश चांगल होतं. आजीच्या हातचं जेवायला आजोबांचे साहेब त्याच्या बायकोला घेऊन येत असे (बहुतेक नागपूर). आजी साहेबाच्या बायकोला संक्रांत आणि चैत्रगौरीच्या हळदकुंकवाला बोलवत असे. आजोबा त्याचं महत्त्व त्या लोकांना इंग्लिश मध्ये सांगत. आईचं शिवणकाम, विणकाम अतिशय छान होत. ती बदलीच्या ठिकाणी वेगवेगळ्या शेजार्यांकडून शिकली होती. मुंबईत आल्यावर तिने दादरला झारापकरचा शिवण क्लास लावून पूर्ण डिप्लोमा चांगल्या मार्कांनी पास केला होता.

शिक्षण:


आई  आठवीपर्यंत शिकली होती.  घरी आजीची (आईच्या आईची) बाळंतपणं असत. आई घरातली मोठी मुलगी त्यामुळे तिची आजी (आजोबांची आई) सतत आईला हाताशी घ्यायची,  आपल्या आजीच्या (आईची आई) बाळंतपणात. आपल्या आजीची अकरा बाळंतपण झाली. आईची आजी गेल्यावर आईच तिच्या आईचा घरकामात आधार झाली. वर्षाची वाळवणं मसाले आणि स्वैपाक. त्यामुळेच तिचं शिक्षणावरून लक्ष कमी झाले. त्यात आजोबांच्या बदल्या. आजी खूप नातेवाईक सांभाळत असे, तिच त्यांच्याकडे जाणंयेणं असे. (मुली अधिक असल्याने लग्नास स्थळं मिळवण्यात अडचण येऊ नये हा आजीचा उद्देश असे.) आई अशावेळेस आजोबांना आणि बाकी भावंडांना वेळेत स्वैपाक करून जेऊ घाली. 

ज्यांना कुसुमावती देशपांडेंनी शिकवलं ते सर आईला मराठी शिकवायला होते, अस आई कौतुकाने सांगत असे.  आईचा गळा गोड आणि पाठांतर चांगलं असल्याने ते तिला वर्गात कविता म्हणायला सांगत पण लाजेस्तव ती म्हणत नसे. आईचं अंकगणित चांगल होतं, मराठी चांगलं होतं. आईला इतिहास फार आवडत नसे, त्यावेळेस ब्रिटिश इतिहास असे आणि भूगोल तिचा  नावडता  विषय होता. 

आईने नववीची परीक्षा देऊ शकली नाही . कारण त्याच वेळेस आजोबांची बदली झाली. पुढे मुंबईत आल्यावर  दीदीमावशीने अकरावीचा फाॅर्म भरला पण आईचा शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने ती  फॉर्म  भरू शकली नाही. आईला रेशनिंग ऑफिसात क्लर्कची नोकरीमावशी मिळत होती पण आजोबांनी नोकरी करायला नकार दिला.


कवितांची आवड:

शालेय जीवनाबद्दल, शाळेतील शिक्षकांबद्दल आई खूप सांगत असे. आजोबा रेल्वेमध्ये नोकरी करत. त्यांची सतत बदली होत असे. बहुतेक लोक आपलं कुटुंब एका ठिकाणी स्थिर ठेवून बदलीच्या ठिकाणी एकटे जातात. परंतु आजोबा प्रत्येक ठिकाणी आपलं कुटुंब घेऊन जात. त्यामुळे आई सांगते की त्यांच्या शिक्षणाचे फार हाल झाले.

आईकडे प्रत्येक प्रसंगासाठी गाणं किंवा कविता लगेच तयार असे. कुणी आजारी पडलं की,

'पडु आजारी 

मौज हीच वाटे भारी'

आठवणीतल्या कविता संग्रहावरून कळते की ही कवितेचे कवी भानुदास हे आहेत. ही कविता खाली दिली आहे:

पडु आजारी

मौज हीच वाटे भारी


नकोच जाणे मग शाळेला

काम कुणी सांगेल न मजला

मऊ मऊ गादी निजावयाला

चैनच सारी... मौज हीच वाटे भारी


मिळेल सांजा, साबुदाणा,

खडिसाखर, मनुका, बेदाणा,

संत्री, साखर लिंबू आता

जा बाजारी... मौज हीच वाटे भारी


भवती भावंडांचा मेळा

दंगा थोडा जरि कुणि केला

मी कावुनि सांगेन तयाला

जा बाहेरी... मौज हीच वाटे भारी


कामे करतील सारे माझी

झटतिल ठेवायचा मज राजी

बसेल गोष्टी सांगत आजी

मज शेजारी... मौज हीच वाटे भारी

असले आजारीपण गोड

असूनि कण्हती का जन मूढ

म्हणून विचारी... मौज हीच वाटे भारी

शाळेत जावयास निघाले की,

'शाळेत रोज जाताना

मज विघ्ने येती नाना'

कधी कधी तर आम्ही वैतागून म्हणत असू, 'आईचं झालं गाणं सुरू.' 

यांतील बहुतेक कविता 'आठवणीतल्या कविता' या चार भागांच्या संग्रहात आहेत.


गणपती येणार असले की आईचं गाणं असे:

'बाबांच्या खांद्यावरुनी होउन आला स्वार'

आम्ही गणपती बसवला नाही. 'अण्णा म्हणत असत,'गणपतीचं सोवळं-ओवळं खूप कडक असतं. आपण असे घाणीत राहतो. त्यामुळे नकोच ते.' आई घरातलाच देवातील पितळेचा गणपती ताम्हनात ठेवून त्याची पूजा करीत असे व त्याला दूर्वा वाहत असे.

दिवाळी आली की आईचं गाणं असे. बहीण म्हणते-

'आली दिवाळी उद्या सकाळी

दादा तुला मी ओवाळणार

भाऊ तुला मी ओवाळणार'

भाऊबीजेला भाऊ गाणं म्हणतो,

'भाऊबीज बघ उद्या सकाळी 

तेल लावू मज न्हाऊ घाली

ताई छम छम छम '

१९४४ साली मुंबईच्या गोदीत मोठा स्फोट झाला होता. त्यावर आई गाणं म्हणत असे,

'एके दिवशी सायंकाळी महास्फोट झाला

हादरली मुंबापुरी सारी दुसऱ्या स्फोटाला'

आई आणखी एक कविता म्हणत असे. आठवणीतल्या कविता संग्रहावरून मला कळलं की ती कविता कवी गिरीश यांची होती. कवितेमध्ये एक लहान मुलगा आजारी असतो. त्यांचे आईवडील दूर गावी असतात. डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असतात. पण या प्रयत्नांना यश येत नाही. अखेर मुलगा सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करून सर्वांचा निरोप घेतो. आई ही कविता म्हणायला लागली की मी सांगत असे,'आई, ही कविता म्हणू नकोस.'

आईवरून 'प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधु आई' ही एक कविता आई म्हणत असे. ही कविता माधव ज्युलियन यांची आहे.

याशिवाय,

'शिकणे शिकणे किती आयुष्याची माती'

'पाच पानी विडा, लवंग वेलदोडा

झाली धोतराची उपरणी'

'बेइमान झालो पुरा पुरा

मी देशाचा अपराधि खरा'

'डावा डोळा लावतो माझा

भाऊ माझे स्मरण करी'

ही गाणी आई गुणगुणत असे.

'बेलाग दुर्ग जंजिरा वसईचा किल्लेवाला' ही एक कविता आई म्हणत असे. ही कविता कै. दु.आ.तिवारी यांची असून खालीलप्रमाणे आहे-

बेलाग दुर्ग जंजिरा वसईचा किल्ला असला
दुश्मन फिरंगी तिथला आटोपेना कोणाला
त्या सिंहाला पकडाया भारतीय चिमणा सजला
गोव्याचा टोपीवाला कोंकणचा पगडीवाला
लागली झुंज उभयाला बुद्धीचा डाव उडाला
मोहरा इरेला पडला ||१||

बोलावूनी सरदारांना तो समरधुरंधर बोले
शूरांनो वेढा द्याया चारमास होऊनी गेले
बेहीम्मत जे असतील परतोनी ते जातील
जा कळवा की दादाला 
मोहरा इरेला पडला ||२||

तोफेच्या तोंडी माथे बांधोनी उडवा हाथे
शीर तुटुनी त्या आघाते किल्ल्यात पडूद्या त्याते
ती निर्वाणीची वाणी डोळ्यास आणि पाणी
प्रत्येक वदे गहीवरुनी इर्षेस वीर हा चढला
मोहरा इरेला पडला ||३||

गोळ्यांच्या मार्याखाली चर खोदोनी रेतीत
उडविले सुरंगी बार तट लोळविला मातीत
गर्जना एकदम झाली पडलेल्या खिंडारात
जो बांध तटाचा फुटला तो सेनासागर सुटला
धैर्याचा किल्लेवाला बंदुकीस भाला भिडला
मोहरा इरेला पडला ||४||

मर्दच्या मराठी फौजा रणकीर्ती जणांच्या गाव्या
जणू घोंगावत मधमाश्या मोहोळाला बिलगाव्या
कडकडात वरुनी व्हावा सारखा अग्निवर्षावा
परी तो सिंहाचा छावा परतेना हिम्मतवाला
मोहरा इरेला पडला ||५||

वारावर करतची वार अनुसरले शूर पवार
शिंद्यांचा खांदा घोडा चालला जणू की तीर
बावटा धरुनी तोंडात भोसले चढे जोमात
आगीच्या वर्षावात सामना भयंकर झाला
मोहरा इरेला पडला ||६||

गरनाळी तोफा मोठ्या धुंकार कराया सजल्या
घायाळ धडाधड खाली तनु कितक्यांच्या धड्पडल्या
धातीचे निधडे वीर चिंध्यापरी त्यांच्या झाल्या
पगडीची फौज हटेना क्षत्रुची पकड सुटेना
तो विजयश्रीचा चिमणा बेहोष होऊनी लढला
शौर्याची शर्थ जहाली बावटा तटावर चढला
जयनादाने वसईचा दिग्प्रांत पहा दुमदुमला
तो समय आणि ती मूर्ती ठाके कवीनयनापुढती
मोहरा इरेला पडला ||७||

आणखी एक गोष्ट म्हणजे, आई सांगते की त्या वेळेला त्यांना प्रश्नांची उत्तरे श्लोकांचा स्वरूपात असत. एक उदाहरण मला आठवतं. 

१. बंगालच्या फाळणीची कारणे सांगा.
त्यावर श्लोकात उत्तर असे:
बंगालची फाळणी कर्झनाने
केली पहा खालिल कारणाने'
म्हणजे श्लोक पाठ केला की प्रश्नाचं उत्तर आलं. किती छान कल्पना आहे. 

आणखी एक मला असं जाणवतं की आजकाल लोक येता जाता मेकॉलेचा उद्धार करीत असतात. पण ही पाठ्यपुस्तके आजच्या पाठ्यपुस्तकांपेक्षाही उजवी वाटतात. 

माझ्या मावश्या, मामा, वडील याच अभ्यासक्रमात शिकले होते. पण त्यांच्याकडे असा ठेवा नव्हता. आम्ही मोठे झालो, अभ्यासाला लागलो, मग आईबरोबर संभाषण कमी झाले. आईचा  ठेवा किती अनमोल होता, ते आता कळते.

आवडीची गाणी:

मी एकदा आमच्या ऑफीसच्या मित्रांबरोबर पिकनिकला गेलो होतो. साहजिक गाणी म्हणण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मी काही मराठी गाणी म्हटली आणि सारे थक्क झाले. एकजण म्हणाला, 'साहेब, काय स्टॉक आहे हो तुमच्याकडे. ही कुठली गाणी? ' मी सांगितलं ,' ही गाणी माझी आई म्हणत असे.'

माझ्या आईचा आवाज चांगला होता. ती सतत गाणी गुणगुणत असे. मला आठवणारी गाणी खाली दिली आहेत. ही सर्व गाणी आठवणं शक्य नाही. जेवढी आठवतील तेवढी इथे देतो. पूर्ण गाणं दिल्याशिवाय त्याचे सौंदर्य कळणार नाही, म्हणून पूर्ण गाणी दिली आहेत.

मालती पांडे:

कुणीही पाय नका वाजवू

कुणीही पाय नका वाजवू,  
पाय नका वाजवू  
चाहुल देऊन नका कुणी ग चिमण्याला जागवू

नकोस चंद्रा येऊ पुढती, 
थांब जरासा क्षितिजावरती
चमचमणारे ते चंदेरी चाळ नको नादवू, 

पुष्करिणीतून गडे हळुहळु, 
जललहरी तू नको झुळुझुळु
नकोस वाऱ्या फुलवेलींना फुंकरिने  डोलवू

नकोस  मैने तोल सावरू,
नकोस कपिले अशी हंबरू 
यक्षपऱ्यांनो स्वप्नी नाचुन नीज नका चाळवू

जगावेगळा छंद ग याचा, 
पाळण्यातही खेळायाचा 
राजी नसता अखेर थकुनी पंख मिटे सावरू    

वळणावरुनी वळली गाडी

वळणावरुनी वळली गाडी आज सोडलं गाव 
तुझ्याच आई अश्रूसंगे पुसले पहिले नांव 
नवनावाचं लेवुनी कुंकू जाते माझ्या घरा 
वेडी माया झरते नयनीं भिजवित सारी धरा 
"सांभाळुन जा, सुखी रहा तू जातीस भरल्या घरा" 
बोलांतुन या भिजल्या आला धीर तुझ्या पांखरा 
पाखर आई तव मायेची उदंड लाभो मला 
जायाच्या ग अशाच लेकी तोडूनि ममता-लळा 
तूंच पाहुनी ठेव सुखाची दिलीस माझ्या करीं
तेज मुखावर बघशिल येता, भेटायाला घरी   

कशी रे तुला भेटू मला वाटे लाज

कशी रे तुला भेटू मला वाटे लाज
लौकिक तुझा मोठा आणिक घरंदाज 
करिती कुटाळकी तुझे ते टाळकरी
साथीला साथ देई घरची एकतारी
भोवती निंदकांचे वाजती पखवाज
ओळखते राया माझी मी पायरी
बोलतील तुझी सोयरी धायरी
जहरी बोलाचे हे जुळले तिरंदाज
होईल तेलवात स्नेहात आपोआप
जळेल जन्मोजन्मी प्रीतीचा नंदादीप
वयात यौवनाचा विखुरला साज   

लता मंगेशकर:

डोळे पाण्याने भरले 
तुझे डोळे पाण्याने भरले 
माझे डोळे पाण्याने भरले 

काळजातल्या रेशीमगाठी 
तोडित असता  दोघे मिळुनी 
गळ्यास मारुन आपुल्या मिठी 
प्रीत विचारी कळवळूनी 
'कसे कुणाचे सांगा चुकले 
सांगा चुकले'

अबोल आम्ही दोघे बघुनी 
प्रीत म्हणाली,'जात्ये सोडुनी 
अबोल आम्ही दोघे बघुनी 
प्रीत म्हणाली,'जात्ये सोडुनी 
तिला वंदण्या कर हे जुळले 
कर हे जुळले'

मने भंगली एक होऊनी 
धावु लागली तिच्या मागुनी
नकोस जाऊ म्हणता थबकुनी
गहिवरुनी ती म्हणता चुंबुनी
'झाले गेले, विसरा सगळे 
विसरा सगळे'

गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का ?

गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का ?
जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा

कडकडुनी तू मिठी मारता बाळे
बालपण आले आले घुमवित घुंगुरवाळे
आठवले सारे सारे गहिवरले डोळे 
कढ मायेचे तुला सांगती जा

दारात उभी राहिली खिलारी जोडी
बघ दीर धाकले बसले खोळंबुन गाडी
पूस ग डोळे या पदराने सावर ही साडी
रूपदर्पणी मला ठेवुनी जा

मोठ्यांची तू सून पाटलिण मानाची
हसले तुझे ग बिलवर लगीनचुडे
बघु नकोस मागे मागे लाडके बघ पुढे
नकोस विसरू परि आईला जा


घरात हसरे तारे असता 

घरात हसरे तारे असता 
मी पाहु कशाला नभाकडे

छकुल्यांची ग प्रशांत वदने
गोड गुलाबी गाली हसणे
अमृत त्यांच्या ओठी असता 
कशास मधुघट हवा गडे

गोजिरवाणी जशी वासरे
प्रेमळ माझी गुणी लेकरे
स्वर्ग अवतरे घरात माझ्या 
आनंदाचे पडती सडे

गोकुळ येथे गोविंदाचे 
झरे वाहती शांति सुखाचे
वैभव पाहून मम सदनीचे 
ढगाआड ग चंद्र दडे 

कल्पवृक्ष कन्येसाठी
कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला
वैभवाने बहरून आला याल का हो बघायाला ||ध्रु.||

तुम्ही गेला आणिक तुमच्या देवपण नावा आले
सप्तस्वर्ग चालत येता थोरपण तुमचे कळले
गंगेकाठी घर हे अपुले तीर्थक्षेत्र काशी झाले 
तुम्हावीण शोभा नाही वैभवाच्या देऊळाला || १ ||

सूर्य-चंद्र तुमचे डोळे दुरुनीच ते बघतात
कमी नाही आता काही, कृपादृष्टीची बरसात
पाच बोटे अमृताची पंचप्राण तुमचे त्यात
पाठीवरी फिरवा हात या हो बाबा एकच वेळा || २ ||

आशा भोसले 

पंढरीनाथा झडकरी आता 

 (या गाण्याची आई एक गंमत सांगत असे. अण्णांचं नाव 'पंढरीनाथ ' होतं. आईचं लग्न ठरलं तेव्हा कुणीतरी (मला नाव आठवत नाही ) आईला म्हणाले होते की ,' तुम्ही एक सारखे हे गाणे म्हणत असायचा, म्हणून तुम्हाला पंढरीनाथ मिळाले )

पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला विनविते रखुमाई विठ्ठला  || ध्रु.||

ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरी तुकयाचा

याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्तजनांचा 

भक्त थोर ते गेले निघुनी, गेला महिमा तव नामाचा
विक्रय चाले देवपणाचा, रहायचे मग इथे कशाला || १ ||

धरणे धरुनी भेटीसाठी पायरीला हरिजन मेळा
भाविक भोंदू पूजक म्हणती केवळ अमुचा देव उरला 

कलंक अपुल्या महानतेला बघवेना हो रखुमाईला
यायचे तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला || २ ||

शपथ तुला प्रेमा

शपथ तुला प्रेमा

नको त्या मंदिरात जाऊ  || ध्रु.||

यौवन मंदिर नाम तयाचे

मायावी हे कसब मयाचे

लोभस कपटी शोभा इथली

चुकुन नको पाहू  ||१||

दिसते तैसे येथे नाही 

आसन दिसते तेथे खाई

अपघाती या सोपानावर

पाय नको ठेवू || २ ||

या,  या म्हणती जरी युवराजे

हसूच करतील तुझे न् माझे

बाळपणाच्या झोपडीत ये

जन्मभरी राहू || २ ||

सुमन कल्याणपूर 

लिंबलोण उतरू कशी

लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू

इथून दृष्ट काढिते, निमिष एक थांब तू || ध्रु.||

एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका

तूच दुख:सागरी उभविलीस द्वारका

सर्वभार घेतला समर्थ असा खांब तू || १ ||

धन्य कूस आईची धन्य कान-लोचने

कृतार्थ जन्म जाहला फिटून जाय पारणे

अनंत कष्ट सोसले फेडिलेस पांग तू || २ ||

शीणभाग संपला तृप्त माय जीवनी 

आयु उर्वरित ते सुरेल ईश चिंतनी

लाभले न जे कुणा असे सुदैव भोग तू || ३ ||

गजानन वाटवे 


फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोले

फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोले
पंचमीचा सण आला, डोळे माझे ओले
श्रावणाच्या शिरव्यांनी आनंदली धराराणी
माझे पण प्राणनाथ घरी नाही आले
जळ भरे पानोपानी संतोषली वनराणी
खळाखळा वाहतात धुंद नदीनाले
पागोळ्या गळतात, बुडबुडे पळतात
भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले
आरशात माझी मला पाहू बाई किती वेळा
वळचणीची पाल काही भलेबुरे बोले

बाबुराव गोखले 

का नाही हसला नुसते, मी नाही म्हटले नसते

का नाही हसला नुसते, मी नाही म्हटले नसते 
जडलेहि कदाचित असते आपुलेच अवचित नाते || ध्रु.||
सज्जात उभी मी होते, रस्त्यात पाहिले तूते
डोळ्यांनी सांगत होते, का नाही ओळखले ते
मश्गूल तुझे मन होते कीर्तीला जिंकायाते
परि तुजला जिंकायाते अंतरी झुरत मी होते || १ ||
मी होउन पुसले असते, तू नाही म्हटले असते
त्या पराभवाचे पाते काळजात घुसले असते
तू वरिले दुसऱ्या स्त्रीते, मज दिले दुज्या पुरुषाते
दु:खात सुख परि इतुके, हे कुणास कळले नव्हते || २ ||

 बबनराव नावडीकर 

कुणी आलं कुणी आलं, जीवाला वेड लावून गेलं 
कुणी आलं कुणी आलं, जीवाला वेड लावून गेलं 

नाही ठाऊक नांव नाही माहीत गाव
मला पाहून उगीच हंसलं, उगीच हसलं, उगीच हसलं

होते आंबेवनात गीत मजेत गात 
तोच पाल्यांत पाऊल वाजलं, पाऊल वाजलं, पाऊल वाजलं

गोड सकाळचा पार वारं झुळुझुळु गार
फूल उंबराचं अवचित फुललं, अवचित फुललं, अवचित फुललं

गाणं राहिलं गळ्यांत दृष्टी फिरली मळ्यांत 
टोंक फेट्याचं पिकात लपलं, पिकात लपलं, पिकात लपलं

त्याच्या नजरेची धार भेदी जीवास पार 
त्यानं चोरून काळीज नेलं, काळीज नेलं, काळीज नेलं 

आर. एन. पराडकर 


गुरुदत्त पाहिले कृष्णातिरी 

गुरुदत्त पाहिले कृष्णातिरी

शतदीप उजळले माझ्या उरी


चरण क्षाळिते कृष्णामाई
छत्र तरूची शीतल राई
गोड आरती खगगण गाती
भुलली स्वर्गपुरी !

यतिवेषे गुरुमूर्ती शोभली
अपार करुणा हृदयी भरली 
सूर्य चंद्रमा नयनी, वदनी 
शांतिसुमे साजिरी !!

प्रभूरायाची शुभद पाऊले
सेवाया सुर भूवर आले
माझ्या नयनांमधुनी झरती
प्रेमाश्रूंच्या सरी !!! 

आईचे भक्तिजीवन


नित्यपाठ आणि उपासना :

सकाळी स्नान झाले की आई  मनोबोधाच्या आरतीमधील खालील ओळी म्हणत असे:-


वेदांचे जे गुह्य शास्त्रांचे जे सार

प्राकृत शब्दांमाजी केला हा विस्तार


यापुढील ओळी मी कधी ऐकल्या नाहीत.


नंतर हा श्लोक म्हणत असे:


शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, 

वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, 

कवी वाल्मीकासारिखा मान्य ऐसा, 

नमस्कार माझा सद्गुरू रामदासा


शिवाय खालील श्लोक आई म्हणत असे:


मना तुला हे ब्रीद सांगतो समर्थ ग्रंथीचे 

ग्रंथराज भावार्थहि असा वदती गुरु वाचे

अनंत भावे स्मरण करोनी श्रीगुरुचरणांचे

तरीच जन्मा येउन केले सार्थक देहाचे

गुरुचरणाची गोडी तुजला किती सांगु वाचे

सेवक किंकर स्वच्छंदाने गुरुपुढती नाचे


हे सारे श्लोक समर्थ रामदासांशी संबंधित आहेत. हे श्लोक आई का म्हणत असे, कुणास ठाऊक.


कधीकधी घरात खूप अडचण, अर्थात पैशाची, आई खालील भजन म्हणत असे-

हा नको नको संसार, शिरावर भार

जाउनिया पंढरपुरी, रहावे सोडुनीया घरदार


खालील श्लोक मी आईच्या तोंडून ऐकले आहेत-


१. रामा तुझे कोमल नाम घेता

संतोष वाटे बहु फार चित्ता

बापा दयाळा मज भेट द्यावी

दारिद्र्यचिंता अवघी हरावी


२. श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा

ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा

नेत्री न ये रे तुजवीण निद्रा

कै भेटसी बा मजला समुद्रा


३. गणपति म्हणे वरेणियांनो

दुष्टांच्या संगती न लागावे

ज्याला मोक्षपदाची आवड

त्याने सदा मला गावे

आईला इतर कुठली उपासना, व्रत वैकल्ये करताना मी पाहिले नाही. आम्हाला जी काही स्तोत्रे शिकवली, ती अण्णांनी शिकवली. माझी बहीण शामा सांगते की आई तिला रामनाम घेण्यास सांगत असे. 

आईला कर्मकांड आवडत नसे आणि बुवाबाजीची तिला फार चीड होती. अण्णांचा धार्मिकतेकडे ओढा होता. त्यावर ती अंकुश ठेवून होती. धार्मिकतेच्या आहारी जाऊन अण्णा संसाराकडे दुर्लक्ष करतील अशी भीती तिला होती.

घरी काही सणवार असला आणि देवाला नैवेद्य दाखवायला सांगताना ती नेहमी म्हणत असे,' माझ्या मुलांच्या मुखाला लागलं की ते देवाला आपोआप मिळालं.'

शिरडीच्या साईबाबांवर श्रद्धा:

आईची साईबाबांवर खूप श्रद्धा होती. आमच्या घरी शिरडीहूनच आणलेला साईबाबांच्या मूळ मूर्तीचा एक फोटो होता. आई आम्हाला नेहमी सांगत असे, शिर्डीला बाबांचं मोठं मंदिर आहे. आपण एकदा शिर्डीला जाऊ. (पुढे आम्हाला शिर्डीला प्रथम नेलं ते रमेश मामाने.)

खडकी बाजारातील साईबाबांच्या देवळात जायला तिला आवडे. पण कुठलाही नियम किंवा पूजापाठ असा तिने कधी केला नाही.

आई तिच्या लहानपणीचा एक अनुभव नेहमी सांगत असे. 

एकदा तिच्या हाताला खूप सूज आली होती. रात्री तिला एक स्वप्न पडलं. स्वप्नात बाबांचे एक देऊळ होते आणि देवळात बाबा स्वत: होते. बाबांनी आईला समोरच्या झाडाचे फळ खाण्यास सांगितले.

आई म्हणाली, 'इतक्या वर फांदीपर्यंत माझा हात कसा जाईल? ' परंतु खरोखरच फांदीजवळ जाताच फांदी आपोआप खाली आली आणि आईने फांदीचे फळ तोडून खाल्ले. 

बाबांनी नंतर आरती करण्यास सांगितले.आई आरतीसाठी निरांजन शोधू लागली. परंतु बाबा म्हणाले,'माझ्या आरतीसाठी निरांजन लागत नाही. तेथील पणती घे.'

आईने पणती घेऊन बाबांची आरती केली आणि स्वप्न मोडले. त्यानंतर हाताची सूज उतरली.

माझ्या लहानपणीचा एक किस्सा आईने सांगितला. मला खूप ताप आला होता. रात्रीची वेळ होती. आई जागी होती. तिला झोप येऊ लागली. अचानक तिला बाबांचा दृष्टांत झाला,'झोपू नकोस, जागी रहा.' आई त्याप्रमाणे जागत राहिली. पहाटेपर्यंत माझा ताप उतरला.

मी मोठा झाल्यानंतर  एकदा अडचणीत असताना आईने बाबांना सांगण्यास सांगितले.  मी आईला म्हणालो ,' आपली कामं आपण करायची सवय ठेवली पाहिजे. प्रत्येक बाबतीत देवाला वेठीला धरणं बरोबर नाही ‌' 

यावर आईने  उत्तर दिलं,' आपलं काम आपल्यालाच करायचं आहे, पण थोडा भार बाबांवर टाकावा.'

मला वाटतं, साईभक्तीचं मर्म आईला कळलं होतं.

छंद आणि आवडीनिवडी:

रांगोळी:

आईला रांगोळी काढण्याची खूप आवड होती. दारात सडा घातला की रांगोळी काढण्याची पद्धत होती. रांगोळीमध्ये आई  इतर डिझाइन्समध्ये  कासव काढत असे.  

मुख्य रांगोळी काढणं होत असे दिवाळीत. दिवाळीचे चार दिवस रोज वेगवेगळी  रांगोळी काढण्याचा उत्साह असे. दिवाळीतच रांगोळीत रंग भरले जात. मोठ्या रांगोळीमध्ये सात कासवांची रांगोळी असे. या रांगोळीमध्ये मधल्या जास्तीत जास्त ठिपक्यांच्या ओळीत ३७ ठिपके असत. 

एका रांगोळी स्पर्धेत आईला पहिले बक्षीस मिळाले होते. हा  गालीचा आई नेहमी काढत असे. जसा आठवेल तसा खाली दिला आहे:


आईबरोबर रांगोळी काढताना आम्ही मुलं मदतीला बसत असू. आईबरोबर रांगोळी काढता काढता ही कला पुढे मी आत्मसात केली आणि रांगोळी मी काढू लागलो. 

चित्रकला:


आईची  चित्रकलाही चांगली होती. अंगणात दाणे टिपणाऱ्या चिमण्या पाहून तिने चित्र काढून त्याच उशीच्या अभ्र्यावर भरतकाम केलं होतं.

विणकाम, शिवण, भरतकाम वगैरे:

आम्ही तळेगावमध्ये असताना (साल १९६१-६२) आईने नॉव्हेल कंपनीचे सुईंग मशीन घेतले. घरातले शिवणकाम, तसेच छोटीमोठी शिवणाची कामे करून पैसे कमवण्याचा तिचा विचार होता. १९६२ मध्ये आम्ही खडकीला शिफ्ट झाल्यावर हे शिवणयंत्रही खडकीला आणले. तिथे तिने थोडंफार शिवणकाम केलं. पण चाळीतील वस्ती असा काही व्यवसाय करण्यास पोषक नव्हती. त्यामुळे या शिवणयंत्राचा पुढे काही उपयोग झाला नाही. एका खोलीमध्ये या शिवणयंत्राची फक्त अडगळ झाली होती आणि त्याचा उपयोग फक्त सामान ठेवण्यासाठी होता. पण आईची या शिवणयंत्राला फार अटॅचमेंट होती. १९८३ मध्ये आम्ही चिंवडगावात शिफ्ट झालो, तेव्हा हे शिवणयंत्रही बरोबर नेलं. तिथे केव्हातरी ते डिस्पोज केलं.

आई स्वेटरही विणत असे. मी तिसरीत असताना आईने मला हिरव्या रंगाचा फुलपाखराची वीण असलेला स्वेटर विणून दिला होता.

आईकडे भरतकामाची रिंग होती. आई उश्यांचे अभ्रे वगैरे असे किरकोळ भरतकाम करीत असे. आईकडे एक क्रोश्याची सुईसुद्धा होती.

टाकाऊतून टिकाऊ:

टाकाऊ गोष्टींतून टिकाऊ गोष्टी बनवण्याचा आईला छंद होता. प्रत्येक गोष्टीमध्ये तिला एक उपयुक्त वस्तू दिसे. सारे जुने कपडे एकत्र करून त्यांची ती गोधडी शिवत असे. या कामात आम्हीसुद्धा आईला मदत करीत असू. मे महिन्यात आमची मावसभावंडे सुधीर, सुशील कधी कधी राहायला येत आणि या कामात मदत करीत. 'पुढच्या वेळी आलो, की मी शिवलेली गोधडी मला पाहिजे,' असे सुशील सांगून जाई. 

कुठेतरी पडलेल्या चिंध्या वगैरे गोळा करून त्यापासून सॉफ्ट टॉइज बनवी. माझ्या मुलाला अद्वैताचा तिने असेच एक मांजर बनवून दिले होते. त्याला तो माऊ म्हणत असे. एकदा में महिन्यात आम्ही पुण्याला चाललो होतो. (तेव्हा आम्ही मिरा रोडला राहत होतो). तेव्हा अद्वैतने भोकाड पसरलं की, 'माऊला सुद्धा बरोबर न्यायचं.'

कुठे उपयुक्त काही वाचनात आलं की ती कात्रण काढीत असे, वहीत चिकटवून ठेवीत असे. त्या वेळी गृहलक्ष्मी, माहेर अशी मासिकं होती. मला त्यांतून एखादी पाकक्रिया उतरून घेण्यास सांगत असे. पूर्वी सकाळमध्ये येणाऱ्या चिंटूच्या कॉमिक स्ट्रिप्स प्रसिद्ध होत्या. त्यांची तिने कात्रणवही बनवून अद्वैतच्या नावाने सकाळला पाठवून दिली होती. आम्ही आईबरोबर पत्तेसुद्धा खेळत असू. आई आणि अण्णा अद्वैतबरोबर पत्ते खेळत असत.

हीच गोष्ट खाद्यपदार्थांच्या बाबतीत. शिळा पदार्थ राहिला की त्यापासून ती काहीतरी वेगळा पदार्थ बनवीत असे. आई तिच्या लहानपणीची एक आठवण सांगतो असे. एकदा रात्रीचे शिळे वर्ण राहिले होते. आईने त्यातील पाणी काढून टाकले आणि त्याची भजी बनवली. सर्वांनी भजी आवडीने खाल्ल्यावर आईने सांगितलं की ही भजी शिळ्या वरणाची होती. तेव्हा सर्वांना वाटलं‌ की 'अरे, आधी कळलं असतं तर खाल्ली नसती.'

प्राणी पाळण्याची आवड:

आईला पाळीव प्राण्यांची फार आवड होती. आम्ही खडकीला असताना जवळ जवळ सगळे प्राणी पाळून झाले.

कोंबड्या:
चाळीमध्ये बऱ्याच जणांनी कोंबड्या पाळल्या होत्या. त्यामुळे आईलासुद्धा कोंबड्या पाळण्याची कल्पना सुचली. प्रथम दोन कोंबड्या आणल्या. आमच्या बाजूला असणाऱ्या दुसऱ्या गोपीचाळीत एक बोहरी मुसलमान बाई राहत होत्या. त्यांच्या मोठ्या मुलाला सारे बाबू म्हणत. त्यामुळे आई त्यांना बाबूच्या आई म्हणत असे. कुक्कुटपालनात बाबूच्या आई मुख्य सल्लागार होत्या. त्यांनी सांगितले की कोंबड्यांना तुमच्या घराची सवय व्हावी म्हणून दोन्ही कोंबड्यांना थोडा वेळ दारात बांधून ठेवा. त्याप्रमाणे दोन्ही कोंबड्यांच्या एकेका पायाला लांब दोऱ्या बांधून ठेवल्या. त्याच दिवशी माझा एक वर्गमित्र घरी येऊन गेला, जेव्हा मी घरी नव्हतो. दुसऱ्या दिवशी तो मला वर्गात विचारत होता, 'तुम्ही कोंबड्या पाळल्या आहेत ना? तुमच्या दारात दोन कोंबड्या बांधल्या होत्या.' मी म्हटलं, ' त्या आमच्या दारात नसतील. तुझी पाहण्यात चूक झाली असेल' आणि जास्त वाच्यता होऊ दिली नाही. नाहीतर वर्गात माझी फजिती झाली असती.

या दोन कोंबड्यांपैकी एक पांढरी होती तर दुसरी काळी पण पिकांवर पांढरे ठिपके असलेली होती. या पांढऱ्या कोंबडीला रोग झाला आणि ती मरण पावली. या रोगाचे लक्षण म्हणजे कोंबडीला हिरव्या रंगाची शौच  होई.  कोंबड्यांचा मृत्यू पाहणे अतिशय क्लेशदायक असे. बहुधा रात्रीच्या वेळीच त्यांना अटॅक येई. त्या खूप फडफड करून मान वाकडी करून प्राण सोडत.

साधारण वीस-एकवीस दिवस अंडी देऊन झाली की कोंबडी त्या काळात श्रमाने खुडूक बसे, म्हणजे नुसती बसून राही. याच काळात तिला अंड्यांवर बसवून पिलं होतात. काळ्या कोंबडीला आईने  जयाच्या आई म्हणून एका शेजारणीला मान देऊन तिच्या शुभ हस्ते अंड्यांवर बसवले. एकवीस दिवसांनी सात पिले झाली. त्यांतील चार कोंबडे होते तर तीन कोंबड्या होत्या. एक कोंबडी कासवासारखी दिसायची , म्हणून तिचं नाव कासवी ठेवलं. दुसरी डार्क काळी होती, ती पकपक असं ओरडायची, म्हणून  तिचं नाव पकपक ठेवलं. तिसरी पांढऱ्या रंगाची होती, म्हणून तिला नुसतंच पांढरी कोंबडी म्हणत असू. कोंबड्यांपैकी एक तांबूस रंगाचा होता, त्यामुळे त्याला तामस्या नाव ठेवलं. दुसऱ्याच्या पाठीवर काळा डाग होता, म्हणून त्याला काळा डाग नाव दिलं. तिसऱ्याच्या पाठीवर लाल गंध टाकून लालू तर चौथ्याच्या पाठीवर निळी शाई टाकून त्याला निळू नाव दिलं.

पिलं असताना कोंबडी फार आक्रमक होते आणि कोणी आपल्या पिलांना काही त्रास देतं का यावर लक्ष ठेवून असते. आमची कोंबडी फारच आक्रमक होती आणि बहुतेकांनी तिचा धसका घेतला होता. कोंबडी सतत पिलांना बरोबर घेऊन फिरते आणि पिलंही आईबरोबर राहतात. पहिलं मोठी झाली की स्वतंत्र होतात आणि मग आई म्हणजे त्यांना इतर कोंबड्यांसारखी एक. तीच गोष्ट आईच्या बाबतीतही.

एकदा सकाळी लालू आम्हाला जमीनीवर पडलेल्या स्थितीत आढळला. तो चालू शकत नव्हता. कुणीतरी सांगितलं की त्याच्या पायांवर सायकल गेली. पण ते खरं वाटत नाही. चाळीतील लोकांचे आमच्याशी चांगले संबंध नव्हते. कुणीतरी त्याच्या पायांवर काहीतरी मारून त्याला पांगळा केलं असावं. त्याला घरी आणून आम्ही टोपलीत ठेवलं. तो खाऊन तेथेच शौच करीत असे. त्यांचे ते हाल बघवेनात. त्यामुळे अखेर त्याला कापण्याचा निर्णय घेतला. ही कामगिरी बाबूच्या वडिलांनी पार पाडली. त्यांना थोडे मांस देऊन बाकी आमच्याकडे आणलं. आम्हाला खूप वाईट वाटलं आम्ही ते खाऊ शकलो नाही.

कोंबड्या दिवसभर बाहेर चरायला जायच्या आणि रात्री घरी यायच्या. त्यामुळे कुठे बाहेर जायचं असलं की कोंबड्यांना शोधून घरी आणून झाकून ठेवायला लागायचं.

पुढे काही कोंबडे विकले. कोंबड्या अंड्यांसाठी ठेवल्या. कोंबड्या असताना त्यांच्या अंड्यांपासून थोडेफार पैसे मिळत. एका अंड्याचे तेव्हा चार आणे म्हणजे पंचवीस पैसे मिळत. नंतर कोंबड्या पाळल्या नाहीत.

मांजर:
आमच्या घरी एक मांजर येऊन बसत असे. तिला आश्रय देणं महागात पडलं कारण ही मांजर व्याली आणि तिला तीन पिलं झाली. सुरुवातीला ही पिलं अगदी उंदराच्या आकाराची होती. पण ही पिल्लं मोठी होऊ लागली, तशी आम्हाला काळजी पडली की या पिलांच्या मांजरी झाल्यावर एवढ्या मांजरी कशा सांभाळणार. एका शेजारणीने एक पिलू घेण्याची तयारी दाखवली. त्याप्रमाणे एक पिलू तिला दिले. तेव्हा बाकी दोन पिले फार अस्वस्थ झाली आणि शामाच्या (बहिणीच्या) परकराला ओढून तिला त्या शेजारणीच्या घरी चलण्यास सांगू लागले. शेजारीणसुद्धा म्हणाली की पिलू अजून रुळलं नाही , थोडा वेळ तुमच्याच घरी असू द्या. म्हणून ते पिलू पुन्हा घरी आणलं. त्यावेळी त्याच्या डोळ्यांत अगदी माणसासारखे अश्रू होते. पण थोड्या वेळाने ते पिलू आम्ही परत नेऊन दिलं.

इतर दोन पिकांमध्ये एक तांबूस रंगाचे आणि दुसरे अशासारखे पांढऱ्या रंगाचे होते. दोघाची सतत मस्ती चालत असे. एकमेकांना पुढच्या दोन पायांनी पाडून दुसऱ्याच्या पोटात मागच्या दोन पायांनी लाथा मारत. आपण बाजूला उभे असलो की मान वर करून तोंडाकडे पाहत. 

यांतील तांबूस पिलू पुढे काही कारणाने मरण पावलं. पांढऱ्या पिलाला पायाजवळ काही कारणाने जखम झाली आणि ती चिघळत गेली. एके दिवशी पहाटे त्याचा प्राण गेला. दादा (मोठा भाऊ ) असं सांगतो की त्या दिवशी पहाटे ती मांजर  (या पिल्लांची आई, आम्ही नंतर हिला बाहेर ठेवलं होतं) दारावर जोरात धडका मारत होती.

कोंबडा: 
एकदा असाच कुणाचा तरी कोंबडा आमच्या दाराशी आला. ज्याचा कोंबडा होता, तो न्यायला येईल, म्हणून आम्ही थोडे दिवस वाट पाहिली. कुणी न्यायला तर आले नाहीच, पण आमच्याकडे तो कोंबडा पाहून सारे त्याला आमचा कोंबडा समजू लागले. त्याचं नाव 'बल्लू' ठेवलं. याला कणिक भिजवून तिचे तुकडे आम्ही खायला घालत. हातात कणिक पाहिली की बल्लू दुरूनच आपले पोट हलवीत दुडू दुडू धावत यायचा. बल्लू थोडा विक्षिप्त होता. कारण अचानक धावत येऊन कुणाच्याही पायाच्या अंगठ्यावर चोच मारीत असे. त्यामुळे पाहुण्यांनाही पाय सांभाळायला सांगावे लागत असे.

कुत्रा:
कुत्रा पाळला तेव्हा सचिन (धाकटा भाऊ) लहान होता. त्यालाच कुत्र्याचा जास्त लळा होता आणि तोच त्याची काळजी घेत असे. तो कुत्र्याला मोती म्हणत असे.

पोपट:
ही आईने सांगितलेली हकीकत आहे. एकदा दाराशी एक भिकारीण आली होती. तिच्याबरोबर तिचा लहान मुलगा होता आणि त्याच्या हातात एक पोपटाचा पिंजरा होता. तिने पोपट घ्यायचा का, म्हणून विचारलं. आईला घ्यायचा नव्हता, म्हणून आईने 'दे पाच रुपयाला' म्हणून सांगितलं. त्या भिकारणीने तो पिंजऱ्यासकट पोपट लगेच पाच रुपयाला देऊन टाकला. आईने विचारलं की तुझ्या मुलाला एवढी आवड आहे, तर कशाला देतेस? त्यावर त्या भिकारणीने उत्तर दिलं की आम्हालाच खायला नाही तिथे आम्ही काय या पोपटाला खायला घालणार? त्याला जर चांगलं घर मिळालं तर त्याचं तरी चांगलं होईल.

अशा प्रकारे पोपट आमच्या घरी आला. पोपटाला मिरची, डाळ असे पदार्थ आवडतात. पण या पोपटाला आम्ही खाऊ तेच लागायचं. ताटात खायला घेतलं की तो दांडीवर नाचायला लागायचा. त्याला आमटीत चपाती बुडवून दिली की तो डोळे फिरवून आनंददर्शक विशिष्ट शिट्टी वाजवून खुषीत खायचा. त्याला गोड शिराही आवडत असे. हा पोपट आईवर एकसारखी नजर ठेवून असायचा. आई जरा नजरेआड झाली की पिंजऱ्याच्या जगाला पकडून जिवाच्या आकांताने टाहो फोडायचा. त्याला मोकळा सोडल्यावर तो इथे तिथे फिरत असे. कारण त्याला उडता येत नसे. आम्ही एकदा मुंबईला गेलो तेव्हा मी पोपटाला माझ्या एका मित्राकडे ठेवला होता. पण नंतर आम्ही त्याला पिंजऱ्यातच खायला ठेवून घरातच ठेवून जात असू. तोही शांतपणे पिंजऱ्यात बसून राहत असे.

या पोपटाने आमच्या घरातील खूप चढउतार पाहिले. कारण आमच्या घरातील मुख्य चढउतार १९८१-९० या दशकातच झाले. हा पोपट घरी आला तेव्हा मी सी. ए. करीत होतो, म्हणजे १९८०-८१ साल असेल. नंतर मी सी. ए. झालो, अण्णा निवृत्त झाले,  दादाला नोकरी लागली, आम्ही चिंचवडगावच्या जागेत राहायला आलो वगैरे.  नंतर मी चिंचवड स्टेशनला जागा घेतली. दादा, शामा, मी अशी आमची लग्नं झाली. नंतर आई-अण्णा पुन्हा खडकीच्या जागेत राहायला गेले, तेव्हा पोपट त्यांनी बरोबरच नेला.

या पोपटाचा शेवट मात्र काळजाला चटका लावणारा झाला. अण्णांनी पिंजरा धुवून पोपटाला अंघोळ घातली . अशा वेळी तो ओल्या अंगाने पिंजऱ्यात येऊन बसायचा. त्याच वेळी कुठून तरी एक बोका आला आणि एक झडप घालून पोपटाला खलास केला. त्याने शेवटची हृदयद्रावक किंचाळी फोडली. ही तारीख १५ सप्टेंबर, म्हणजे दादाचा वाढदिवस होता, एवढं मला आठवतं. साल १९८९ असावं, कारण माझं लग्न १९८९ साली झालं आणि आई-अण्णा याच सुमाराला खडकीला राहायला आले.

प्राणी पाळायला घेतले की ते आपल्या घराचे सदस्य होतात. त्यांना जीव लावल्यावर  त्यामुळे त्यांचे मृत्यू पाहणं आणि स्वीकारणं फार क्लेशदायक असतं. ज्यांनी प्राणी पाळले आहेत, त्यांना याचा अनुभव असतो.

लहान मुलांची आवड:

आईला लहान मुलांची खूप आवड होती. लहान मुलांना गोळा करून गप्पागोष्टी , गाणी-कविता, विनोद सांगणे, पत्ते खेळणे तिला आवडत असे. यामुळे नातवंडांत ती चांगली मिसळत असे.

खाणे-पिणे:

आईला फळांमध्ये पपई आवडत असे. लोणच्यांमध्ये तिला लिंबाचं लोणचं आवडत असे.

हास्यविनोद:
आईला विनोदाची खूप आवड होती. साध्या साध्या गोष्टींवर तिला खूप हसू येई. हसताना तिच्या डोळ्यांतून पाणी येत असे. कधी कधी तर आम्ही आईला विचारत असू की, 'यात एवढं हसण्यासारखं काय आहे?' रमेशमामा (आमचा मामा, आईचा धाकटा भाऊ) हासुद्धा विनोदी आणि खेळकर स्वभावाचा होता. त्यामुळे रमेशमामा आला की त्यालासुद्धा विनोदांचा हसण्यासाठी एक खात्रीशीर मेंबर मिळत असे. दादा कोंडके हा दोघांचा आवडता नट होता.

पण या खेळकर स्वभावामुळे आईला कठीण प्रसंगावर मात करणे शक्य झाले होते. कुठलाही कठीण प्रसंग आला तर काहीतरी विनोद करून आई त्यांची तीव्रता कमी करीत असे.

स्वयंपाक:

आई अतिशय चांगला स्वयंपाक करीत असे. स्वयंपाकाबद्दल सांगायचं तर ती पाण्याला चव आणते असे. घरात तसे फारसे काही नसे. एक हळदतिखटाचा डबा तेवढा होता. पण मुख्य म्हणजे आईने कोंड्याचा मांडा करून आम्हाला वाढवलं. कारण अण्णांचा पगार पुरत नसे. महिनाअखेर हा भयानक कालखंड असे. अण्णा दुकानदारांकडून उधार सामान मिळवण्यासाठी , उसने पैसे मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत. शाळेची वेळ झाली की आम्ही शाळेचा गणवेष चढवून तयार होत. मग आई खूप वैतागत असे, 'हे कामावर निघून गेले. त्यांना आहे का मुलांची काळजी?' मग कुठल्यातरी डब्यांतून काहीतरी शोधून काहीतरी बनवून आम्हाला वाढत असे. 

आमचं दोन वेळेच्या खाण्याशिवाय काही खाणं काही नसे. त्यामुळे जेवताना भूक चांगली लागते असे. जेवायला भरपूर लागत असे. पण रेशनच्या अन्ना धान्याला कस नव्हता. त्यामुळे आम्ही दिसायला पाप्याची पितरंच होतो. आई म्हणत असे,'खातात सात सुपं, दिसतात माकडाची रूपं.' शाळेत सुद्धा शिक्षक विचारीत, ' तुम्ही मुलं जेवत नाही का?' आम्हाला बेलसरे नावाच्या बाई होत्या. त्या म्हणत,' त्या मुलांशी मस्ती करू नका. फुंकर मारली तर ती मुलं उडून जातील.'

एका वेळेला एक-दीड किलोच्या चपात्या बनवायला लागत. आई भाकऱ्यासुद्धा अतिशय चांगल्या बनवत असे. भाकऱ्या अगदी मोठ्या आणि कंपासने आखाव्या अशा वर्तुळाकार असत.

आईच्या पालेभाज्यांची अजून सारे आठवण काढतात. एकदा आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत दीदीमावशीकडे  (आईची धाकटी बहीण. हिचे नाव कमल होते, पण तिने आम्हाला दीदीमावशी म्हणायला सांगितले  होते)  गेलो असता, आईने  त्यांच्याच घरी लावलेला पुदिना काढून त्याची चटणी बनवली. तेव्हा दादाकाका  ( दीदीमावशीचे यजमान) फार खुष झाले आणि आई स्वयंपाक करीत असली की आवर्जून सांगत , 'तुम्ही बनवता तशी चटणी बनवा.'

भाज्या कापण्यासाठी सुरुवातीला एक लोखंडी विळी होती. नंतर दीदीमावशीने स्टेनलेस स्टीलची विळी घेतली. आम्ही भाज्या कापण्यासाठी सुरी वापरत नव्हतो. आई विळीवर पालेभाज्या अतिशय बारीक चिरीत असे.

सुरुवातीला आम्ही चुलीवर स्वयंपाक करीत असू. नंतर पितळी स्टोव्ह,  वातीचा स्टोव्ह झाले. चाळीतील भिशीत आईचा एकदा पहिलाच नंबर लागला आणि आईने अण्णांना गॅसची चौकशी करण्यास सांगितले. गॅसला तेव्हा नंबर लावावा लागत असे. पण सुदैवाने खडकी बाजारात हिरालाल मेहताकडे गॅस अव्हेलेबल असल्यामुळे लगेच मिळाला. मग सिलिंडर संपल्यावरच स्टोव्ह काढावा लागत असे. कोळसा, लाकडं, रॉकेल वगैरे आणण्याचं काम वाचलं.

घरात वाटण करण्यासाठी दगडी पाटा-वरवंटा होता. त्यावर मिरची, कोथिंबिरीचे वाटण होत असे. होळीच्या दिवशी अण्णा त्यावर नारळ वाटून नारळाचे दूध काढीत. नंतर मीसुद्धा पाट्यावर वाटण करीत असे. स्वयंपाकामध्ये अण्णा आईला खूप मदत करीत.

आंबटवरणात कणकेच्या छोट्या कच्च्या पोळ्या टाकून बट्ट्या बनवीत असे. विदर्भाकडे या पदार्थास वरणफळे म्हणतात. गुजराती लोक दाळ  ढोकळी  म्हणून हा पदार्थ बनवतात. डाळीच्या पिठाचे गोळे उकळत्या पाण्यात टाकून गोळवणी हा प्रकार बनवीत असे. आंबटवरणात वांगी घालायची (सांबार नाही), कोबीची भाजी बनवली तर त्यात चण्याची डाळ घालायची, अशा प्रकारे स्वयंपाकात विविधता आणण्याचा प्रयत्न आई करीत असे.

झाशीला राहत असताना आई आलू - दमची (छोट्या बटाट्यांची सुकी) भाजी शिकली. ही भाजी आई बनवीत असे. आज हॉटेलमध्ये मिळणाऱ्या भाजीपेक्षा ही वेगळी भाजी होती आणि जास्त चवदार होती.याशिवाय सुकी फ्लॉवरची भाजी आणि फुलके बनवीत असे.

सणावाराचे सर्व पदार्थ - संक्रांतीला भोगीची भाजी, तिळाचे लाडू, हलवा, श्रावणात घारगे, आरत्या, गणपतीला उकडीचे मोदक , दिवाळीच्या फराळाचे पदार्थ - आई बनवीत असे.

आईला सुकी मासळीसुद्धा आवडत असे. त्यामुळे सोडे, बोंबील, सुकट या पदार्थांचे कालवण ती चांगले बनवीत असे. शिवाय सुकी मासळी तळून किंवा तव्यावर थोड्या तेलावर परतूनही खाता येत असे. नॉन व्हेजमध्ये चिकन, मटण, मासे तळणे, माशांची चालवणे चांगली बनवीत असे. नाना मामा आणि रमेशमामा (आमचे मामा) आईच्या हाताच्या मटणाची तारीफ करीत असत.

आई आजारी पडण्यापूर्वी घरात वाळवण खूप करीत असे. कुरडया, पापड्या, पापड, मिरच्या, बटाट्याचा कीस, सांडगे, उसरी (ताकात वाळवून सुकवलेल्या भाज्या ) असे बरेच पदार्थ बनवून ठेवत असे. कुरडया बनवून ठेवल्या की राहिलेल्या गव्हाच्या चोथ्यापासून भुसवड्या बनवीत असे. भात शिल्लक राहिला की त्याचे सांडगे घालून टाकत असे. भाजीचे सांडगे ती बनवीत असे. आज सुपरमार्केटमध्ये   'अमृतसरी वडी' म्हणून या    सांडग्यांसारखा    पदार्थ मिळतो.

आईने आम्हाला स्वयंपाक शिकवून ठेवला. नंतर आई खूप आजारी असे. त्यावेळी आम्हाला या पाककलेचा खूप उपयोग झाला, आताही होतो.

सणवार:
आई बहुतेक सर्व सणवार करीत असे. या बाबतीत ती आजीचं अनुकरण करीत होती.

संक्रांत: संक्रांतीला रात्री जागून तीळगूळ, तिळाचे लाडू बनवत असे. भोगीला भोगीची भाजी बनवत असे.

गुढीपाडवा: गुढीपाडव्याला अण्णा पुण्याला जाऊन निर्णयसागर पंचांग घेऊन येत असत. त्यांनी त्यांच्याकडे सर्व वर्षांची पंचांग ठेवली होती. आल्यावर बांबूच्या काठीला (एरवी या बांबूचा उपयोग कपडे वाळत घालण्यासाठी होत असे) खण बांधून, हार, गाठ्या लावून, कडुलिंबाची पाने लावून वर तांब्या उपडा टाकून अण्णा गुढी उभारत. कडुलिंबाचं महत्त्व सांगत. कडुलिंबाच्या वाटलेल्या पानांमध्ये थोडा गूळ टाकून त्याची गोळी बनवून आम्हाला खायला देत.

श्रावण महिना: श्रावण महिना तर कधी येतो असे आम्हाला होतं असे.

आईचे संस्कार आणि शिकवण:

अचकट विचकट पुरुषांना 👿 कसे तोंड द्यावे :


एक मुलगी म्हणून आणि आपण रहात असलेली वस्ती लक्षात घेऊन तिने माझ्यावर डोळ्यात तेल घालून वाढवले, संरक्षण केले, समाजात वावरण्याच्या  टिप्स दिल्या आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन कसे जगावे याचे धडे दिले. त्याचा मला या वयातही उपयोग होतो. नील झाल्यावर मुलांचं मानसशास्त्र, त्यांच्या वाढत्यावयातला आईचा रोल याच मार्गदर्शन खूप उपयोगी पडतं.

या बाबतीत मलाही आठवते. कुणी स्त्रियांशी अचकट-विचकटपणा करीत असेल तर आई तिचे मत सांगत असे की स्त्रीच्या नजरेतच अशी जरब असली पाहिजे की अशा पुरुषांची हिम्मतच होता कामा  नये. 

🌺 अन्नाला माजू नये:
अन्न फुकट जाऊ नये, याबद्दल आई फार दक्ष असे.माणसाचं एखादा पदार्थ अगदी नाइलाजाने टाकावा लागला तर ती फार हळहळत असे. जेवताना आपल्याला हवं तेवढंच मागून घ्यावं आणि पानात काही टाकू नये, ही शिकवण आमच्या मनावर आईने ठेवली. आई सांगत असे, की अन्न ही घरची लक्ष्मी आहे आणि तिचा अनादर केला तर ती निघून जाते. प्रत्येक गोष्ट उदाहरणासहित पटवून देण्याच्या सवयीप्रमाणे त्यांच्या एका शेजाऱ्याचे ती नेहमी उदाहरण देत असे.

कल्याणला राहत असताना त्यांचे वढावकर नावाचे एक शेजारी होते. त्यांच्या घरची फार सुबत्ता होती. त्यामुळे ते स्वयंपाकासाठी सारे उच्च दर्जाचे साहित्य आणून पदार्थ बनवीत. पण शिल्लक राहिले तर हे सारे उकिरड्यावर फेकून देत. ते पाहून आई सांगते की आम्हाला फार वाईट वाटे. पुढे या वढावकरांची परिस्थिती फिरली आणि त्यांना अन्नान्न दशा आली. पूर्वी वाण्याच्या दुकानात ज्यांना काही काम नाही असे लोक बसत असत. वढावकर असे दुकानात जाऊन बसू लागले. तेव्हा रॉकेलचे मोठे पत्र्याचे चौकोनी डबे मिळत. मग कुणी गिऱ्हाइकाने डबा घरी पोहचवण्यास सांगितले की असे लोक ही कामे करीत‌. 

गिऱ्हाईक बक्षिसी म्हणून चार-आठ आणे हातावर ठेवी. आई सांगत असे की एके काळी संपन्नतेत राहणाऱ्या गृहस्थांस असे खांद्यावर रॉकेलचे डबे वाहताना पाहून आम्हाला अतिशय वाईट वाटत असे.

 🌺 तोंड चांगलं पाहिजे 

आईला लहान मुलांची खूप आवड असल्याने आई आली की लहान मुलं तिच्याभोवती गोळा होत. परंतु ऐपत नसल्याने आई कुणासाठी खायला, कापड, कपडे असं काही घेऊ शकत नसे. त्याचं तिला फार वाईट वाटे. मुलांना ती म्हणत असे,' मी तुमच्यासाठी काहीच आणत नाही, मग तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम का करता?'

आई त्यामुळे आम्हाला नेहमी सांगत असे की ,'माणसाकडे काही नसलं तरी चालेल, पण त्याचं तोंड चांगलं पाहिजे. तोंड चांगलं असणारा मनुष्य काही नसेल तरी सर्व काही मिळवतो. उलट तोंड चांगलं नसणारा मनुष्य मिळवलेलं सर्व काही एका क्षणात गमावून बसतो.'

नात्यातील स्त्रियासुद्धा आईच्या या  गुणाचा उल्लेख करीत की,' तुम्ही आम्हाला कधी तोडून बोलत नाहीत की टोमणे मारीत नाहीत.'

🌺 कुणाला हसू नये

कुणाच्या हसू नये असे आई आम्हाला नेहमी सांगत असे. आपण जे बोलतो ते नियती ऐकत असते. आपण कुणाला हसलो, तर नियती म्हणते, तू दुसऱ्यांना हसतोस का? थांब, आता तीच गोष्ट तुझ्या पदरी देते. आणि नंतर खरोखरच ती गोष्ट आपल्या पदरी येते.

🌺 कुठल्याही माणसाची एकदाच पारख करावी:

🌺 जुन्या गोष्टी विसरून जाव्यात, एकसारख्या उगाळत बसू नये:

🌺 सर्वधर्मसमभाव:
आमच्या चाळीमध्ये सर्व धर्मांचे आणि जातींचे लोक होते. चाळीतील बायका संक्रांतीचे हळदीकुंकू करताना फक्त हिंदू शेजारणींना बोलावत असत. परंतु माझी आई धर्म, जात असा कुठलाच फरक न करता बायकांना हळदीकुंकवाला बोलावीत असे.

आईने सांगितलेल्या आठवणी आणि गोष्टी: 

श्रद्धेचे फळ 🙏 


आमचे आजोबा - कै. शंकर यशवंत राजे 

हा किस्सा आमच्या आईने सांगितलेला आहे. आईच्या वडलांचा म्हणजे माझ्या आजोबांचा देवावर विश्वास नव्हता. परंतु ते देवपूजा नियमित करीत. ते देवपूजा करीत असताना शेजारील एक  मुसलमान बाई  तेथे नियमित येऊन बसे. तिला ही   पूजा फार आवडे. तिच्या मुलीला एकदा खाकमांजरी झाली, म्हणजे काखेत गाठ आली. तिने आजोबांना सांगितले की ' तुम्ही पूजा करता तेव्हा तुमच्या पूजेतील थोडे कुंकू मला द्या. त्या कुंकवाने माझ्या मुलीची खाकमांजरी बरी होईल.' आजोबांचा या गोष्टीवर विश्वास नव्हता. ते म्हणाले  की 'अशी काय खाकमांजरी बरी होईल का? मुलीला चांगल्या दवाखान्यात घेऊन जा आणि इलाज कर.' परंतु ती गरीब असल्याने बहुधा तिला इलाजाचा खर्च परवडणारा नसावा. तिने फारच आग्रह केला तेव्हा आजोबांनी चिमूटभर कुंकू उचलून 'हे घे' म्हणून तिच्या हातावर आपटले. तिने ते श्रद्धेने हातावरून काळजीपूर्वक पुसून कागदाच्या पुडीत भरून घरी नेले. हे कुंकू तिने नियमित खाकमांजरीला लावले आणि तिच्या मुलीची खाकमांजरी बरी झाली. नंतर तिने येऊन आजोबांना ही चांगली बातमी सांगितली.


 भुजंगाच्या गंडमाळा

हा प्रसंग आमच्या आईने आम्हाला सांगितला आहे आणि तिला तिच्या आईने म्हणजे आमच्या आजीने सांगितला आहे.

ही आजीच्या आजोबा-पंजोबा कुणाची तरी गोष्ट आहे. ते व्यवसायाने वैद्य होते की त्यांना औषधांची माहिती होती, माहीत नाही.

एक दिवस देवपूजा करीत असताना देवाच्या चौरंगाखाली का बाजूला त्यांना एक भुजंग वेटोळे घालून बसलेला दिसला. प्रथम त्यांना भीती वाटली, परंतु तो अगदी निपचित पडून आहे, हे पाहिल्यावर त्यांची भीड चेपली.

नीट पाहिल्यावर त्यांना असे दिसले की त्याला गंडमाळा झाल्या होत्या. आजोबांना त्याची दया आली गंडमाळेवर उपाय असणारी औषधी मुळी सहाणेवर उगाळून त्यांनी त्या भुजंगाच्या गंडमाळांवर औषधी लेप लावला. तो भुजंग तेथून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी आजोबांना तो पुन्हा त्याच दिवशी दिसला. आजोबांनी पुन्हा त्याच्या गंडमाळांना औषधी लेप लावला.

अशा प्रकारे तीन-चार दिवस नियमित तो भुजंग येत होता आणि आजोबा त्याच्या गंडमाळांना औषधी लेप लावत होते.

एक दिवस आजोबांना दिसून आले की भुजंगाच्या  गंडमाळा बऱ्या झाल्या आहेत आणि भुजंग आजोबांकडे कृतज्ञतेने पाहतो आहे.

आजोबांनी त्याला प्रार्थना केली की 'तुझ्या वंशातील कुणीही माझ्या वंशातील कुणाला दंश करून नये.' भुजंगाने जणू काही आजोबांची प्रार्थना ऐकली आणि तो तेथून निघून गेला.

त्यानंतर तो भुजंग आजोबांना कधी दिसला नाही.

दादा :
आजीचे वडील म्हणजे आपले पणजोबाची गोष्ट आहे...ते वैद्य होते..आजीचे माहेरचे आडनाव वैद्य...पणजोबाना एक भुजंग स्वप्नात दिसला, त्याला गंडमाळा झाल्या होत्या व तो त्यावर उपचार कर असे सांगू लागला..त्यावर पणजोबा नी त्याला प्रत्यक्ष यायला सांगितले...दुसऱ्या दिवशी पणजोबा पूजा करताना त्यांना फुस्स असा आवाज आला..तो भुजंग प्रत्यक्ष आला होता..त्याच फणा सुपा एवढा होता व अंगावर बोट बोट केस होते..पणजोबा नी बघून उपचार चालू केले सहाने वर उगाळून पणजोबा लेप करायचे व त्याच्या मानेला लावायचे..काही दिवसात तो भुजंग बरा झाला व सांगितल्या प्रमाणे वरदान दिले.

चाळीत झालेला खून 🗡️ 

आई लहानपणी एका चाळीत राहत असताना त्यांचा शेजारी खून‌ करून रात्री एका दलदलीतून चालत आला होता. त्याच्या बायकोने रात्रीतल्या रात्रीत त्यांचे कपडे धुऊन टाकले. 

पोलीस चौकशीला आले. त्यांनी आजोबांनाही प्रश्न विचारले. आजोबांनी सांगितले की ,'मी सकाळी कामावर जाऊन रात्री घरी येणारा मनुष्य आहे. मला माझ्या कामाव्यतिरिक्त कुठलीही माहिती नाही.'

त्या वेळी एका पोलीसाने त्यांना सांगितलं की ,'तुम्ही चांगले लोक दिसता.अशा वस्तीत कशाला राहता?'
त्यामुळे आजोबांनी मनावर घेतलं आणि ती जागा बदलली.

नानामामाला भुते दिसत 👻 
आईने सांगितलं की नानामामाला भुते दिसत. नवरात्रामध्ये म्हणे भुतांचा मुक्त संचार असतो. एकदा नवरात्रामध्ये नानामामा व्हरांड्यात झोपला असताना त्याला एक भूत व्हरांड्यावर खाली पाय सोडून बसलेले दिसले. नाना मामा घाबरून घरी आला.

घरात झालेला चोरीचा प्रयत्न:
आजी-आजोबांच्या घरी एकदा चोरीचा प्रयत्न झाला होता. एका खोलीला भोक पाडण्यात आलेले आजीच्या लक्षात आले. तिने मुला-मुलींना मदतीला घेऊन ताबडतोब त्या खोलीतील सारे सामान दुसऱ्या खोलीत हलवले. नानामामाचा सर्व प्रकारच्या मुलांमध्ये वावर होता. त्याने हे चोर कोण होते ते शोधून काढले होते.


©Dr Hemant Junnarkar, All rights reserved
(टीप: या पोस्टमधील कवितांवर  आमचा कोणताही हक्क नाही. या कवितांचा पूर्णतः हक्क त्यांचे मूळ लेखक/कवी/ प्रकाशक यांचा आहे. ही पोस्ट फक्त मनोरंजन/वाचना  साठी केलेली असून या पोस्ट द्वारे आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांच्या या लिखाणावर हक्क दाखवत नाही आहोत.)

 


आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण

आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर  (१७/१०/१९२२-१/२/२०१४) माझे वडील कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर एक ननअत्यं...